महाराष्ट्रात आत्तापर्यंत कितीवेळा ऑपरेशन टायगर? किती नेते शिंदेंच्या शिवसेनेत?
गेल्या काही दिवसांपासून राज्यात पुन्हा एकदा ऑपरेशन टायगरच्या चर्चा सुरु झाल्यात.
महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ उडवून देणारी घटना म्हणजे 5 वर्षांपूर्वी राबवण्यात आलेले ऑपरेशन टायगर. एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाविरोधात बंड करत काही आमदार व खासदारांना सोबत घेऊन ठाकरेंचं सरकार पाडले. तेव्हापासून ऑपरेशन टायगर चर्चेत आलं आहे. आत्तापर्यंत दोनदा ऑपरेशन टायगर राबवत शिंदेंच्या शिवसेनेत अनेक खासदार-आमदारांसह महत्त्वाच्या पदाधिकाऱ्यांनी प्रवेश केला. आता पुन्हा एकदा ऑपरेशन टायगरची चर्चा रंगली आहे.
पहिल्यांदा कधी राबवलं ऑपरेशन टायगर
जून 2022 मध्ये एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाविरोधात बंड केले. यावेळी शिवसेनेचे 40 आमदार आणि 12 खासदार शिंदे यांच्यासोबत गेले आणि राज्यात सत्तांतर होऊन महायुतीचे सरकार स्थापन झाले. मंत्री उदय सामंत यांनी या ऐतिहासिक बंडाचा उल्लेख पहिले 'ऑपरेशन टायगर' म्हणून केला आहे.
जून 2026 मध्ये खासदारांचा पक्षप्रवेश
ऑपरेशन टायगर 2.0 मुळं पुन्हा एकदा उद्धव ठाकरे यांच्या पक्षाला मोठं खिंडार पडलं. ठाकरे गटाच्या 9 खासदारांपैकी 6 खासदारांनी शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश केला. या घडामोडीला ऑपरेशन टायगरचा सर्वात मोठा राजकीय विजय मानलं गेलं. त्याचबरोबर, नेते सचिन अहिर यांच्या पक्षप्रवेशानंतर शिंदे गटातील नेत्यांनी 'ऑपरेशन टायगर 3' सुरू झाल्याचा दावा केला होता. तसंच, ठाकरे गटातील आणखी आमदार पक्षप्रवेश करणार असल्याची चर्चा सुरू झाली.
कोणत्या सहा खासदारांनी पक्षप्रवेश केला?
संजय जाधव, संजय दिना पाटील, संजय देशमुख, ओमराजे निंबाळकर,नागेश पाटील आष्टीकर,भाऊसाहेब वाकचौरे
ऑपरेशन टायगरची पुन्हा चर्चा का?
14 नोव्हेंबर रोजी मंत्री उदय सामंत यांनी ऑपरेशन टायगरबाबत मोठं विधान केलं. चार वर्षांपूर्वी जसं मोठं ऑपरेशन झालं, तसंच काहीतरी पुन्हा होण्याचे संकेत त्यांनी दिले. त्यानंतर नव्या पक्षप्रवेशांबाबत राजकीय चर्चांना सुरुवात झाली. राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत आणि मंत्री संजय शिरसाट यांनी महाविकास आघाडीतील अनेक आमदार आणि नेते संपर्कात असून लवकरच तिसरे ऑपरेशन पार पडेल, असे संकेत दिले आहेत.