Maharashtra Breaking News LIVE : 05 नोव्हेंबर 2026 दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी, ब्रेकिंग न्यूजचा आढावा एका क्लिकवर
Maharashtra Breaking News Today : LIVE Updates on 05 नोव्हेंबर 2026 महत्त्वाच्या ब्रेकिंग न्यूज मराठीमध्ये, महाराष्ट्रातील सर्व घडामोडी पाहा (Maharashtra LIVE News) एका क्लिकवर, मुंबई, पुण्यासह (Mumbai-Pune News) राज्यातील महत्त्वाची शहरं आणि गावांतील ताज्या बातम्या, राजकीय बातम्यांचे LIVE अपडे्स (Political News) सामाजिक, आर्थिक, आरोग्य, शैक्षणिक आणि क्रीडा (Sports) तसेच इतर अपडेट्स वाचा एक क्लिकवर.
Maharashtra Breaking News Today : LIVE Updates on 05 नोव्हेंबर 2026 महत्त्वाच्या ब्रेकिंग न्यूज मराठीमध्ये, महाराष्ट्रातील सर्व घडामोडी पाहा (Maharashtra LIVE News) एका क्लिकवर, मुंबई, पुण्यासह (Mumbai-Pune News) राज्यातील महत्त्वाची शहरं आणि गावांतील ताज्या बातम्या, राजकीय बातम्यांचे LIVE अपडे्स (Political News) सामाजिक, आर्थिक, आरोग्य, शैक्षणिक आणि क्रीडा (Sports) तसेच इतर अपडेट्स वाचा एक क्लिकवर.
05 Nov 2026, 4:48 PM
परमबीर सिंह NIA प्रकरण, पुढील सुनावणी 23 तारखेला
PARAMBIR SINGH : परमबीर सिंह यांच्याशी संबंधित NIA प्रकरणाची पुढील सुनावणी 23 नोव्हेंबर रोजी होणार आहे... परमबीर सिंह यांच्याशी संबंधित NIA प्रकरणात आज कोर्टात जोरदार युक्तिवाद पाहायला मिळाला. हस्तक्षेप अर्जाच्या वैधतेवर आणि अर्जदाराच्या लोकस म्हणजेच म्हणणं मांडण्याच्या अधिकारावर सरकारी पक्षाच्या वकिलांनी सवाल उपस्थित केले. आधी लोकस निश्चित करावा आणि त्यानंतरच पुढील तपासाचा निर्णय घ्यावा असा युक्तिवाद करण्यात आला. दरम्यान वकील निलेश ओझा यांनी न्यायालयाचा वेळ वाया घालवल्याचा आरोप करत परमबीर सिंहांविरोधात न्यायालयीन अवमानाचा खटला चालवण्याची मागणी केली. या प्रकरणाची पुढील सुनावणी 23 नोव्हेंबर रोजी दुपारी 3 वाजता होणार आहे.
05 Nov 2026, 3:11 PM
गोकुळमध्ये 4 सदस्य निवडीवरून शिवसेना नाराज?
GOKUL : गोकुळमध्ये शासन नियुक्त सदस्य निवडीवरून शिवसेना नाराज असल्याची चर्चा आहे.. लोकशाही मार्गाने जे सदस्य निवडून आले आहेत आणि जो जनतेने कौल दिला आहे त्याचा आपण सन्मान केला पाहिजे अशी शिवसेनेची भूमिका असल्याचं समजतंय.. त्यामुळे भाजप आणि राष्ट्रवादीच्या भूमिकेशी शिवसेना असहत असल्याची माहिती सूत्रांनी दिलीय.
05 Nov 2026, 1:08 PM
'तरुणांच्या प्रश्नांकडे सरकारनं लक्ष देण्याची गरज'
DELHI : सत्तापालट निवडणुकीतून होतो, समाजात अशांतता आणि हिंसा पसरवणे अयोग्य आहे असं विधान राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरकार्यवाह दत्तात्रेय होसबळेंनी केलंय.. देशांतर्गत आणि परदेशी शक्तींकडून समाजात अस्थिरता निर्माण करण्याचे प्रयत्न सुरू असल्याचा दावाही त्यांनी केलाय.. तरुणांच्या आकांक्षा आणि प्रश्नांकडे सरकार आणि समाजाने लक्ष देण्याची गरज आहे असा सल्लाही त्यांनी दिलाय.. तरुणांशी संवाद साधून त्यांच्या ऊर्जेला विधायक दिशा द्यावी असं आवाहन त्यांनी केलंय.. चांगल्या विचारांच्या लोकांनी मौन बाळगल्यास अराजकवादी शक्ती वरचढ ठरतील असं होसबळे म्हणालेत..
