अभिनेता इम्रान खानला मोठा झटका; मुंबई पोलिसांकडून भारत सोडण्याचे आदेश, नोटिस जारी
आमिर खानचा भाचा, अभिनेता इम्रान खान याला मुंबई पोलिसांनी 28 ऑक्टोबरपर्यंत भारत सोडून जाण्याचे निर्देश देणारी नोटीस
बॉलिवूड अभिनेता आणि आमिर खानचा भाचा इम्रान खान याला 28 ऑक्टोबर पर्यंत भारत सोडून जाण्याची नोटिस देण्यात आली आहे. मुंबई पोलिसांकडून ही नोटीस बजावण्यात आली आहे.
मुंबईतील ऑगस्ट क्रांती मैदानात मुख्य निवडणुक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्याविरोधात काढण्यात आलेल्या आंदोलनात इम्रान खान सहभागी झाला होता. त्यानंतर मुंबई पोलिसांनी त्याला ताब्यात देखील घेतले होते. इम्रान खान आंदोलनात उतरल्यानंतर तो भारतीय नागरिक नसल्याच्या चर्चा सुरू झाल्या होत्या. अनेकांनी त्याच्या नागरिकत्वावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते. इम्रान खानकडे अमेरिकेचे नागरिकत्व आहे.
दरम्यान, भारतीय नागरिक नसतानाही आंदोलनात सहभागी झाल्याबद्दल इम्रान खानवर इमिग्रेशन कायद्याच्या संबंधित कलमांतर्गत कारवाई करण्यात आली आहे, अशी माहिती मुंबई पोलिसांनी दिली आहे.
काय आहे प्रकरण?
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी कॉकरोच जनता पक्षाच्या (CJP) समर्थनार्थ 10 ऑक्टोबर रोजी मुंबईच्या ऑगस्ट क्रांती मैदानावर झालेल्या आंदोलनात इम्रान खान सहभागी झाला होते. या आंदोलनादरम्यान पोलिसांनी इम्रान खान यांच्यासह अनेक लोकांना ताब्यात घेतले होते. त्याच संध्याकाळी त्यांची सुटका करण्यात आली. मात्र त्यानंतर, इम्रान खान हा भारतीय नागरिक नसून, ओसीआय (ओव्हरसीज सिटिझन ऑफ इंडिया) कार्ड असलेले अमेरिकन नागरिक असल्याच्या चर्चा समोर आल्या होत्या.
किरीट सोमय्यांनी दाखल केलेली तक्रार
माजी भाजप खासदार किरीट सोमैया यांनी इम्रान खानवर कारवाई करण्याची मागणी करत मुंबई पोलिसांना पत्र लिहिले होते. 'परदेशी नागरिक' असूनही, शनिवारी मुंबईत 'कॉकरोच जनता पार्टी'च्या समर्थनार्थ झालेल्या आंदोलनात सहभागी झाल्याचा आरोप इम्रानवर आहे. मुंबईचे सह पोलीस आयुक्त मनोज कुमार शर्मा यांना लिहिलेल्या पत्रात, किरीट सोमय्या यांनी इम्रान खान यांना आंदोलनात सहभागी होण्यासाठी कायदेशीर परवानगी होती का, हे जाणून घेण्याची मागणी केली होती. .
इम्रान खान परदेशी नागरिक' आहेत आणि आंदोलनात सहभागी होण्यासाठी त्यांनी कोणतीही परवानगी घेतली होती का? असा सवाल सोमैया यांनी केला होता. मुंबई पोलिसांना या प्रकरणाची चौकशी करून योग्य कारवाई करण्याचे आवाहन केले होते.
संजय राऊत काय म्हणाले?
इ्म्रान खानला जारी करण्यात आलेल्या नोटिशीवर संजय राऊतांनी प्रतिक्रिया दिली आहे. इ्म्रानखान यांनी तरुणाच्या बाजूने आंदोलनात भाग घेतला म्हणून त्यांना देश सोडून जा म्हणून सरकार सांगत आहे. म्हणजे सरकार घाबरले आहे, अशा शब्दांत त्यांनी सरकारवर टीका केली आहे.