रोहित पवारांचे सुप्रिया सुळेंना पत्र, लेटरहेडवर ना पक्षाचं नाव, ना चिन्ह; राष्ट्रवादी अंतर्गत मोठी घडामोड!
डिलिमिटेशन विधेयकाला पाठिंबा देऊ नका, अशी विनंती रोहित पवार यांनी सुप्रिया सुळेंना पत्रातून केलीय. सामाजिक न्याय आणि महाराष्ट्राच्या पुरोगामी विचारधारेचा दाखला देत त्यांनी पक्षाच्या भूमिकेवर सवाल उपस्थित केला.
केंद्र सरकारच्या प्रस्तावित डिलिमिटेशन विधेयकावरून राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षात मतभेद असल्याची चर्चा सुरू झाली आहे. या पार्श्वभूमीवर आमदार रोहित पवार यांनी खासदार सुप्रिया सुळे यांना उद्देशून पत्र लिहिलंय. या पत्रातून त्यांनी डिलिमिटेशन विधेयकाला पाठिंबा देण्याच्या संभाव्य भूमिकेचा फेरविचार करण्याची विनंती केली आहे. महाराष्ट्राची पुरोगामी विचारधारा, सामाजिक न्याय आणि भाजपविरोधात लढलेल्या कार्यकर्त्यांची भूमिका यांचा दाखला देत त्यांनी विधेयकाला विरोध करण्याचे आवाहन केले आहे. काय घडलंय नेमकं? सविस्तर जाणून घेऊया.
पुरोगामी विचारांशी तडजोड?
पत्रात शिव-शाहू-फुले-आंबेडकर यांच्या विचारधारेचा उल्लेख करण्यात आला आहे. डिलिमिटेशन विधेयकाला पाठिंबा दिल्यास या विचारांशी विसंगती निर्माण होईल, अशी भूमिका रोहित पवारांनी मांडली आहे. महाराष्ट्राची ओळख सामाजिक न्याय आणि समतेच्या विचारांशी जोडलेली आहे. त्यामुळे या विधेयकाबाबत निर्णय घेताना केवळ राजकीय गणित न पाहता त्याचे सामाजिक परिणामही लक्षात घ्यावेत, असे आवाहन पत्रातून करण्यात आले आहे.
SC-ST प्रतिनिधित्वावर परिणाम?
डिलिमिटेशन प्रक्रियेमुळे लोकसंख्येच्या प्रमाणात मतदारसंघांची पुनर्रचना होणार आहे. मात्र, या प्रक्रियेत अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमातींच्या प्रतिनिधित्वावर परिणाम होऊ शकतो, अशी चिंता पत्रात व्यक्त करण्यात आली आहे. 2011 च्या जनगणनेनंतर लोकसंख्येतील बदल आणि पुढील जनगणनेच्या आधारे होणारी मतदारसंघ पुनर्रचना यांचा संदर्भही देण्यात आला आहे. या मुद्द्यांमुळे सामाजिक न्यायाच्या तत्त्वाला धक्का बसू शकतो, असा दावा त्यांनी केलाय.
भाजपला राजकीय फायदा होणार?
मतदारसंघांची पुनर्रचना करताना सत्ताधारी भाजपला राजकीय फायदा होईल, अशी भीती रोहित पवारांनी पत्रातून व्यक्त केली आहे. मतदारसंघांची आखणी आणि राजकीय प्रतिनिधित्व यांचा निवडणुकांवर परिणाम होऊ शकतो, असंही त्यांनी म्हटलंय. 2024 च्या लोकसभा निवडणुकीत भाजपविरोधात प्रचार केलेल्या कार्यकर्त्यांना आता या भूमिकेचे समर्थन कसे करायचे?, असा सवालही त्यांनी उपस्थित केलाय.
महिला आरक्षण आणि डिलिमिटेशनचा संबंध काय?
पत्रात महिला आरक्षण आणि डिलिमिटेशन या दोन विषयांचा राजकीयदृष्ट्या एकत्र विचार केला जात असल्याबद्दलही त्यांनी आक्षेप नोंदवलाय. महिला आरक्षण विधेयकाला 2023 मध्ये संसदेने मंजुरी दिली होती. मात्र, त्याच्या अंमलबजावणीसाठी जनगणना आणि मतदारसंघ पुनर्रचनेची प्रक्रिया महत्त्वाची ठरते. महिला आरक्षणाला पाठिंबा देणे आणि डिलिमिटेशन विधेयकातील प्रत्येक तरतुदीला पाठिंबा देणे या वेगळ्या बाबी असल्याचे त्यांनी पत्रात म्हटलंय
सुप्रिया सुळेंना आवाहन
पत्राच्या शेवटी सुप्रिया सुळे यांनी पक्षाच्या भूमिकेचा फेरविचार करावा आणि प्रस्तावित विधेयकाला पाठिंबा देऊ नये, अशी विनंती त्यांनी केली. महाराष्ट्रातील कार्यकर्ते आणि पुरोगामी विचारांच्या मतदारांच्या भावना लक्षात घेऊन निर्णय घ्यावा, असेही म्हटले आहे. दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांनी विधेयक संसदेत मांडल्यानंतर त्यातील तरतुदींचा अभ्यास करून पक्ष भूमिका ठरवेल, असे सांगितले होते. त्यामुळे पक्षातील या विषयावरील मतभेद आणि अंतिम भूमिका याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागलंय.