काँग्रेस खासदारांचा बसमधील Video Viral! महाराष्ट्रातील महिला खासदारासोबत काय घडलं पाहिलं का? थेट हायकमांडपर्यंत पोहोचलं प्रकरण
हा सारा प्रकार 1 नोव्हेंबर रोजी दिल्लीतील 'वोट बचाव, देश बचाव' रॅलीसाठी जाताना घडल्याची माहिती समोर येत आहे. नक्की या व्हायरल व्हिडीओत काय दिसतंय आणि यावरुन झालंय काय जाणून घ्या...
काँग्रेसच्या दिल्लीमधील आंदोलनातील एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होताना दिसत आहे. या व्हिडीओमध्ये काँग्रेसचे खासदार श्याम कुमार बर्वे हे महाराष्ट्रातील काँग्रेसच्या महिला खासदार प्रतिभा धानोरकर यांना चापक मारताना दिसत आहेत. व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर हे प्रकरण थेट काँग्रेस पक्षश्रेष्ठींपर्यंत गेल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
नेमकं काय आहे या व्हिडीओमध्ये?
काँग्रेसच्या दिल्लीमधील आंदोलनादरम्यान अनेक खासदारांना बसमधून आंदोलनस्थळापासून दूर नेण्यात आलं. मात्र याच बसमधील काँग्रेसच्या दोन खासदारांचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. व्हिडीओमध्ये खासदार प्रतिभा धानोरकर या बसलेल्या असून त्यांच्या बाजूलाच उभे असलेले खासदार श्यामकुमार बर्वे हे त्यांच्याशी बोलता बोलता अचानक त्यांना गालावर चापट मारताना दिसतात. आपल्या सहकाऱ्याने अचानक चापट मारल्याने प्रतिभा धानोरकर या काहीश्या आश्चर्यचकित झाल्यासारख्या वाटतात. त्यांच्या चेहऱ्यावर तसे भाव स्पष्टपणे दिसतात. दोघांमध्ये नेमकी काय चर्चा सुरु होती? बर्वेंनी धानोरकरांना चापट का मारली? नेमकं काय झालं? यासंदर्भातील माहिती समोर आलेली नाही. 1 नोव्हेंबर रोजी दिल्लीतील 'वोट बचाव, देश बचाव' रॅलीसाठी खासदार बसने जाताना हा प्रकार घडल्याचं सांगितले जात आहे.
ई-मेलवरुन वरिष्ठांकडे तक्रार
दरम्यान, सदर प्रकरणी काँग्रेसच्या नेत्यांनी वरिष्ठांकडे तक्रार केल्याची माहिती समोर आली आहे. काँग्रेसच्या काही पदाधिकाऱ्यांनी याबद्दल पक्षाचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे, राहुल गांधी सोनिया गांधी आणि केसी वेणू गोपाल यांच्याकडे ई-मेल द्वारे तक्रार केली आहे खासदाराच्या वर्तनामुळे पक्षाच्या प्रतिमेला धक्का बसल्याचा दावा करत शिस्तभंगाची कारवाई करण्याची मागणी केली आहे.
नेमकं तक्रारीमध्ये म्हटलंय काय?
"1 नोव्हेंबर रोजी नवी दिल्ली येथे आयोजित 'व्होट बचाव, देश बचाव' रॅलीदरम्यान खासदारांशी संबंधित घटनेबाबत त्वरित शिस्तभंगाची कारवाई करण्याची विनंती," या मथळ्याखाली तक्रारीचा ईमेल लिहिण्यात आला आहे. या ईमेलमध्ये काय म्हटलंय पाहूयात...
आदरणीय महोदय,
1 नोव्हेंबर 2026 रोजी नवी दिल्ली येथे आयोजित 'व्होट बचाव, देश बचाव' रॅलीदरम्यान घडलेली एक अत्यंत चिंताजनक घटना मी आपल्या निदर्शनास आणून देऊ इच्छितो. सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर प्रसारित होत असलेल्या व्हिडिओनुसार, खासदारांनी प्रवास करत असलेल्या बसमध्ये एक दुर्दैवी घटना घडली आहे. यात रामटेकचे माननीय खासदार श्री. श्यामकुमार बर्वे हे चंद्रपूरच्या माननीय खासदार श्रीमती प्रतिभा धानोरकर यांना थप्पड मारताना दिसत आहेत. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर मोठ्या प्रमाणावर व्हायरल झाला आहे, ज्यामुळे जनतेच्या मनात अत्यंत नकारात्मक प्रतिमा निर्माण झाली आहे आणि भारतीय राष्ट्रीय काँग्रेसलाही मोठी नामुष्की सहन करावी लागत आहे.
अशावेळी, जेव्हा आपला पक्ष लोकशाही, घटनात्मक मूल्ये, महिलांचा सन्मान आणि लोकशाही संस्थांचे संरक्षण यांसारख्या महत्त्वाच्या मुद्द्यांवर आवाज उठवत आहे, तेव्हा घडलेली ही घटना जनतेपर्यंत एक चुकीचा संदेश पोहोचवते. परिस्थिती काहीही असो किंवा व्यक्तींमधील मतभेद काहीही असोत, शारीरिक गैरवर्तन किंवा अशा प्रकारचे वर्तन कोणत्याही परिस्थितीत समर्थनीय ठरू शकत नाही; विशेषतः जो पक्ष समानता, प्रतिष्ठा आणि आदराच्या मूल्यांसाठी उभा आहे अशा पक्षाच्या निवडून आलेल्या लोकप्रतिनिधींकडून हे असं वर्तन स्वीकार्य नाही.
पक्षाने आपली संघटनात्मक शिस्त पाळणे, आपल्या महिला प्रतिनिधींच्या प्रतिष्ठेचे रक्षण करणे आणि अशा प्रकारचे वर्तन पक्षात अजिबात खपवून घेतले जाणार नाही, असा स्पष्ट संदेश देणे महत्त्वाचे आहे. मला आशा आहे की, माननीय काँग्रेस अध्यक्ष या गंभीर प्रकरणाची स्वतः दखल घेतील आणि लवकरात लवकर योग्य ती कारवाई केली होईल हे सुनिश्चित करतील.
खासदार बर्वेंची पहिली प्रतिक्रिया
दरम्यान, या प्रकरणासंदर्भात बोलताना खासदार बर्वे यांनी प्रतिभा धानोरकर या बहिणीसारख्या असून आपल्या बदनामीचा प्रयत्न केला जात असल्याचा आरोप केला आहे. आपण पत्र लिहून ही बदनामी कोण करतंय याची चौकशी करण्याची मागणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडे करणार आहोत, असं बर्वे यांनी म्हटलं आहे. त्यामुळे आता या प्रकरणी पुढे नेमकं काय घडतं हे पाहणं महत्त्वाचं आहे.