संभाजीनगर हादरले! बाप-लेकाच्या दुहेरी हत्याकांडाने खळबळ, क्षुल्लक कारणावरुन वाद अन्...
क्षुल्लक कारणावरुन झालेला वाद जीवावर बेतल्याची घटना घडली आहे. संभाजीनगरमध्ये दुहेरी हत्याकांडाने खळबळ उडाली आहे.
छत्रपती संभाजीनगर येथे एक धक्कादायक घटना समोर आली आहे. बाप-लेकाच्या दुहेरी हत्याकांडाने एकच खळबळ उडाली आहे. रांजणगाव शेणपुंजीत ही घटना घडली आहे. तर, हरियाणाला पळून जाण्याच्या तयारीत असताना रेल्वे स्टेशन परिसरातून पोलिसांनी कारवाई करत आरोपींना अटक केली आहे.
छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील रांजणगाव शेणपुंजी येथील एकतानगर परिसरात जुन्या वादातून बाप-लेकाची हत्या झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. बाबासाहेब कीर्तिकर आणि त्यांचा मुलगा नेहाल कीर्तिकर अशी मृतांची नावे आहेत. या दुहेरी हत्याकांडानंतर एमआयडीसी वाळूज पोलिसांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवत काही तासांत पाच संशयितांना ताब्यात घेतले. या गंभीर हल्ल्यात जबर रक्तस्त्राव झाल्याने दोघांचाही जागीच तडफडून मृत्यू झाला.
हरियाणाला पळून जाण्याच्या तयारीत असताना रेल्वे स्टेशन परिसरातून ही कारवाई करण्यात आली. रेल्वे स्टेशन परिसरातून गयचंद कुटुंबातील दोन महिलांसह पाच संशयितांना अटक केली. वरिष्ठ पोलीस निरीक्षक रामेश्वर गाडे यांच्या मार्गदर्शनाखाली, पोलीस उपनिरीक्षक सागर पाटील यांच्या नेतृत्वाखाली विशेष पथकाने ही कारवाई केली. जुन्या वादातून झालेल्या या हत्याकांडामागील नेमके कारण आणि संशयितांची भूमिका याबाबत पोलिसांचा पुढील तपास सुरू आहे.
पालघरमध्ये मुलाकडून पित्याची निर्घृण हत्या
पालघर पूर्वेतील रामनगर परिसरात मुलानेच आपल्या 55 वर्षीय वडिलांची ग्लाँडरने गळा कापून हत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. मोहनलाल परमार असे मृत व्यक्तीचे नाव असून, या प्रकरणी त्यांचा 28 वर्षीय मुलगा मुकेश परमार याला गुजरातमधील भरूच येथून पोलिसांनी अटक केली आहे.
फोनला प्रतिसाद मिळत नसल्याने या हत्येचा प्रकार उघडकीस आला. आर्थिक व्यवहारातून हा खून झाल्याचा प्राथमिक संशय असून, पालघर पोलीस अधिक तपास करत आहेत.पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे.