लेकीसोबत दिवाळी सुट्टीसाठी माहेरी आली, मित्रासोबत गाडीतून फिरायला गेली अन् पुण्यातील एअर हॉस्टेसची जंगलात सापडली बॉडी
पुण्यात राहणारी एअरहोस्टेस वर्षा तुरकर लेकीसोबत दिवाळीच्या सुट्टीनिमित्त माहेरी गेली होती. इथे जंगलात तिचा मृतदेह अत्यंत संशयास्पद परिस्थितीत आढळला आहे.
पुण्यातील धानोरी परिसरातील एका खासगी विमान कंपनीत एअर हॉस्टेस विवाहित महिला दिवाळीच्या सुट्टी माहेरी गेली होती. तिथे जंगलात तिचा मृतदेह आढळल्यामुळे एकच खळबळ माजली होती. 14 नोव्हेंबर रोजी गोंदिया जिल्ह्यातील बोंडराणी जंगल परिसरात मृतदेह आढळला आहे. वर्षा आपल्या तीन वर्षीय मुलीसह माहेरी गेली होती.
मित्रासोबत गाडीतून फिरायला गेली अन्...
मिळालेल्या माहितीनुसार, वर्षा 14 नोव्हेंबर रोजी संध्याकाळी 4 वाजता मुलीला आई-वडिलांकडे ठेवून ती मित्र नितेश नरेश अग्रवाल याच्यासोबत कारने बाहेर फिरायला गेली. अर्जुनी-बोंडराणी इथल्या वैनगंगा नदी काठावरील श्रीराम मंदिर परिसरातील जंगलात त्यांनी कार उभी थांबवली. संध्याकाळी 5.30 ते 6 च्या सुमारास दोघे जंगलात बसून गप्पा मारत असताना तीन अज्ञात व्यक्ती आले. या तिघांनी चाकूचा धाक दाखवून त्या दोघांना लुटमार करण्याचा प्रयत्न केला. यादरम्यान, त्यातील एका हल्लेखोराने वर्षा यांच्यावर चाकूने प्राणघातक हल्ला केल्याची माहिती नितेशने वर्षांच्या कुटुंबीयांना दिली. या घटनेची कुणकुण लागताच खैरलांजी पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत मृतदेह ताब्यात घेतला आणि उत्तरीय तपासणीसाठी रुग्णालयात पाठवला.
हेसुद्धा वाचा - भंडाऱ्यात रात्रीच्या वेळी दोन विद्यार्थिनींना एसटीमधून खाली उतरवलं, नेमकं काय घडलं?
सात वर्षांपूर्वी प्रेमविवाह...
वर्षाचं 2019 मध्ये प्रेमविवाह झाला होता. त्यांना तीन वर्षांची एक गोंडस मुलगी आहे. वर्षा ही रविवारी पुण्याला परतणार होत्या, तत्पूर्वीच हा घातपात घडला. खैरलांजी पोलिसांनी या प्रकरणाची माहिती गोंदिया पोलिसांना दिल्यानंतर स्थानिक गुन्हे शाखा आणि दवनीवाडा पोलिसांनी संयुक्तपणे तपासाची चक्रे वेगाने हलवली आहेत. आरोपींचा शोध घेण्यासाठी श्वानपथकाची देखील मदत घेतली जात आहे. याप्रकरणी मृत वर्षा यांच्यासोबत असणारे त्यांचे मित्र नितेश अग्रवाल यांना चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आले असून, घटना महाराष्ट्राच्या हद्दीत घडल्याने पुढील तपास दवनीवाडा पोलिसांकडे वर्ग करण्याची तयारी सुरू आहे.
एका कीर्तनकार महाराजांचा मृतदेह सापडला
दरम्यान रात्री गावात कीर्तन करून मठात परतलेल्या एका कीर्तनकार महाराजांचा मृतदेह सकाळी गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळून आलाय. भोकरदन तालुक्यातील अवघडराव सावंगी येथे ही धक्कादायक घटना समोर आली आहे. विशेष म्हणजे, घटनास्थळावरून महाराजांचा मोबाईल फोन गायब असल्यामुळे या प्रकरणाचे गूढ आणखी वाढले असून, यामुळे परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.41 वर्षीय देवेंद्र चैतन्य स्वामी तथा दौलत रामनाथ सातपुते महाराज असं मृतदेह आढळून आलेल्या महाराजांचं नाव आहे.ते मूळ नाशिक जिल्ह्यातील मुसळगाव येथील रहिवासी आहेत. मागील 8 ते 10 वर्षांपासून भोकरदन तालुक्यातील अवघडराव सावंगी येथील पाताळेश्वर मंदिर परिसरातील मठात वास्तव्यास होते.