05 Nov 2026, 12:37 PM
राज्याच्या आरोग्य सेवेला बळकटी
RURAL HEALTH : राज्याच्या आरोग्य सेवेला बळकटी मिळणार आहे... राज्यातील सर्वसामान्य नागरिकांना, विशेषतः ग्रामीण, दुर्गम आणि आदिवासी भागातील जनतेला दर्जेदार तसंच वेळेवर आरोग्यसेवा उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने सार्वजनिक आरोग्य विभागाने वैद्यकीय अधिकारी भरतीला प्राधान्य दिलंय.. यासाठी १हजार ४४० डॉक्टरांची नियुक्ती करण्यात आलीये.. यात ६७४ विशेषज्ञांसह ७६६ MBBS डॉक्टरांचा समावेश आहे.. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांच्या हस्ते या नियुक्तीपत्रांचे वितरण करण्यात आलं.. यामुळे ग्रामीण आणि दुर्गम भागातील आरोग्यसेवा अधिक सक्षम होणार आहे..
05 Nov 2026, 12:35 PM
दिवाळीच्या उत्साहावर दुष्काळाचं सावट
DHARASHIV : दिवाळी म्हटलं की दिव्यांची रोषणाई... फटाक्यांचा आवाज आणि आनंदाचा जल्लोष... पण यंदा याच दिवाळीच्या उत्साहावर दुष्काळाचं सावट पसरलंय... शेतीनंतर आता दुष्काळाचा फटका उद्योगांनाही बसू लागलाय... मराठवाड्याची शिवकाशी म्हणून ओळख असलेल्या धाराशिव जिल्ह्यातील तेरखेड्याची फटाका बाजारपेठ यंदा ग्राहकांविना ओस पडलीय... विशेष म्हणजे कारखान्यांमध्ये विक्रमी उत्पादन झालं, मात्र फटाके खरेदीसाठी ग्राहकच नसल्यानं व्यापाऱ्यांसमोर मोठं संकट उभं राहिलंय...यंदा पावसानं पाठ फिरवल्यानं शेतीचं आर्थिक गणित कोलमडलं... खरीप हंगाम हातचा गेल्यानं शेतकऱ्यांच्या हातात पैसा नाही... त्यामुळे दिवाळीच्या खरेदीवरही मर्यादा आल्यात... ग्रामीण भागातील ग्राहकांनी खर्चाला कात्री लावली आणि त्याचा थेट फटका तेरखेड्याच्या फटाका बाजारपेठेला बसलाय...
05 Nov 2026, 10:54 AM
गोंदियात अन्न व औषध प्रशासनाची मोठी कारवाई
GONDIA : सणासुदीच्या काळात नागरिकांना सुरक्षित आणि दर्जेदार अन्नपदार्थ उपलब्ध व्हावेत, यासाठी अन्न व औषध प्रशासनाने गोंदियात विशेष तपासणी मोहीम राबवण्यात आलीय... या मोहिमेदरम्यान 65 आस्थापनांची तपासणी करण्यात आली असून, सुमारे 10 लाख 90 हजार रुपये किंमतीचा असुरक्षित अन्नसाठा जप्त करण्यात आलाय... यासह नियमांचे उल्लंघन करणाऱ्या 9 आस्थापनांचे परवाने निलंबित करण्यात आलेत...
05 Nov 2026, 10:52 AM
मुंबईत राज्यातील सर्वाधिक तापमान
MUMBAI : राज्यातील बहुतांश भागांत पावसाने दडी मारली असून उन्हाचा चटका कायम आहे. बुधवारी मुंबईत राज्यातील सर्वाधिक 36.9 अंश सेल्सिअस कमाल तापमानाची नोंद झाली. तर महाबळेश्वर येथे सर्वात कमी 17.4 अंश सेल्सिअस किमान तापमान नोंदवले गेले. पुण्यात कमाल तापमान 32.7 अंश, तर किमान तापमान 19.7 अंश सेल्सिअस होते. राज्यातील इतर भागांतही तापमानाचा पारा चढलेला आहे.
