MPSC स्पर्धा परीक्षा देणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! पदसंख्येत मोठी वाढ, कमाल वयोमर्यादेत बदल अन् परीक्षेची तारीखही जाहीर
MPSC स्पर्धा परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांना सरकारने दिवाळी गिफ्ट दिलं आहे. MPSCमार्फत घेण्यात येणाऱ्या गट-क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा-2026 मधील पदसंख्येत वाढ करण्यात आली आहे.
महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत घेण्यात येणाऱ्या 'महाराष्ट्र गट-क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा-2026' ची वाट पाहणाऱ्या लाखो परीक्षार्थींसाठी आनंदाची बातमी आहे. राज्य सरकारने यासंदर्भात मोठा निर्णय घेतला आहे. पहिली आनंदाची बातमी म्हणजे या परीक्षेतील पदसंख्येत राज्य सरकारने विक्रमी वाढ केली आहे. आता ही परीक्षा तब्बल 16,717 पदांसाठी घेण्यात येणार आहे. एवढंच नाहीतर कमाल वयोमर्यादेत बदल करत विद्यार्थ्याना मोठा दिलासा दिला आहे. हो, कमाल वयोमर्यादेत एक वर्षाची शिथिलता देण्यात आली आहे. याबद्दलची घोषणा अधिकृत शुद्धिपत्रक आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध केलं आहे.
स्पर्धा परीक्षेत अधिक पारदर्शक, सुरक्षित व विश्वासार्ह आणण्यासाठी 4 सप्टेंबर 2026 अन्वये उच्चस्तरीय समिती गठित केली गेली होती. या समितीने केलेल्या प्रमुख शिफारशीला राज्य सरकारने मान्यता दिली आहे.
विद्यार्थ्यांना सरकारचे दिवाळी गिफ्ट
गेल्या वर्षभरात गट-क सेवा भरती प्रक्रियेतील पदसंख्येचा टप्प्याटप्प्याने बदल करण्यात आला. यापदाबद्दल पहिली जाहिरात ही 25 जून 2026 प्रसिद्ध झाली होती, ज्यात 2,619 पद होती. त्यानंतर पहिले शुद्धिपत्रक 22 जुलै 2026 यात 3,088 नवीन पदांचा समावेश करण्यात आला. आता राज्य सरकारच्या निर्णयानंतर 6 नोव्हेंबर 2026 या 11,010 पदांचा समावेश केल्यामुळे ही पदसंख्या आता 16,717 वर गेली आहे. या निर्णयाचा लाभ या परीक्षेतील सर्व पात्र उमेदवारांना मिळणार आहे.
त्यामुळे आता नव्याने अर्ज करण्याची संधी विद्यार्थ्यांना मिळाली आहे. त्यामुळे आता वाढीव पदांमुळे नवीन उमेदवारांना 13 ते 27 नोव्हेंबर 2026 या ठराविक तारखेत आयोगाच्या संकेतस्थळावर नव्याने अर्ज भरायचा आहे. तर ज्यांनी यापूर्वी अर्ज केला आहे, त्यांच्या विचार करून त्या अर्जात नवीन समाविष्ट संवर्गांसाठी विकल्प (Option Form) भरता येणार आहे. या विद्यार्थ्यांना नवीन अर्ज सादर करण्याची गरज नाही, असं आयोगाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.
परीक्षा कधी असणार आहे?
पदसंख्या वाढवल्यामुळे परीक्षेच्या तारखेतही बदल करण्यात आला आहे. यापूर्वी ही परीक्षा 3 जानेवारी 2027 घेण्यात येणार होती. पण आता ही परीक्षा 24 जानेवारी 2027 रोजी घेण्यात येणार आहे. सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे सर्व संवर्गांसाठी एकच संयुक्त पूर्व परीक्षा ऑफलाइन (OMR / ओएमआर) पद्धतीने 15 नोव्हेंबर 2022 रोजी प्रसिद्ध केलेल्या अधिकृत अभ्यासक्रमानुसारच घेण्यात येणार आहे. तर विशिष्ट शैक्षणिक अर्हता लागणाऱ्या नवीन संवर्गांसाठी स्वतंत्र मुख्य परीक्षा घेण्यात येणार आहे, असं मुख्य परीक्षेबद्दल आयोगाने स्पष्ट केलं आहे. तर याबद्दल अभ्यासक्रम लवकरच एमपीएससीच्या वेबसाईटवर प्रसिद्ध करण्यात येणार आहे, असं आयोगाने सांगितलं आहे.