'हे तर लबाड…', डिलिमिटेशन बिलावरून देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
देशभरात डिलिमिटेशन बिलावरून विरोधक आक्रमक झाले असताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पहिली प्रतिक्रिया समोर आली आहे.
देशभरात डिलिमिटेशन बिलावरून गदारोळ आहे. हे बिल पास करण्यासाठी केंद्र सरकार पूर्णपणे तयारीत असताना दुसरीकडे विरोधक आक्रमक झाले आहेत. विरोधकांनी संसदेत डिलिमिटेशन बिल पास होऊ नये म्हणून मोर्चेबांधणी सुरू आहे. अशात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विरोधकांना सडेतोड उत्तर दिलं आहे. ANI या वृत्तसंस्थेशी बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस विरोधक दुटप्पी भूमिका घेत असल्याची टीका केली आहे.
'हे तर लबाड…'
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, डिलिमिटेशन, मतदारसंघाची पुनर्रचना होऊन, आमच्या महिलांकरिता जागा आरक्षित होणार आहे. २०२९ च्या सर्व राज्यांच्या विधानसभेत आणि लोकसभेत ३३ टक्के जागा या महिलांकरिता आरक्षित असतील. खरं म्हणजे विरोधी पक्षांच्या नेत्यांचं, जे या बिलाला विरोध करत आहेत, त्यांचं वक्तव्य मी ऐकलं आहे. मला इतकंच म्हणावसं वाटतं की ते लबाडी करत आहेत. जेव्हा २०२३ मध्ये जेव्हा महिला आरक्षण बिल आणण्यात आलं होतं. तेव्हाच स्पष्ट करण्यात आलं होतं की, हे आरक्षण लागू करण्यासाठी मतदारसंघ पुनर्रचना विधेयक आणावं लागेल. त्यावेळी या सगळ्यांनी डिलिमिटेशन लागू होणार हे माहिती असून त्याला मान्यता दिली. एकमताने त्यांनी हे मान्य केलं. त्यावेळी झोपले होते का? सर्व राज्यांना सरसकट ५० टक्के जागा वाढवून दिल्यामुळे महाराष्ट्र आणि दक्षिणेतील राज्यांचा फायदा झाला, नुकसान झाले नाही. दक्षिणेतील १२० खासदारांपैकी ७५ खासदारांनी उघडपणे या बिलाला पाठिंबा दिला आहे.
हेसुद्धा वाचा - '...म्हणजे धोकायंत्र', डिलिमिटेशनवरुन शरद पवारांबद्दल राज ठाकरेंचं मोठं वक्तव्य, 'सत्तेसाठी अजित पवारांनंतर ही दुसरी टीम...'
...आता विरोधकांनी लबाडी
त्यावेळेस यांनी डिलिमिटेशनला संपूर्ण पाठिंबा दिला आहे. माझा यांना सवाल आहे की, डिलिमिटेशन त्या बिलात होतं की नाही. मतदारसंघ पुनर्रचना बिलासोबतच महिला आरक्षण बिल लागू होईल, याला तुम्हीच मान्यता दिली. आता तेच मोदीजी करायला निघाले आहेत, त्यावेळी मात्र त्याला विरोध करत आहे. तुमचा विरोध डिलिमिटेशनला नाही तर महिलांच्या आरक्षणाला आहे, कारण वर्षानुवर्ष महिला आरक्षणाचा कायदा तुम्ही लोकसभेत आणायचे आणि संयुक्त समितीकडं पाठवून मारून टाकायचे आहे. मोदी यांनी महिलांना आरक्षण देण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे तुम्हाला जळजळ होत आहे. त्यामुळेच तुम्ही डिलिमिटेशनला मान्यता दिली आहे. ती पुन्हा द्यायची आहे. त्यामुळे आता विरोधकांनी लबाडी सोडली पाहिजे. विरोधक राजकीय हाराकिरी करत आहे, अशी टीका फडणवीस यांनी केली.