'महाराष्ट्रातून 100% भाजप संपणार'; मनोज जरांगेंचा मोठं वक्तव्य, थेट पंतप्रधानांकडे…
ऑडिओ क्लिपवरून महाराष्ट्रात राजकारण पेटलं असताना मनोज जरांगे पाटील यांनी आज पत्रकार परिषदेत मोठं वक्तव्य केलं आहे.
मराठा नेते मनोज जरांगे पाटील यांनी पत्रकार परिषदेत एक ऑडिओ क्लिप ऐकून महाराष्ट्राच्या राजकारणात भूकंप केला. या ऑडिओ क्लिपचा संबंध खासदार श्रीकांत शिंदेंशी असल्याने महाराष्ट्रातील राजकारणात नेते मंडळी एकमेकांवर आरोप करत सुटले आहेत. तर मुख्यमंत्र्यांनी एसआयटी चौकशी करावी अशी मागणी जोर धरत आहे. ही ऑडिओ क्लिप खरी आहे की खोटी, कोणी समोर आणली, असे अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत. अशातच मनोज जरांगे पाटीलही काही शांत बसत नाहीय. रोज पत्रकार परिषद घेऊन ते मोठे मोठे दावे करत आहेत. शनिवारी त्यांनी महाराष्ट्रातून भाजप संपू शकतो, असा दावा केला आहे.
मनोज जरांगे पाटील नेमकं काय म्हणालेत?
मनोज जरांगे पाटील म्हणालेत की, माझ्या मुद्दा एवढाच आहे की, मला 500 कोटी देऊन मराठा आंदोलन संपवण्याचा घाट का घातला. गेल्या तीन वर्षांपासून हे आंदोलन संपलं पाहिजे म्हणून मोठं मोठं संकट उभं का करत आहेत, याचे उत्तर जाणून घेणे माझ्यासाठी महत्त्वाचे आहे. तुम्ही जर ती ऑडिओ क्लिप ऐकली ना इतकी भयानक कट रचला आहे ना. तोंडावर गोड बोलायचं आणि पाठीमागे मोठं षडयंत्र हे फारच भयानक आहे. कधी बाहेर न येणारे षडयंत्र आपण बाहेर काढलं आहे. मी याच्या मूळाशी जाणार आहे. एकनाथ शिंदेंनी पण या प्रकरणाच्या मूळाशी गेलं पाहिजे. जरी ती आपली माणसं असली तरी सोडले नाही पाहिजे.
ते पुढे म्हणालेत की, हा विषय गंभीर असून यात पंतप्रधान मोदींनी लक्ष घालावं. नाही तर भाजप शंभर टक्के महाराष्ट्रात संपुष्टात येऊ शकतो. फडणवीस आणि मोदींच्या परस्पर पडद्यामागे हे सुरू असेल तर भयंकर आहे. ही विचारधारा देशाला परवडणारी नाही. सर्व नेत्यांना समजलं आहे, हे नेटवर्क किती मोठं आहे. त्यामुळे नेत्यांनी पुढे येत नाव घ्यायला सुरु केली आहे. कारण या नेत्यांना धक्का बसला आहे. आता नेते मंडळांच्या दिल्लीच्या वाऱ्या सुरू होऊ शकतात आणि आमच्याच विरोधात, त्यामुळे महाराष्ट्रातील जनतेने सावध राहावं. शिंदे साहेबांच्या लोकांकडून लोक फोडणं सुरु आहे. बायांचे आरोप करायचे, कुठे पैशाचे आरोप करायचे, जमेल ते आरोप करुन बदनाम करायचं.
फडणवीस यांच्याबद्दल बोलताना मनोज जरांगे पाटील म्हणालेत, फडणवीस साहेबांकडूनही मराठा आंदोलनात फोडीचं राजकारण चालू आहे. जर फडणवीस साहेबांच्या लोकांना वाटत असेल की फडणवीस साहेब असं करू शकत नाही, तर पुराव्यासहीत दाखवून देतो.