दादर रेल्वे स्टेशनचं नाव बदलणार अशी घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी केली. यानंतर महाराष्ट्रातील राजकारण चांगलंच तापलंय. दादर स्थानकाला 'चैत्यभूमी' असं नवीन नाव असणार आहे. विधिमंडळ अधिवेशनात आवश्यक पूर्तता करणार असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले. यावर मनसे, शिवसेना तसेच ठाकरेंच्या शिवसेनेकडून विरोध होतोय. असे असताना काँग्रेसने याविरोधी भूमिका घेतली. काय घडलंय नेमकं? सविस्तर जाणून घेऊयाय
दादर रेल्वे स्थानकाला ‘चैत्यभूमी’ हे नाव देण्यास राज्य सरकारनं यापूर्वीच तत्वतः मान्यता दिली आहे. केंद्र शासनाकडून प्राप्त मार्गदर्शनानुसार विधानमंडळाच्या समितीशी संबंधित आवश्यक प्रक्रियेची पूर्तता विधीमंडळ अधिवेशनात करून नामकरणाची कार्यवाही करण्यात येईल, असेही मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले. इथून दादर रेल्वेस्थानक नामांतरणाच्या चर्चांना सुरुवात झाली.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे दादरमधील ‘राजगृह’ हे निवासस्थान आणि त्यांचे स्मृतिस्थळ असलेली चैत्यभूमी यामुळे या परिसराला आंबेडकरी चळवळीत विशेष महत्त्व आहे. चैत्यभूमीला अभिवादनासाठी देशभरातून अनुयायी येतात. त्यामुळे दादर स्थानकाला चैत्यभूमी नाव द्यावे, अशी मागणी अनेक वर्षांपासून आंबेडकरी संघटना आणि अनुयायांकडून केली जात आहे.
दादर रेल्वे स्टेशनच्या नामकरणावरून आता वाद सुरू झालाय. या नामकरणाला दादरकरांचा विरोध असल्याचं म्हणत याबाबत दादरकरांना विचारात घेतलं नसल्याची प्रतिक्रिया मनसेचे नगरसेवक यशवंत किल्लेदार यांनी दिली आहे. त्यांनी याबाबत एक्स पोस्ट केली.मुख्यमंत्र्यांच्या घोषणेनंतर मनसे नेते यशवंत किल्लेदार यांनी या प्रस्तावाला विरोध दर्शवला. दादरमधील नागरिकांना हे नामांतर मान्य नसल्याचे त्यांनी म्हटलंय. सरकारने स्वतःहून निर्णय घेण्याऐवजी स्थानिक रहिवाशांशी चर्चा करावी आणि त्यांची भूमिका जाणून घ्यावी, अशी त्यांची मागणी आहे. दादरची ओळख आणि स्थानिकांच्या भावना लक्षात घेऊनच पुढील निर्णय घ्यावा, असा त्यांच्या भूमिकेचा आशय आहे.
दादर स्थानकाच्या नामांतराचा मुद्दा यापूर्वी 2011 मध्येही चर्चेत आला होता. त्यावेळी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी दादर स्थानकाचे नाव बदलण्यास विरोध केला होता. केवळ नाव बदलल्याने कोणते प्रश्न सुटणार, असा सवाल त्यांनी उपस्थित केला होता. नाव बदलण्याच्या राजकारणाला आपला विरोध असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले होते.
दादरच्या नामकरणाला आता महायुतीतूनच विरोध झालेला पाहायला मिळतोय. शिवसेनेच्या शिशिर शिंदेंनी दादर नामांकरणासंदर्भात विरोधाची भाषा वापरली. नामांतराआडून मराठी माणसांत संघर्ष घडवण्याचा डाव असल्याचा गंभीर आरोप शिशिर शिंदे यांनी भाजपवर केलाय. दादरचे नाव बदलण्याचा घाट हाणून पाडू, असेही शिशिर शिंदे म्हणाले.
दादर नामांतर मुद्द्यावर काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी प्रतिक्रिया दिलीय. यावर हरकत घेण्याचा विषय नाही. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे योगदान. तसेच ते अनंतात विलीन झाले ती दादरची स्मशानभूमी जिला आपण चैत्यभूमी म्हणतो. दादरला चैत्यभूमीचा उल्लेख होत होता. मात्र राज्य सरकारने हा निर्णय घेऊन चालणार नाही. केंद्र सरकारनेही हा निर्णय घेणे आवश्यक आहे. बोलाचाच भात अन् बोलाचीच कडी असा बोलघेवडेपणा मुख्यमंत्र्यांनी न करता केंद्राकडे हा प्रस्ताव तात्काळ पाठवावा. शिंदेंच्या शिवसेनेनं नामांतराला विरोध केला. यावरुनही हर्षवर्धन सकपाळ यांनी टीका केलीय. हे गॅंग ऑफ ट्रीपल इंजिन सरकार आहे. सरकारमध्ये धूसपूस चालू आहे. तुझ माझं जमेना आणि तुझ्यावाचून करमेना अशी स्थिती सरकारची असल्याचे हर्षवर्धन सकपाळ म्हणाले.