रात्रीच्या अंधारात एसटीतून दोन विद्यार्थिनींना...; चालक, वाहकाची नोकरी गेली; थेट परिवहनमंत्र्यांकडून निलंबनाचे आदेश
एसटी महामंडळाच्या बसमधून प्रवास करणाऱ्या दोन चिमुकल्या मुलींना रात्रीच्या अंधारात रस्त्यावर उतरविल्याची धक्कादायक घटना घडली होती.
भंडारा ते मुंढरी मार्गावर धावणाऱ्या एसटी बसमधून प्रवास करणाऱ्या दोन विद्यार्थिनींना चालक आणि वाहकाने रात्रीच्या आंधारात अर्ध्या रस्त्यात उतरवून दिल्याने संताप व्यक्त करण्यात येत होता. या प्रकाराची आता परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी गंभीर दखल घेतली आहे. चालक आणि वाहक यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे.
14 नोव्हेंबर रोजी हा प्रकार घडल्यानंतर प्रताप सरनाईक यांनी घडलेल्या प्रकाराची दखल घेतली होती. एसटी प्रशासनाकडून तातडीने प्राथमिक चौकशीदेखील करण्यात आली होती. चौकशीत संबंधित चालक अनिल सावरे आणि वाहक उदेभान मेश्राम यांची जबाबदारी निश्चित करण्यात आली होती. त्यानंतर दोघांनाही आजपासून म्हणजेच 16 नोव्हेंबरपासून एसटी सेवेतून निलंबित करण्यात आले आहे.
समोर आलेल्या माहितीनुसार, दोघांविरुद्ध एसटीच्या शिस्त व आवेदन कार्यपद्धतीनुसार पुढील कारवाई सुरू करण्यात आली आहे. विद्यार्थ्यांना त्यांच्या घरापर्यंत सुखरूप पोहोचवण्याची जबाबदारी एसटीची असल्याचे स्पष्ट निर्देश मंत्री सरनाईक यांनी दिले आहेत. तसंच, कर्मचाऱ्यांना विद्यार्थ्यांना स्वतःच्या मुलांप्रमाणे सांभाळण्याच्या सूचनादेखील देण्यात आल्या आहेत.
प्रताप सरनाईक यांनी भविष्यात अशा घटनांची पुनरावृत्ती टाळण्यासाठी एसटी प्रशासनाला परिपत्रक काढण्याचे निर्देश दिले आहेत. पुन्हा असा प्रकार घडल्यास संबंधित अधिकारी-कर्मचाऱ्यांना थेट सेवेतून बडतर्फ करण्याचा परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी इशारा दिला आहे.
प्रवाशांचा सुरक्षित प्रवास ही एसटीची सर्वोच्च प्राथमिकता आहे. विशेषतः महिला, लहान मुले आणि ज्येष्ठ नागरिक यांच्या सुरक्षिततेबाबत कोणतीही हयगय सहन केली जाणार नाही. कर्तव्यात कसूर करणाऱ्या अधिकारी व कर्मचाऱ्यांवर कठोर कारवाई केली जाईल, सध्या निलंबित केले आहे. या पुढे असा प्रकार घडला तर संबंधित अधिकारी व कर्मचाऱ्यांना सेवेतून बडतर्फ करण्यात येईल. असा स्पष्ट इशारा परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी या कारवाईतून दिला आहे.
काय आहे प्रकरण?
भंडारा ते मुंढरी मार्गावर धावणाऱ्या एसटी बसमधून प्रवास करणाऱ्या दोन विद्यार्थिनींना चालक आणि वाहकाने रात्रीच्या अंधारात त्यांच्या गावापर्यंत न पोहोचवता रोहा गावातच अर्ध्या रस्त्यात उतरवून दिले होते.बसमध्ये पुढील प्रवासासाठी इतर प्रवासी नसल्याचे कारण देत या विद्यार्थिनींना उतरवण्यात आल्याचा आरोप आहे. या प्रकाराची माहिती मिळताच जिल्हा परिषद शिक्षण व बांधकाम सभापती नरेश ईश्वरकर यांनी आपला नियोजित दौरा रद्द करून थेट रोहा गाव गाठले. त्यांनी संबंधित चालक आणि वाहकाला चांगलेच धारेवर धरत एसटी महामंडळाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे तक्रार करून कठोर कारवाईची मागणी केली होती. सुदैवाने पालक आणि शिक्षण सभापती वेळेत घटनास्थळी पोहोचल्याने मोठा अनर्थ टळला. मात्र, रात्रीच्या वेळी दोन विद्यार्थिनींच्या सुरक्षिततेची जबाबदारी असताना त्यांना अंधारात अर्ध्या रस्त्यात सोडून देण्याचा अधिकार चालक आणि वाहकाला कोणी दिला? असा संतप्त सवाल आता पालकांकडून उपस्थित केला जात होता.