सोशल मीडियावर 'मंथन' नावाने बनावट इन्स्टाग्राम अकाउंट तयार करून, एआयच्या मदतीने फोटो एडिट करत स्वतःला १७ वर्षीय कॉलेज विद्यार्थी भासवणाऱ्या ३९ वर्षीय विवाहित तरुणाने १४ वर्षीय अल्पवयीन मुलीचे लैंगिक शोषण केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. महेंद्र गणपत घाडीगावकर असे आरोपीचे नाव असून, त्याला न्यायालयाने २१ नोव्हेंबरपर्यंत तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.
आरोपी विवाहित व एका मुलीचा पिता असूनही मित्राच्या नावावरील सिमकार्ड वापरत होता. जानेवारी २०२६ मध्ये नववीत शिकणाऱ्या मुलीशी मैत्री करत त्याने आपण १७ वर्षांचे असल्याचे भासवले. जुलै ते ५ नोव्हेंबर दरम्यान शाळेच्या वेळेपूर्वी मुलीला निर्जनस्थळी नेऊन त्याने अत्याचार केला. मुलीची मासिक पाळी चुकल्याने पालकांना संशय आला आणि हा प्रकार उघडकीस आला.
१५ नोव्हेंबर रोजी फिर्याद दिल्यानंतर पोलिसांनी तातडीने तपास करत आरोपीला बेड्या ठोकल्या. सुरुवातीला त्याने दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला, मात्र पीडितेने ओळख पटवल्याने त्याचे बिंग फुटले.
सोशल मीडिया आणि एआयचा गैरवापर
या घटनेने सोशल मीडिया आणि कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय) तंत्रज्ञानाच्या धोक्यांचा गंभीर प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आणला आहे. अल्पवयीन मुलांना फसवण्यासाठी भामटे कशा प्रकारे आधुनिक तंत्रज्ञानाचा गैरवापर करत आहेत, हे या प्रकरणावरून स्पष्ट होते.
या संतापजनक प्रकरणानंतर पालकांमध्ये खळबळ उडाली आहे. पालकांनी आपल्या मुलांच्या ऑनलाइन वापरावर, मोबाइलच्या वापरावर आणि शाळा-क्लासच्या दैनंदिन वेळापत्रकावर सतत बारीक लक्ष ठेवण्याची गरज निर्माण झाली आहे.
कणकवली तालुक्याच्या परिसरातील एका शाळेत नववीत शिकणाऱ्या 14 वर्षीय मुलीशी जानेवारी 2026 मध्ये महेंद्र उर्फ मंथन याची इन्स्टाग्रामवरून ओळख झाली. सुरुवातीला चॅटिंग आणि हळूहळू ऑनलाइन मैत्रीचे रूपांतर प्रेमात झाले. मुलीचा विश्वास संपादन करण्यासाठी महेंद्रने आपण केवळ 17 वर्षांचे असून कणकवलीतील एका कॉलेजमध्ये शिक्षण घेत असल्याचे सांगितले. प्रत्यक्षात 39 वर्षांचा असलेला हा व्यक्ती स्वतःची खरी ओळख लपवून अल्पवयीन मुलीसमोर तरुण असल्याचे भासवत होता. या खोट्या ओळखीच्या आधारे त्याने मुलीला प्रेमाच्या जाळ्यात ओढल्याचा आणि तिच्याशी शारीरिक संबंध ठेवल्याचा आरोप त्याच्यावर आहे.
जानेवारीमध्ये इन्स्टाग्रामवर सुरू झालेली ओळख जुलै 2026 पासून प्रत्यक्ष भेटींपर्यंत पोहोचली. कणकवली पोलीस ठाण्याच्या हद्दीतील असरोंडी गावात रस्त्यापासून सुमारे 300 ते 400 मीटर आत जंगलाच्या परिसरात या भेटी होत असल्याचे तपासात समोर आले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, पीडित मुलगी घरातून वेगवेगळी कारणे सांगून शाळेच्या वेळेपूर्वी घरातून बाहेर पडत होती. त्यानंतर महेंद्र मोटारसायकल घेऊन तेथे पोहोचत असे, यानंतर मुलीला दुचाकीवरून संबंधित जंगलात या ठिकाणी घेऊन जायचा. जुलै ते 5 नोव्हेंबर 2026 या कालावधीत हा प्रकार सुरू असल्याचे समोर आले आहे. मात्र या संपूर्ण प्रकाराचा उलगडा मुलीची मासिक पाळी चुकल्यानंतर झाला.