डॉक्टर की हैवान? महिलांना गुंगीचं औषध देऊन लैंगिक छळ; व्हिडीओ बनवून...' BJP पदाधिकाऱ्याचेही नाव समोर; काय घडलंय नेमकं?
छत्रपती संभाजीनगरच्या फुलंब्रीत महिला रुग्णावर गुंगीचे औषध देऊन लैंगिक अत्याचार केल्याचा आरोप आहे. याप्रकरणी डॉक्टर रामदास तरटे आणि भाजप पदाधिकारी उत्तम ढोके अटकेत असून व्हिडिओ प्रकरणाचा तपास सुरू आहे.
डॉक्टरकडे उपचारासाठी गेलेल्या महिला रुग्णावर गुंगीचे औषध देऊन लैंगिक अत्याचार केल्याचा आणि या घटनेचे व्हिडिओ व्हायरल केल्याचा गंभीर प्रकार फुलंब्रीमध्ये समोर आला आहे. या प्रकरणात पोलिसांनी डॉक्टर रामदास महादू तरटे आणि भाजपचे फुलंब्री शहराध्यक्ष उत्तम भागाजी ढोके यांना अटक केली आहे. पोलिस तपासात कथित व्हिडिओ तयार करुन व्हायरल करण्याच्या बाबींची चौकशी सुरू आहे. या घटनेमुळे रुग्णांच्या सुरक्षिततेचा आणि महिलांच्या खासगीपणाचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आलाय. काय घडलंय नेमकं? सविस्तर जाणून घेऊया.
काय घडलं नेमकं?
फुलंब्री शहरातील बसस्थानक परिसरातील समर्थ क्लिनिकमध्ये हा प्रकार घडला. संबंधित महिला डोकेदुखीच्या उपचारासाठी क्लिनिकमध्ये गेली होती. डॉक्टरांनी दिलेल्या औषधांनंतर गुंगी आल्याच्या अवस्थेत तिच्यावर लैंगिक अत्याचार केल्याचा आरोप महिलेने तक्रारीत केलाय. घटनेशी संबंधित व्हिडिओ तयार करून प्रसारित केल्याचाही आरोप करण्यात आहे. महिलेच्या तक्रारीनंतर फुलंब्री पोलिसांनी 20 ऑक्टोबर 2026 रोजी गुन्हा दाखल केला. तपासाची जबाबदारी उपविभागीय पोलीस अधिकारी पूजा नागरे यांच्याकडे आहे.
डॉक्टर रामदास तरटेला अटक
तक्रारीच्या आधारे पोलिसांनी डॉ. रामदास महादू तरटेला अटक केली. तपासात कथित व्हिडिओ कोणी तयार केला आणि तो सोशल मीडियावर कोणी व्हायरल केला, याचा शोध घेण्यात आला. या प्रकरणात पोलिसांनी डिजिटल पुरावे आणि संबंधित व्यक्तींच्या भूमिकेची तपासणी सुरू केली. पोलिसांनी आतापर्यंत दोन व्हिडिओ हस्तगत केले आहेत.
भाजप पदाधिकाऱ्यावरही कारवाई
व्हिडिओ प्रसारित करण्याच्या प्रकरणाच्या तपासादरम्यान भाजपचे फुलंब्री शहराध्यक्ष उत्तम भागाजी ढोके यांचे नाव समोर आल्याचे वृत्त आहे. त्यानंतर पोलिसांनी त्यांना 22 ऑक्टोबर रोजी अटक केली. दोन्ही आरोपींना न्यायालयात हजर केल्यानंतर सुरुवातीला पोलीस कोठडी सुनावण्यात आली. पुढे 23 ऑक्टोबर रोजी त्यांची न्यायालयीन कोठडीत रवानगी झाली.
भाजपकडून पदाधिकाऱ्याचे निलंबन
या प्रकरणात नाव समोर आल्यानंतर भाजपने उत्तम ढोके यांच्यावर पक्षांतर्गत कारवाई करत त्यांना पक्षातून निलंबित करण्यात आले. या घटनेवरून राजकीय वर्तुळातही चर्चा सुरू झाली आहे. शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे नेते अंबादास दानवे यांनी या प्रकरणाची सखोल चौकशी करून कठोर कारवाई करण्याची मागणी केल्याचे सांगितले जाते.
तपासात आणखी काय समोर येणार?
या प्रकरणात संबंधित व्हिडिओंची सत्यता, ते कोणी तयार केले, कोणत्या माध्यमातून प्रसारित केले आणि आणखी कोणी सहभागी आहे का, याचा तपास महत्त्वाचा ठरणार आहे. उपचारासाठी येणाऱ्या इतर महिलांबाबतही काही दावे समोर आले असले, तरी त्यांना दुजोरा मिळालेली नाही.