पाकिस्तान क्रिकेट संघाचा माजी फिरकी गोलंदाज दानिश कानेरियाने अंडर 19 आशिया कपमधील खेळाडूंबाबत धक्कादायक दावा केला आहे. अंडर 19 आशिया कप खेळणारे काही पाकिस्तानी खेळाडू वयाने जास्त दिसत होते असं त्याचं म्हणणं आहे. अंतिम सामन्यात भारताचा पराभव करत पाकिस्तानकडे विजेतेपद मिळवण्याची उत्तम संधी होती. परंतु मोहित उल्वा आणि मनाल चौहान यांनी 57 धावांची भागीदारी करत भारताला एका विकेटने विजय मिळवून दिला. पाकिस्तानने 338 धावांचा डोंगर उभा केला असताना, चौहानने 32 चेंडूंत 47 धावा केल्या, तर उल्वा 26 चेंडूंत 49 धावा करून नाबाद राहिला, ज्यामुळे भारताने एक ऐतिहासिक विजय नोंदवला.
दिनेश कनेरियाने म्हटलं की, फलंदाजी चांगली झाली असली तरी पाकिस्तानची गोलंदाजी आणि रणनीती अपेक्षापेक्षा कमी दर्जाची होती. अंतिम सामन्यात पाकिस्तानने चुकीच्या वेळी आक्रमकता दाखवली असंही त्यांचं म्हणणं आहे.
"मी त्यादिवशी सामन्याचे हायलाईट्स पाहत होतो. जेव्हा मी क्रिकेट पाहतो तेव्हा माझ्यासोबत आईदेखील पाहते. ती म्हणाली, भारतीय संघात किती मुलं खेळत आहेत. पण पाकिस्तानने अंडर-19 मध्ये आपला राष्ट्रीय संघ उतरवला आहे का? ते जरा वयाने जास्त वाटत आहेत. ते लहान दिसत नाहीयेत ना?," असं त्याने म्हटलं आहे.
"पाकिस्तानच्या संघाला आणि त्यांच्या गोलंदाजीला नक्की काय झाले आहे, हे मला समजत नाही. क्रिकेटचा दर्जा खूपच खालावला आहे. मी आता सामने पाहणेही बंद केले आहे. मला ते पाहण्याची इच्छाच उरत नाही. हे कसले क्रिकेट आहे? अगदी 'अंडर-19' स्तरावरही भारताने अतिशय उत्तम खेळ केला. मला वाटते की, भारतात प्रतिभेचा ओघ सतत वाढत आहे. तिथे प्रचंड गुणवत्ता आहे. हे तरुण खेळाडू भविष्यात भारताच्या राष्ट्रीय संघाचे प्रतिनिधित्व करतील. या संघात असे अनेक खेळाडू आहेत, मग गोलंदाज असो किंवा फलंदाज जे येणाऱ्या काळात भारताचे प्रतिनिधित्व करतील."
"भारताने विजयानंतर योग्य वेळी आक्रमकता दाखवली. पाकिस्तानने मात्र चुकीच्या वेळी, म्हणजेच सामना सुरू असतानाच आक्रमकता दर्शवली. त्यांनी जे काही केले, त्यावरून हेच दिसते की, जर तुम्ही जिंकलात तरच आक्रमकता दाखवणे योग्य ठरते. त्यांनी 100 धावा केल्यानंतर किंवा इतर प्रसंगी जसे वर्तन केले, ते सर्वांनी पाहिलेच आहे. त्यांचे वागणे कसे होते? याउलट, भारताने विजयानंतर आपली प्रतिक्रिया दिली," असं तो म्हणाला.
कानेरियाने असंही म्हटलं की, अंडर -19 आशिया चषक स्पर्धेच्या अंतिम सामन्यात पाकिस्तानवर विजय मिळवल्यानंतर भारताने केलेला जल्लोष पूर्णपणे समर्थनीय होता. त्याच्या मते, पाकिस्तानी खेळाडूंनी सामन्यादरम्यान प्रतिस्पर्धी खेळाडूंना चिथावणी दिली होती, त्यामुळे त्यांनाही तितक्याच आक्रमक प्रतिसादासाठी तयार असायला हवं होतं.
"दुसऱ्या बाजूने विचार केला तर, जर पाकिस्तान जिंकला असता, तर त्यांनीही अगदी असंच केलं असतं. त्यांनीही तितक्याच आक्रमकतेने जल्लोष केला असता. मग भारतीय मुलांनी असे केले, तर त्यात चुकीचे काय आहे? त्यांनी कोणालाही अपशब्द वापरलेले नाहीत. त्यांनी फक्त आपली आक्रमकता दर्शवली आहे. आयसीसीच्या (ICC) नियमावलीत कुठेही असं लिहिलेलं नाही की तुम्ही आक्रमकता दाखवू शकत नाही. तुम्ही ती दाखवू शकता, पण त्यासाठी एक ठराविक मर्यादा असते," असं तो म्हणाला.