सकाळच्या चहाबरोबर अनेकांना वेगवेगळ्या प्रकारचा नाश्ता करायची सवय असते. जर तुम्हाला मसालेदार आणि कुरकुरीत खाण्याची इच्छा असेल तर तुमच्यासाठी हा लेख उपयुक्त आहे. तुम्ही रोज सकाळच्या नाश्ताला जर तेचतेच बोरिंग पोहे आणि उपमा खाऊन कंटाळला असाल तर आज तुम्हाला मूग डाळ टिक्की कशी तयार करायची यासंदर्भात संपूर्ण रेसिपी या लेखामध्ये तुम्हाला देणार आहोत. बाहेरून कुरकुरीत आणि आतून मऊ असलेली ही टिक्की अतिशय स्वादिष्ट लागते. विशेष गोष्ट म्हणजे, ती घरात सहज उपलब्ध असलेल्या साध्या साहित्याचा वापर करून बनवता येते.
मूग डाळ – 1 कप धुतलेली
बटाटा – 1 उकडलेला
कांदा – 1 बारीक चिरलेला
हिरव्या मिरच्या – 2 बारीक चिरलेल्या
आले-लसूण पेस्ट – 2 चमचा
कोथिंबीर – 2 टेबलस्पून बारीक चिरलेली
जिरे – अर्धा चमचा
लाल मिरची पावडर – अर्धा चमचा
धणे पूड – अर्धा चमचा
गरम मसाला – अर्धा चमचा
चाट मसाला - अर्धा चमचा
बेसन किंवा ब्रेड क्रम्स – 3 टेबलस्पून
मीठ - चवीनुसार
तेल – आवश्यकतेनुसार
मूग डाळ टिक्की बनवण्यासाठी सर्वात आधी मूग दाळ स्वच्छ धुवून करा, त्यानंतर दाळ 4 तास पाण्यामध्ये भिजवून ठेवा. मुगाची डाळ पाण्यामध्ये फुगल्यानंतर पाणी त्यामधून काढून टाका, भिजवलेले मूग मिक्सरमध्ये घालून जाडसर वाटा. वाटताना जास्त पाणी घालणार नाही याची काळजी घ्या. टिक्कीचे मिश्रण सहज आकार देता येईल इतके घट्ट असावे एवढेच पाणी मिश्रणामध्ये घालावे. आता, वाटलेले मूग एका मोठ्या भांड्यात काढा. त्यात उकडलेल्या बटाट्याचा लगदा, बारीक चिरलेला कांदा, हिरव्या मिरच्या, आले-लसूण पेस्ट आणि कोथिंबीर घाला. नंतर, जिरेपूड, लाल तिखट, धणेपूड, गरम मसाला, चाट मसाला आणि मीठ घाला सर्व व्यवस्थित मिसळून घ्या.
मिश्रण जास्त ओले वाटत असल्यास, त्यात थोडे बेसन किंवा ब्रेडक्रंब्स घाला. यामुळे टिक्कीला आकार देणे सोपे जाईल आणि तळताना त्या तुटणार नाहीत. हातांना थोडे तेल लावा आणि मिश्रणाचे छोटे गोळे बनवा. तळहातांच्या साहाय्याने त्यांना दाबून गोल, चपट्या टिक्की बनवा. कढईत तेल गरम करा. तेल गरम झाल्यावर त्यात टिक्की घालून मंद आचेवर दोन्ही बाजूंनी सोनेरी तपकिरी आणि कुरकुरीत होईपर्यंत तळा. एकाच वेळी खूप जास्त टिक्की घालणे टाळा, कारण त्या एकमेकांना चिकटू शकतात. टिक्की पूर्णपणे शिजल्यावर त्या एका ताटलीत काढून ठेवा. दही आणि हिरव्या चटणीसोबत सर्व्ह करा.