संभाजीनगर हादरलं! मामेबहिणीशी बोलण्याचा राग, रात्री 11 वाजता दुचाकीवरून आला अन्...
छत्रपती संभाजीनगरमध्ये धक्कादायक घटना समोर आली आहे. मामेबहिणीशी बोलतो म्हणून झालेल्या वादात एका तरुणाची हत्या झाली आहे.
छत्रपती संभाजीनगरमध्ये एक धक्कादायक घटना समोर आली आहे. एका किरकोळ कारणावरून तरुणाची हत्या करण्यात आली आहे. मामेबहिणीशी बोलत असल्याच्या रागातून दोन तरुणांचा वाद झाला. त्यातून एकाची हत्या करण्यात आली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार 19 वर्षीय तरुणाची चाकू भोसकून हत्या करण्यात आली. ही घटना गारखेडा परिसरातील साईनगर परिसरातील आहे. 14 ऑक्टोबर रोजी रात्री सुमारे 11 वाजता या घटनेमुळे परिसरात खळबळ माजली आहे. तौसिफ शमीम शेख असं मृत तरुणाचे नाव असून आदित्य शेळके या तरुणाने त्याची हत्या केली आहे. सध्या तो फरार असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार तौसिफ शमीम शेखच्या हत्येप्रकरणात त्याचा चुलत भाऊ मुजम्मील जमील शेख याने पोलिसांकडे तक्रार दाखल केली आहे. मुजम्मील जमील शेख याने पोलिसांना तक्रारीत सांगितलं की, तौसिफ शेख हा आई-वडिलांसह राहत होता. शिवाय कुटुंबाच्या उदरनिर्वाहसाठी तोसेंट्रिंगचे काम करायचा. बुधवारी रात्री 10 वाजता जेवण झाल्यानंतर मी आणि तौसिफ नूर मस्जिदच्या पाठीमागे गप्पा मारत बसले होते. त्यावेळी अचानक आदित्य शेळके तिथे आला. आदित्यने तौसिफला विचारलं तू माझ्या मामेबहिणीशी का बोलतो. यावरून दोघांमध्ये वाद झालेत. हा वाद अतिशय टोकाला जात होता, हे पाहून मी तौसिफला घरी जाण्यास सांगितलं. त्यावेळी आदित्यने तौसिफला जीवे मारण्याची धमकी दिली होती.
त्यानंतर काही वेळानंतर मुजम्मील आपल्या घरी गेला आणि तौसिफ घरासमोरील मोटारसायकलवर बसून मोबाईल पाहत होता. त्यावेळी रात्रीचे 11 वाजले होते. आदित्य पुन्हा आला आणि यावेळी त्याच्या हातात चाकू होता. त्याने तौसिफच्या छातीवर चाकूने जोरदार हल्ला केला. या हल्ल्यामुळे तौसिफ बाइकवरून खाली कोसळला. आदित्यने तौसिफच्या चेहऱ्यावर आणि डोक्यावर चाकूने वार केले होते, असं त्याने पोलिसांना सांगितलं.
हा हल्ला पाहून मी आणि इतर स्थानिक लोक तौसिफच्या मदतीला धावलो. पण तोपर्यंत आदित्य घटनास्थळावरून पळून गेला होता. या हल्ल्यात तौसिफ गंभीर जखमी झाला होता. त्याला बाईकवरून तातडीने एमजीएम रुग्णालयात नेण्यात आलं. पण डॉक्टरांनी तपास करता क्षणी त्याला मृत घोषित केलं. दरम्यान पोलीस आदित्यचा शोध घेत आहे. तर पोलिसांच्या तक्रारीत तौसिफच्या छातीसह नाक आणि डोक्यावर जखमा झाल्याचे नमूद करण्यात आलंय.