भारतीय क्रिकेट प्रशासनातील महत्त्वाचे नाव असलेल्या जय शाह यांची आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद म्हणजेच आयसीसीच्या चेअरमनपदी दुसऱ्यांदा बिनविरोध निवड झालीय. नुकत्याच बाली येथे झालेल्या आयसीसी बोर्डाच्या बैठकीनंतर ही घोषणा करण्यात आली. 2024 मध्ये वयाच्या 35व्या वर्षी ते आयसीसीचे सर्वात तरुण चेअरमन बनले होते. आता त्यांच्या नेतृत्वाखाली क्रिकेटचा जागतिक विस्तार, महिला क्रिकेटला प्रोत्साहन आणि 2028 च्या लॉस एंजेलिस ऑलिम्पिकमध्ये क्रिकेटच्या पुनरागमनावर भर असेल. दुसऱ्यांदा आयसीसी चेअरमन झाल्यानंतर त्यांना किती पगार मिळेल? याबद्दल सविस्तर जाणून घेऊया.
जय शाह यांची एकूण संपत्ती सुमारे 124 कोटी रुपये असल्याचा अंदाज व्यक्त केला जातो. असे असले तरी हा आकडा त्यांनी स्वतः जाहीर केलेला नाही. त्यांच्या व्यवसायातील सहभाग, गुंतवणूक यातून ही आकडेवारी सांगितली जाते. क्रिकेट प्रशासनात येण्यापूर्वी जय शाह यांचा व्यावसायिक क्षेत्राशी संबंध होता. ते टेंपल एंटरप्राइज या कंपनीच्या संचालक मंडळात होते. तसेच कुसुम फिनसर्वमध्ये त्यांची 60 टक्के हिस्सेदारी असल्याचे सांगितले जाते.
जय शाह हे मूळचे गुजरातमधील अहमदाबाद येथील आहेत.त्यांच्याकडे रोल्स रॉयस फँटम, बेंटली मुल्सान, फेरारी 488, रेंज रोव्हर, मर्सिडीज-बेंझ, व्होल्वो XC90 आणि टाटा हॅरियर EV यांसारख्या गाड्या असल्याचे वृत्त माध्यमांतून समोर आले आहे.
आयसीसी चेअरमन हे पद मानद स्वरूपाचे आहे. त्यांना नियमित मासिक किंवा वार्षिक पगार नसतो तर अधिकृत बैठका, दौरे आणि कार्यक्रमांसाठी प्रवासभत्ता, निवास आणि अन्य सुविधा दिल्या जातात. बीसीसीआय सचिवपदावर असतानाही जय शाह यांना निश्चित मासिक वेतन नव्हते; त्याऐवजी बैठका आणि प्रवासासाठी भत्ते व खर्चाची रक्कम दिली जाते. ICC ने चेअरमनच्या भत्त्यांची नेमकी रक्कम सार्वजनिक केलेली नाही. असे असले तरी आयसीसीच्या बैठकांसाठी अध्यक्षांना विदेशात जावं लागतं. त्यावेळी प्रत्येक दिवसासाठी 1000 डॉलर्स म्हणजेच दिवसाला 82 हजार रूपये मिळतात, असे वृत्त माध्यमांतून समोर आले आहे.