ज्येष्ठ नागरिकांसाठी नोकियाचा खास फोन! दोन स्क्रीन, SOS बटण अन् कुटुंबीयांना दूरून कंट्रोल करता येणार; पण एक मोठी अडचण!
नोकीया 2360 फ्लीप फोनमध्ये दोन स्क्रीन, एसओएस बटण, फॅमिली असिस्ट आणि स्कूल मोड मिळणार आहे. 1,450mAh बॅटरीसह येणाऱ्या या फोनची किंमत आणि भारतातील लॉन्चची तारीख याबद्दल जाणून घेऊया.
स्मार्टफोनच्या दुनियेत बहुतांश कंपन्या नवनवीन फीचर्स देण्यावर भर देत असताना एचएमडीने साध्या मोबाईल फोनच्या चाहत्यांसाठी नोकीय 2360 फ्लीप सादर केला आहे. जुन्या काळातील फ्लिप फोनची आठवण करून देणाऱ्या या डिव्हाइसमध्ये दोन डिस्प्ले, आपत्कालीन एसओएस बटण आणि फॅमिली असिस्ट यांसारख्या सुविधा देण्यात आल्या आहेत. विशेषतः ज्येष्ठ नागरिक आणि शाळकरी मुलांचा विचार करून हा फोन तयार करण्यात आला आहे. तरीही यामध्ये एक अडचण आहे. काय आहेत याचे फिचर्स? काय आहेत मर्यादा? सविस्तर जाणून घेऊया.
जुन्या फ्लिप फोनची आठवण
नोकीया 2360 फ्लीपमध्ये पारंपरिक क्लॅमशेल म्हणजेच उघडता-बंद करता येणारी रचना देण्यात आली आहे. फोन उघडल्यानंतर 2.8 इंचांचा मुख्य क्यूव्हीजीए डिस्प्ले मिळतो. बाहेरील बाजूस 1.77 इंचांची दुसरी स्क्रीन आहे. फोन न उघडताही वेळ, तारीख आणि कॉलरची माहिती पाहता येते. मोठे आयकॉन आणि स्पष्ट मजकूर असल्यामुळे ज्येष्ठ नागरिकांना फोन वापरणे सोपे व्हावे, असा यामागचा उद्देश आहे.
एका SOS बटणाने पाच जणांना मिळणार अलर्ट
या फोनच्या मागील बाजूस स्वतंत्र SOS बटण देण्यात आले आहे. आपत्कालीन परिस्थितीत हे बटण सुमारे तीन सेकंद दाबून ठेवल्यास आधी निश्चित केलेल्या क्रमांकावर कॉल जातो. त्याच वेळी जास्तीत जास्त पाच आपत्कालीन संपर्कांना संदेश पाठवला जातो. ज्येष्ठ नागरिक एकटे राहत असतील किंवा मुलांना आपत्कालीन परिस्थितीत मदतीची गरज भासली, तर ही सुविधा उपयोगी ठरू शकते. असे असले तरी हे बटण सरकारी आपत्कालीन सेवांचा पर्याय नाही, असे एचएमडीने स्पष्ट केले आहे.
कुटुंबीयांना दूरून करता येणार नियंत्रण
नोकीय 2360 फ्लीपमधील फॅमिली असिस्ट हे महत्त्वाचे फीचर आहे. या सुविधेद्वारे कुटुंबातील सदस्य आपल्या स्मार्टफोनवरील अॅपच्या मदतीने या फ्लिप फोनचे काही सेटिंग दूरून बदलू शकतात. नवीन संपर्क जोडणे, आवाज कमी-जास्त करणे, रिमाइंडर लावणे आणि एसओएस सेटिंग निश्चित करणे अशा सुविधा उपलब्ध आहेत. विशेष म्हणजे या प्रक्रियेसाठी फ्लिप फोनला मोबाइल इंटरनेटची गरज नसते.फॅमिली असिस्टद्वारे एसएमएस च्या माध्यमातून सूचना पाठवल्या जातात.
मुलांसाठी स्कूल मोड आणि पालकांचे नियंत्रण
हा फोन केवळ ज्येष्ठ नागरिकांसाठीच नाही, तर मुलांचा पहिला फोन म्हणूनही सादर करण्यात आला आहे. यामध्ये स्कूल मोड देण्यात आला आहे. हा मोड सुरू केल्यावर फोनचा वापर मर्यादित करता येतो. मुलांना फक्त घड्याळ आणि आपत्कालीन कॉलची सुविधा उपलब्ध ठेवता येते. याशिवाय ठरावीक संपर्कांनाच कॉल किंवा मेसेज करण्याची परवानगी देता येते. कॅमेरा आणि गेम्ससारखी फीचर्सही बंद करता येतात. या सेटिंगसाठी Family PIN वापरता येतो.
2G ही मोठी मर्यादा
नोकीय 2360 फ्लीपमध्ये 1,450एमएएच क्षमतेची काढता येणारी बॅटरी देण्यात आली आहे. कंपनीच्या माहितीनुसार, फोनला 15 दिवसांपर्यंत स्टँडबाय आणि 27.5 तासांपर्यंत टॉकटाइम मिळू शकतो. याशिवाय क्यूव्हीजीए कॅमेरा, एफएम रेडिओ, यूएसबी टाईप सी चार्जिंग पोर्ट आणि 3.5 एमएम हेडफोन जॅकही मिळतो. फोनमध्ये 4MB रॅम आणि 4MB अंतर्गत स्टोरेज असून मायक्रोएसडी कार्डने स्टोरेज वाढवता येते. चारकोल, बरगंडी रेड आणि टील अशा तीन रंगांत हा फोन उपलब्ध होणार आहे. मात्र, फोन केवळ 2G नेटवर्कला सपोर्ट करतो. 4G किंवा 5G कनेक्टिव्हिटी नसल्याने ज्या भागात 2G सेवा बंद आहे, तिथे फोन वापरण्यात अडचण येऊ शकते. भारतात हा फोन कधी विक्रीसाठी येणार आणि त्याची किंमत किती असेल, याची घोषणा HMD ने अद्याप केलेली नाही. त्यामुळे भारतीय यूजर्सना आणखी थोडा काळ वाट पाहावी लागणार आहे.