हिवाळ्याची चाहूल की हवामान बदल? किमान तापमानात घट सुरू, महाराष्ट्रात थंडी कधी सुरू होणार?
महाराष्ट्रात थंडी कधी सुरू होणार? असा प्रश्न सध्या उपस्थित होत आहे. जाणून घेऊयात सविस्तर
ऑक्टोबर महिना संपत आला आहे. यंदा पाऊस कमी झाला आहे. एल निनोमुळं ऑक्टोबरमध्ये उन्हाचा चटका अधिक जाणवत होता. ऑक्टोबरमध्ये उन्हाचा पारा 37 अंशावर पोहोचला आहे. उन्हाच्या काहिलीमुळं नागरिकांना घाम फुटला आहे. तसंच, उष्णतामुळं अनेक आजारांत वाढही झाली आहे. त्यामुळं हिवाळा कधी सुरू होणार, याची आतुरतेने नागरिक वाट पाहत आहेत. महाराष्ट्रातील सर्वच जिल्ह्यांत किमान तापमानात घट सुरू झाली आहे. त्यामुळं पहाटे आणि सकाळी थंड वातावरण असते.
महाराष्ट्रातील हवेचा दाब वाढत असून ऑक्टोबर महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात थंडीची चाहूल सुरू होईल. बंगालच्या उपसागरावर चक्राकार वारे वाहण्यास सुरुवात होईल. आय.ओ.डी पॉझिटिव्ह होत असल्याने ते चक्रीवादळ आंध्र प्रदेशावरुन महाराष्ट्राच्या दिशेने येणे शक्य आहे. त्यावेळी काही दिवस महाराष्ट्राच्या पूर्व भागात पावसाची शक्यता आहे.
कोकणातील सिंधुदुर्ग, रायगड, पालघर, उत्तर महाराष्ट्रातील धुळे, नंदुरबार, जळगाव, मराठवाड्यातील, धाराशिव, बीड, जालना तसेच पश्चिम महाराष्ट्रातील कोल्हापूर, सांगली, सातारा, सोलापूर, पुणे, या जिल्ह्यातील काही भागात पावसाची शक्यता आहे.
महाराष्ट्रातील सर्वच जिल्ह्यात वाऱ्याचा ताशी वेग 2 ते 4 किमी इतका राहील. बहुतांशी जिल्ह्यात वाऱ्याची दिशा ईशान्येकडून राहील. सकाळच्या व दुपारच्या आर्द्रेतेत घट होईल आणि हवामान कोरडे राहिल. महाराष्ट्रातील बहुतांश भागात आकाश अल्पशा प्रमाणात ढगाळ राहिल. या वर्षी हिवाळ्यात थंडीत चढ-उतार जाणवतील. थंडीचे प्रमाण मध्यम स्वरुपात राहील.
एल निनो तीव्र होणार
वितळणारे हिमालयातील ग्लेशियर्स, अनिश्चित मान्सून आणि किनारपट्टीच्या भागांवर घोंगावणारे धोके - भारत सध्या हवामान बदलाच्या या कडू वास्तवाचा सामना करत आहे. अशा जागतिक संकटाचा सामना करण्यासाठी संयुक्त राष्ट्रांची संस्था 'इंटरगव्हर्नमेंटल पॅनेल ऑन क्लायमेट चेंज' (आयपीसीसी) चा रिपोर्ट जगासाठी मुख्य मार्गदर्शक ठरतो. मात्र, या संस्थेच्या ७व्या मूल्यमापन अहवालाला पूर्ण करण्यासाठी निश्चित करण्यात आलेल्या 2028 च्या वेळेवर भारतासह अनेक देशांनी तीव्र आक्षेप घेतला आहे.