SOCIAL MEDIA

Newsletter

PARTNER SITES
Select Language Select State

दिया मिर्झा प्रकरणात हायकोर्टच्या नाराजीनंतर अमित साटमांची पहिली प्रतिक्रिया; 'तुकडे-तुकडे गँग...'

दिया मिर्झाच्या दिवाळी व्हिडीओवरून मुंबईत राजकीय वाद पाहायला मिळतोय. हायकोर्टाच्या नाराजीनंतर अमित साटम यांनी प्रतिक्रिया दिली.

Reported By Pravin Dabholkar Written By Pravin Dabholkar
Published: Nov 03, 2026, 04:28 PM IST | Updated: Nov 03, 2026, 04:41 PM IST
Image Credit: अमित साटम
Join

अभिनेत्री दिया मिर्झाच्या पर्यावरणपूरक दिवाळी व्हिडीओवरून सुरू झालेल्या वादात आता मुंबई भाजपचे अध्यक्ष आणि आमदार अमित साटम यांनी पहिली प्रतिक्रिया दिली आहे. मुंबई उच्च न्यायालयाने या वादावर तीव्र नाराजी व्यक्त करत राजकीय नेत्यांच्या वक्तव्यांवर प्रश्न उपस्थित केले. त्यानंतर साटम यांनी न्यायालयाचे निरीक्षण वेगळ्या संदर्भात असल्याचे सांगितले. तसेच, आपला आक्षेप कोणत्याही व्यक्तीच्या धर्म, जात, भाषा किंवा प्रांतावर नसून देशविरोधी शक्तींना पाठिंबा देणाऱ्यांवर असल्याचा दावा केला. दरम्यान, न्यायालयाने मुंबई महापालिकेला दिया मिर्झाचा हटवलेला व्हिडीओ पुन्हा अपलोड करण्यास सांगितले आहे. काय म्हणाले अमित साटम? जाणून घेऊया.

हायकोर्टाची राजकीय वक्तव्यांवर नाराजी

दिवाळीच्या काळात फटाक्यांमुळे होणारे ध्वनी आणि वायू प्रदूषण रोखण्यासाठी मुंबई उच्च न्यायालयात स्वतःहून दाखल झालेल्या जनहित याचिकेवर सुनावणी सुरू आहे. न्यायमूर्ती गिरीश कुलकर्णी आणि न्यायमूर्ती नीला गोखले यांच्या खंडपीठाने 3 नोव्हेंबर रोजी दिया मिर्झाच्या व्हिडीओवरून झालेल्या वादाबद्दल नाराजी व्यक्त केली. पर्यावरणाचा मुद्दा हा सार्वजनिक आरोग्याशी संबंधित असून त्याला धार्मिक किंवा अन्य रंग देऊ नये, असे न्यायालयाने स्पष्ट केले. भारत हा धर्मनिरपेक्ष देश असल्याचे सांगत न्यायालयाने अशा वक्तव्यांमुळे सामाजिक सलोख्याला बाधा पोहोचू नये, असेही नमूद केले.

‘न्यायालयाचे निरीक्षण वेगळ्या संदर्भात’

न्यायालयाच्या नाराजीनंतर अमित साटम यांनी माध्यमांशी बोलताना आपली भूमिका स्पष्ट केली. न्यायालयाचे निरीक्षण वेगळ्या संदर्भात होते. दिया मिर्झाच्या विशिष्ट व्हिडीओबाबत कोणतीही याचिका न्यायालयासमोर नव्हती, असे साटम म्हणाले. न्यायालयाच्या निरीक्षणांचा अभ्यास सुरू केला असल्याचेही त्यांनी सांगितले. त्यामुळे न्यायालयाच्या टिप्पणीला आपण कशा प्रकारे उत्तर देणार, याबाबत त्यांनी सविस्तर भूमिका मांडलेली नाही.

‘तुकडे-तुकडे गँग’वरील भूमिका कायम

आपला आक्षेप कोणत्याही व्यक्तीच्या धर्म, जात, भाषा किंवा प्रांतावर नसल्याचे साटम यांनी स्पष्ट केले. मात्र, भारतविरोधी शक्तींशी हातमिळवणी करणाऱ्या, ‘तुकडे-तुकडे गँग’ला सहानुभूती दाखवणाऱ्या आणि देशात अराजकता पसरवणाऱ्यांना पाठिंबा देणाऱ्यांविरोधात आपली भूमिका कायम असल्याचे त्यांनी म्हटले.

महापालिकेच्या समन्वयावर सवाल

दिया मिर्झाचा व्हिडीओ तयार करण्यापूर्वी महापालिका प्रशासनाने राजकीय पक्षांशी योग्य समन्वय साधला होता का, असा मुद्दाही साटम यांनी उपस्थित केला. आगामी महापालिका किंवा अन्य निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर कोणत्या व्यक्तींना किंवा संस्थांना जनजागृती मोहिमेत सहभागी करून घ्यायचे, याचा आधी अभ्यास करायला हवा. ग्राउंड लेव्हलवर योग्य समन्वय आणि नियोजन झाले, तर भविष्यात असे वाद टाळता येतील, असे ते म्हणाले.

