शिक्षक होण्याची इच्छा असूनही वयाची कमाल मर्यादा ओलांडल्यामुळे भरती प्रक्रियेपासून दूर राहावे लागणाऱ्या उमेदवारांसाठी महत्त्वाची बातमी आहे. महाराष्ट्रातील मान्यताप्राप्त खासगी व्यवस्थापनांच्या माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शाळांमधील शिक्षक तसेच शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या सरळसेवा भरतीसाठी आता कमाल वयोमर्यादेचे बंधन लागू राहणार नाही. काय आहे नवा नियम? याचा शिक्षक भरतीची तयारी करणाऱ्या उमेदवारांवर कसा परिणाम होणार? सविस्तर जाणून घेऊया.
आवश्यक शैक्षणिक आणि व्यावसायिक पात्रता असलेल्या उमेदवारांना केवळ वय जास्त असल्यामुळे शिक्षक भरतीतून बाद करता येणार नाही. शालेय शिक्षण विभागाने 5 नोव्हेंबर 2026 रोजी शासन निर्णय जारी करून याबाबत स्पष्टता दिली आहे.
हा निर्णय राज्यातील मान्यताप्राप्त खासगी व्यवस्थापनांच्या माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शाळांमधील थेट भरतीसाठी लागू आहे. म्हणजेच इयत्ता नववी ते दहावी आणि अकरावी ते बारावीच्या शाळांमधील शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या पदांचा यात समावेश होतो. महाराष्ट्र खासगी शाळांतील कर्मचारी नियमावलीनुसार या नियुक्त्यांसाठी कमाल वयोमर्यादा निश्चित करण्यात आलेली नाही.
शालेय शिक्षण विभागाच्या 7 फेब्रुवारी 2019, 7 मार्च 2019 आणि 11 ऑगस्ट 2026 रोजीच्या शासन निर्णयांमधील काही तरतुदींमुळे खासगी शाळांतील सरळसेवा भरतीसाठी कमाल वयोमर्यादा लागू आहे की नाही, याबाबत संभ्रम निर्माण झाला होता. क्षेत्रीय स्तरावरून यासंदर्भात शासनाकडे निवेदनेही प्राप्त झाली होती. त्यामुळे संबंधित तरतुदींचा नेमका अर्थ स्पष्ट करण्याची गरज निर्माण झाली. अखेर 5 नोव्हेंबरच्या शासन निर्णयाद्वारे या संभ्रमावर पडदा टाकण्यात आला. या तीन शासन निर्णयांतील कमाल वयोमर्यादेसंबंधीच्या तरतुदी संबंधित खासगी शाळांच्या भरतीसाठी गैरलागू ठरतील, असे सरकारने नमूद केले आहे.
कमाल वयोमर्यादा लागू नसली तरी उमेदवारांना नियुक्तीसाठी आवश्यक असलेली शैक्षणिक पात्रता, व्यावसायिक अर्हता आणि इतर नियम पूर्ण करावे लागतील. आरक्षणाचे निकष, कागदपत्र पडताळणी आणि निवड प्रक्रियेतील अटीही कायम राहतील. केवळ वयोमर्यादा नसल्यामुळे नियुक्तीचा थेट अधिकार मिळत नाही. या निर्णयामुळे वयामुळे संधी गमावण्याची भीती असलेल्या पात्र उमेदवारांना भरती प्रक्रियेत सहभागी होण्याचा मार्ग मोकळा झालाय.