मिरा-भाईंदर महापालिकेच्या ताटातून मासे-मटण गायब! का मोडली 25 वर्षांची परंपरा; असं नेमकं काय घडलं?
मिरा-भाईंदर महापालिकेच्या महासभेतील जेवणातून सहा महिन्यांपासून मासे, चिकन-मटण गायब झालंय. 25 वर्षांची परंपरा बदलल्याने आगरी-कोळी नगरसेवक नाराज झालेयत. दरम्यान भाजपवर विरोधकांनी निशाणा साधलाय.
मिरा-भाईंदर महानगरपालिकेच्या महासभेतील जेवणाच्या मेन्यूवरून नवा वाद निर्माण झाला आहे. गेल्या सहा महिन्यांपासून महासभेच्या जेवणातून मासे, चिकन आणि मटणाचे पदार्थ वगळण्यात आल्याने आगरी-कोळी समाजातील नगरसेवकांसह विरोधकांनी नाराजी व्यक्त केली आहे. मिरा-भाईंदर पालिकेमध्ये काय घडलंय नेमकं? सविस्तर जाणून घेऊया.
काय घडलंय नेमकं?
मिरा-भाईंदर महानगरपालिकेतील राजकीय वातावरण सध्या एका वेगळ्याच मुद्द्यावरून तापलंय. महापालिकेच्या महासभेतील जेवणाच्या मेन्यूमधून मासे, चिकन आणि मटण गायब झाल्याने वाद निर्माण झाला आहे. गेल्या 25 वर्षांपासून सुरू असलेली शाकाहारी आणि मांसाहारी जेवणाची पद्धत बदलून मागील सहा महिन्यांपासून केवळ शाकाहारी जेवण दिलं जातंय. या बदलावरून विरोधकांसह सत्ताधारी भाजपमधील काही आगरी-कोळी नगरसेवकांनीही नाराजी व्यक्त केली आहे.
महासभेच्या जेवणात नेमका काय बदल झाला?
मिरा-भाईंदर महापालिकेची महासभा तीन तासांपेक्षा अधिक काळ चालल्यास नगरसेवक, अधिकारी आणि पत्रकारांसाठी जेवणाची व्यवस्था केली जाते. पूर्वी या जेवणात शाकाहारी पदार्थांसोबत स्थानिक खाद्यसंस्कृतीनुसार मासे, चिकन आणि मटणाचे पर्यायही उपलब्ध असायचे. ही पद्धत जवळपास 25 वर्षांपासून सुरू होती. मात्र, मागील सहा महिन्यांपासून जेवणात केवळ शाकाहारी पदार्थ दिले जात असल्याने हा बदल चर्चेचा विषय ठरला आहे.
आगरी-कोळी नगरसेवकांची नाराजी का?
मिरा-भाईंदर परिसराला आगरी-कोळी समाजाची ऐतिहासिक आणि सांस्कृतिक पार्श्वभूमी आहे. या समाजाच्या खाद्यसंस्कृतीत मासे आणि अन्य मांसाहारी पदार्थांना महत्त्वाचे स्थान आहे. त्यामुळे महापालिकेच्या अधिकृत जेवणातून हे पदार्थ वगळण्याच्या निर्णयावर स्थानिक प्रतिनिधींनी आक्षेप घेतला आहे. विशेष म्हणजे, सत्ताधारी भाजपमधील काही आगरी-कोळी नगरसेवकही या बदलामुळे नाराज आहेत.
शिवसेना आणि काँग्रेसचा निर्णयाला विरोध
शिवसेना आणि काँग्रेसच्या नगरसेवकांनीही या बदलावर प्रश्न उपस्थित केले आहेत. शिवसेनेच्या नगरसेविका शर्मिला बगाजी यांनी याला खाद्यसंस्कृतीशी संबंधित मुद्दा असल्याचे सांगत विरोध दर्शवला. काँग्रेसचे अनिल सावंत यांनीही ऐच्छिक जेवणामध्ये मांसाहारी पर्याय रोखणे योग्य नसल्याची भूमिका मांडली. जेवणात विविध पर्याय उपलब्ध असणे अपेक्षित असल्याचे ते सांगतात.
जैन मतदारांच्या राजकारणाचा आरोप
या बदलामागे जैन समाजाच्या मतपेढीचे राजकारण असल्याचा आरोप विरोधकांकडून केला जात आहे. दुसरीकडे उपमहापौर ध्रुव किशोर पाटील यांनी विविध धर्मांच्या लोकांना स्वीकारता येईल असे जेवण देण्याच्या उद्देशाने शाकाहारी पर्याय निवडल्याचे सांगितले. त्यामुळे या निर्णयामागील नेमकी प्रक्रिया आणि आदेश कोणाचा?, हा प्रश्न उपस्थित झाला आहे.
महापालिका प्रशासनाने काय म्हटलं?
महापालिका सचिव दिनेश कानगुडे यांनी तीन तासांपेक्षा जास्त काळ महासभा चालल्यास जेवणाची व्यवस्था केली जाते, एवढीच माहिती दिली. जेवण शाकाहारी की मांसाहारी, याबाबत त्यांनी स्पष्ट उत्तर देणे टाळले. त्यामुळे मेन्यू बदलण्याचा अधिकृत आदेश, त्यामागील कारण आणि निर्णय घेणारी यंत्रणा याबाबत स्पष्टता येणे बाकी आहे.