बारामतीतील एमआयडीसीमध्ये उद्योजकाच्या गाडीवर गोळीबार झाल्याची घटना समोर आली आहे. अज्ञातांनी गाडीवर दोन राऊंड फायर केल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. ही कार शिवशंभोनगरमधील उद्योजक राजन कोळेकर यांची होती. या गोळीबारात सुदैवानं कोणीही जखमी झाले नाहीय. बारामती तालुका पोलिसांकडून या गोळीबारा प्रकरणाची चौकशी सुरू आहे. बारामतीतील या गोळीबाराच्या घटनेमुळे भीतीचे वातावरण आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार ही घटना संध्याकाळी सहाच्या सुमारास घडली आहे. या घटनेमध्ये राजन कोळेकर बचावल्यामुळे मोठा अनर्थ टळला आहे. पोलिसांनी माहिती दिली की, राजन कोळेकर यांच्या कारवर दोन राऊंड गोळीबार केल्यानंतर अज्ञात मारेकरी फरार झाले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार उद्योजकाला खंडणीची मागणी करणारा फोन आल्यानंतर काही तासांमध्ये राजन कोळेकर यांच्या कारवर हल्ला झाला आहे. राजन कोळेकर हे बांधकाम व्यावसायिक आहेत. गेल्या काही दिवसांमध्ये बारामतीमध्ये वाढत्या गुन्हेगारीमध्ये वाढलेल्या घटनेमुळे नागरिकांमध्ये भीतीदायक वातावरण आहे. दिवसाढवळा गोळीबाराच्या घटनेमुळे शहरात खळबळ माजली आहे.
राजन कोळेकर यांच्या घराजवळ उभ्या असलेल्या डिफेंडर कारवर फायरिंग करण्यात आली. पोलिसांनी सांगितलं की, कोळेकर यांना शनिवारी दुपारी साडेचार वाजता इन्स्टाग्रामवर एका अज्ञात व्यक्तीने फोन करुन धमकी दिली. या फोनवर समोरच्या व्यक्तीने म्हटलं की, मी डीके बोलतोय, दोन पेटी दे. या व्यक्तीने दोन लाखांची मागणी केली होती, असं कोळेकरांनी पोलिसांना सांगितलं. या धमकीनंतर संध्याकाळी सहा वाजता घरातील पार्किंगमध्ये कार उभी असताना अज्ञातांनी गोळीबार केला.
दरम्यान 18 ऑक्टोबरला उद्योजक राणा सूर्यवंशी यांच्यावर कथित हल्ल्यामुळे राज्यभर खळबळ उडाली होती. एकाच महिन्यात दुसऱ्या उद्योजकावर गोळीबाराच्या घटनेमुळे शहरात भीतीचे वातावरण आहे.