05 Nov 2026, 10:51 AM
नाशिक सिटी बसला बाजारपेठ परिसरात प्रवेश बंदी
NASHIK : दिवाळीच्या खरेदीसाठी बाजारपेठांमध्ये होणारी गर्दी लक्षात घेता नाशिकमध्ये सिटी बस सेवेला प्रवेशबंदी करण्यात आलीये. आजपासून 11 नोव्हेंबरपर्यंत बाजारपेठ परिसरात सिटी बसला प्रवेश बंदी करण्यात आलीये. त्यामुळे पंचवटीकडून येणाऱ्या आणि जाणाऱ्या सिटी बससाठी वाहतुकीत बदल करण्यात आलाय. निमाणी, मालेगाव स्टँड आणि सीबीएसकडे जाणाऱ्या बसेसना पर्यायी मार्गांचा वापर करावा लागणार आहे.. मोठ्या वाहनांनाही काही मार्गांवर प्रवेशबंदी लागू करण्यात आलीये.. वाहतूक कोंडी टाळण्यासाठी हा निर्णय घेण्यात आलाय.
05 Nov 2026, 10:23 AM
समुद्रातील छटपूजेला मनविसेचा विरोध
MNS ON CHHATH POOJA : समुद्रातील छटपूजेला मनसे विद्यार्थी सेनेनं विरोध केलाय... प्रदूषणाचं कारण देत गणेश विसर्जनाला विरोध होत असताना छटपूजेसाठी विशेष सवलत का असा सवाल मनसे विद्यार्थी सेनेनं मुंबई मनपाला विचारला... गणेशविसर्जनाप्रमाणे छटपूजेसाठीही कृत्रिम तलाव उभारण्याची मागणी मनसे विद्यार्थी सेनेनं केलीये.. मराठी सणांसाठी एक नियम आणि इतर सणांसाठी वेगळे नियम का? असा सवालही मनसेनं मनपाला विचारलाय.
05 Nov 2026, 9:07 AM
कोल्हापुरात ऊस दरासाठी आंदोलन सुरूच
KOLHAPUR : कोल्हापुरात ऊस दरासाठी सुरू असलेलं आंदोलन पेटलंय... 46 तासांपासून पुणे बंगळुरू महामार्गावर आंदोलन सुरुच आहे... महामार्ग वाहतुकीसाठी ठप्प झालाय... चर्चेसाठी एक पाऊस पुढे येत 4500 ऐवजी पहिली उचल 4200 द्या अशी भूमिका घेतलीय... याचबरोबर साखर कारखानदारांनी यातून मार्ग काढावा असं आवाहन केलंय.... त्यामुळे आज साखर कारखानदार नेमका काय तोडगा काढतात याकडे सर्वांचे लक्ष आहे.... ऐन दिवाळीच्या तोंडावर महामार्ग बंद असल्याने प्रवासाचे हाल होत आहेत, त्याबद्दल राजू शेट्टी यांनी माफी देखील मागितली आहे,...
05 Nov 2026, 8:57 AM
चोरट्यांनी एका रात्रीत फोडले 6 फ्लॅट
SAMBHAJINAGAR : छत्रपती संभाजीनगरच्या तिसगाव येथील म्हाडा कॉलनीत चोरट्यांनी मोठा धुमाकूळ घातला आहे. एकापाठोपाठ सहा कुलूपबंद फ्लॅट चोरट्यांनी फोडल्याची घटना उघडकीस आली आहे. कटरच्या साहाय्याने कुलूप आणि दरवाजाच्या कड्या तोडून चोरट्यांनी सोन्या-चांदीचे दागिने आणि रोकड लंपास केली. चोरट्यांनी सोसायटीच्या संरक्षक भिंतीवरून उडी मारून आत प्रवेश केला. त्यानंतर बंद फ्लॅटला लक्ष्य केले. एका फ्लॅटमधून सोन्याचे कानातले आणि तीन हजार रुपये, तर दुसऱ्या फ्लॅटमधून मुलांच्या बचतपेटीतील पाच ते सहा हजार रुपये आणि चांदीच्या अंगठ्या चोरीला गेल्या आहेत. इतर फ्लॅटमधील चोरीचा नेमका आकडा अद्याप स्पष्ट झालेला नाही. विशेष म्हणजे, अपार्टमेंटमधील सीसीटीव्ही कॅमेऱ्यांत संशयित चोरटे कैद झाले आहेत. घटनेची माहिती मिळताच एमआयडीसी वाळूज पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत तपास सुरू केला आहे. एकाच सोसायटीतील सहा फ्लॅट फोडल्याने परिसरातील रहिवाशांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून, पोलिसांच्या गस्त आणि डीबी पथकाच्या कार्यक्षमतेवरही प्रश्न उपस्थित होत आहेत.
