शिक्षक विभागाने 73 शिक्षकांना कायमस्वरूपी नोकरीवरून तडकाफडकी काढल्यामुळे एकच खळबळ माजली आहे. बोगस शिक्षक भरती प्रकरणात ही कारवाई करण्यात आली आहे. धक्कादायक म्हणजे हा आकडा वाढण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. ही कारवाई बीड जिल्ह्यात शिक्षकांवर झाली आहे. 73 शिक्षकांमध्ये प्राथमिक विभागातील 7 तर माध्यमिक विभागातील 66 शिक्षकांनी नोकरी गमावली आहे.
महाराष्ट्रात 2012 पासून शिक्षक भरती बंद आहे. तरीदेखील राज्यात शिक्षकांची भरती झाल्याची बाब समोर आली. न्यायालयांच्या सूचनांचा सोयीस्कर अर्थ लावून या शिक्षकांना नोकरी देण्यात आली होती. तर काही ठिकाणी संच मान्यतेच्या दुरुस्तीच्या नावाखाली पदं वाढवण्यात आली आहेत, अशी माहिती समोर आली. तर इतर ठिकाणी बनावट विद्यार्थ्यांच्या आधारे संच मान्यतेचे पद वाढवण्यात आल्याचा धक्कादायक प्रकारही उघड झाल्यामुळे शिक्षण क्षेत्रात खळबळ माजली. तसापात असं समोर आलं की यासाठी मोठ्या प्रमाणात बनावट कागदपत्रे वापरण्यात आली. याप्रकरणी आणखी 2217 बोगस पद निर्माण करुन भरती झाल्याचे समोर आलं. या शिक्षकांवरही कारवाईची टांगती तलवार आहे, अशी माहिती समोर आली आहे. याच बोगस शिक्षक भरतीमध्ये 73 जणांवर शिक्षण विभागाने सेवा समाप्त करून मोठा धक्का दिला आहे.
बीडमधील शिक्षण भरती घोटाळा हा सामाजिक कार्यकर्ते सादेक इनामदार यांच्यामुळे बाहेर आला आहे. एसआयटीकडे सादेक इनामदार यांनी तक्रार केली. तपासात जे सत्य समोर आलं त्यानंतक बीडमधील शिक्षण विभागात एकच खळबळ माजली.
यापूर्वीही जानेवारी 2023 मध्ये बीड जिल्ह्यातील 52 शिक्षकांना काढण्यात आलं होतं. बदली करण्यासाठी अनेक शिक्षकांनी बोगस दिव्यांग प्रमाणपत्र काढल्याचे समोर आले होते. जेव्हा अंबाजोगाई येथील स्वामी रामानंद तीर्थ रुग्णालयात 236 शिक्षकांची पुनर्तपासणी केल्यावर 52 शिक्षकांनी बोगस प्रमाणपत्र घेतल्याच उघड झालं.