05 Nov 2026, 7:56 AM
ऊस दर आंदोलनाचा गोकुळ दूध विक्रीला फटका
USS ANDOLAN : पुणे बंगळुरु महामार्गावर सुरू असलेल्या ऊस दर आंदोलनाचा फटका गोकुळच्या दूध विक्रीवर झाला आहे. मुंबई आणि पुण्यातील दूध विक्रीवर तब्बल 50% परिणाम झाला आहे. महामार्ग वाहतुकीसाठी बंद असल्याने गोकुळचे अनेक टँकर रस्त्यामध्येच अडकले आहेत. हे टँकर वाहतूक कोंडीतून सोडवून मिळावे असे पत्र गोकुळ प्रशासनाने पोलीस अधीक्षकांना दिले आहे, तरीदेखील हे टँकर अद्याप रस्त्यात अडकून बसले आहेत. त्यामुळे गोकुळच्या मुंबई पुण्यातील दूध विक्रीवर थेट 50% परिणाम झाला आहे. हे आंदोलन असं सुरू राहिलं तर गोकुळचे पुणे मुंबई आणि इतर शहराकड होणारा दूध पुरवठ्यावर मोठा परिणाम होणार आहे.
गेली २३ वर्षे पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत असून ऑनलाइन पत्रकारितेत १९ वर्षांचा प्रदीर्घ अनुभव आहे. सामना, लोकमत या संस्थांमध्ये ४ वर्ष प्रिंट माध्यमात काम करण्याचा अनुभव आहे. तसेच एबीपी माझा, झी २४ तास, टाइम्स नाऊ मराठी, लोकशाही मराठी या संस्थांच्या ऑनलाइन पोर्टलमध्ये काम करण्याचा अनुभव आहे. झी २४ तास ऑनलाइनमधील ही दुसरी इनिंग आहे. पहिल्या इनिंगमध्ये झी २४ तासची वेबसाईट 24taas.com ही सुरू करण्यात महत्त्वाची भूमिका होती. आता गेल्या वर्षभरापासून झी २४ तासच्या डिजीटल संपादकपदी रूजू होण्याची संधी मिळाली आहे.शैक्षणिक पात्रता प्रशांत जाधव यांनी मास्टर ऑफ कम्युनिकेशन आणि जर्नालिझम ही पद्युत्तर पदवी पुणे विद्यापीठाच्या कम्युनिकेशन अँड जर्नालिझम विभागातून पूर्ण केली आहे. तसेच याच संस्थेतून बॅचलर ऑफ कम्युनिकेशन आणि जर्नालिझम पदवी पूर्ण केली आहे. यापूर्वी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठातून बी.कॉमची पदवी पूर्ण केली आहे. कोणत्या विषयात रुची प्रशांत जाधव यांना राजकारण, क्रीडा, बिझनेस या विषयात रस असून यात त्यांचे लिखाण आहे. तसेच लोकमतमध्ये असताना चित्रपट परीक्षणही केले आहेत. महाराष्ट्र टाइम्समध्ये कॉपी एडीटर असताना क्रीडा विषयक बातम्या करण्याचा हातखंड आहे. प्रशांत जाधव यांनी महाराष्ट्र टाइम्सकडून पहिल्यांदा आळंदी ते पंढरपूर ही पायी वारी पूर्ण केली आहे. या काळातील त्यांचे वैविध्यपूर्ण कव्हरेज हे प्रसिद्ध झाले होते.