व्हिडीओ पुन्हा अपलोड करण्याचे निर्देश

मुंबई महापालिकेने पर्यावरणपूरक दिवाळी मोहिमेसाठी दिया मिर्झासह काही प्रसिद्ध व्यक्तींचे व्हिडीओ तयार केले होते. न्यायालयाच्या सूचनेनुसार या मोहिमेत कलाकारांनी विनामूल्य जनजागृती संदेश दिले होते. मात्र, अमित साटम यांनी आक्षेप घेतल्यानंतर दिया मिर्झाचा व्हिडीओ महापालिकेच्या सोशल मीडिया खात्यांवरून हटवण्यात आला. इतर कलाकारांचे व्हिडीओ मात्र उपलब्ध राहिले. यावर न्यायालयाने नाराजी व्यक्त करत हटवलेला व्हिडीओ पुन्हा अपलोड करण्यास सांगितले. त्यामुळे आता महापालिका प्रशासन याबाबत काय निर्णय घेते, याकडे लक्ष लागले आहे.

Add Zee News as a Preferred Source
TAGS:

About the Author

प्रविण दाभोळकर हे झी 24 तास डिजिटलमध्ये चीफ सब एडिटर म्हणून कार्यरत असून मीडिया क्षेत्रातील 16 वर्षांहून अधिक अनुभव असलेले पत्रकार आहेत. शिक्षण, करिअर, रोजगार, सरकारी योजना, गुंतवणूक, अर्थकारण, सार्वजनिक धोरणे आणि राजकीय घडामोडी यांसारख्या विषयांवर त्यांचे विशेष प्रभुत्व आहे. वाचक-केंद्रित पत्रकारिता, तथ्याधारित माहिती आणि सोप्या, स्पष्ट भाषेत गुंतागुंतीचे विषय समजावून सांगणे हे त्यांच्या लेखनाचे प्रमुख वैशिष्ट्य आहे.करियरची सुरुवातवयाच्या 21 व्या वर्षी त्यांनी प्रिंट मीडियातून पत्रकारितेच्या क्षेत्रात प्रवेश केला. कारकिर्दीच्या सुरुवातीच्या काळात त्यांनी वृत्तसंकलन, रिपोर्टिंग आणि लेखन यामध्ये महत्त्वाचा अनुभव मिळवला. त्यानंतर प्रिंट, टेलिव्हिजन आणि डिजिटल मीडिया या तिन्ही माध्यमांमध्ये विविध जबाबदाऱ्या सांभाळत त्यांनी पत्रकारितेचा व्यापक अनुभव संपादन केला. बदलत्या मीडिया विश्वाशी जुळवून घेत त्यांनी डिजिटल पत्रकारितेमध्ये स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली आहे.शैक्षणिक पार्श्वभूमीशैक्षणिकदृष्ट्या त्यांनी मुंबईतील एम.डी. महाविद्यालयातून पदवी शिक्षण पूर्ण केले. त्यानंतर मुंबई विद्यापीठातून समाजशास्त्र (Masters in Sociology) विषयात पदव्युत्तर शिक्षण घेतले. पुढे साठ्ये महाविद्यालयातून मराठी पत्रकारितेमध्ये मास्टर्स ऑफ कम्युनिकेशन अँड जर्नालिझम ही पदवी संपादन केली. या शैक्षणिक पार्श्वभूमीमुळे सामाजिक प्रश्नांची सखोल समज, वस्तुनिष्ठ विश्लेषण आणि जबाबदार पत्रकारिता यांचा मजबूत पाया त्यांना लाभला आहे.लेखन शैली आणि दृष्टीकोनसंशोधनात्मक लेखन, सखोल विश्लेषण आणि फीचर स्टोरीज याकडे त्यांचा विशेष कल आहे. सामान्य वाचकांपर्यंत महत्त्वाच्या पण दुर्लक्षित राहिलेल्या कथा पोहोचवणे, गुंतागुंतीच्या विषयांचे सोप्या भाषेत विश्लेषण करणे आणि अचूक माहिती सादर करणे यासाठी ते ओळखले जातात. त्यांच्या लेखनात तथ्यांची पडताळणी, संदर्भांची अचूकता आणि वाचकांसाठी उपयुक्त माहिती यांना नेहमीच प्राधान्य दिले जाते.व्हिडीओ कंटेटझी 24 तास सोशल मीडियासाठी ते फिटनेस, सरकारी योजना, तसेच इतर महत्वाच्या बातम्यांसाठी व्हिडीओ बनवतात. यातून लेखनासोबतच व्हिडीओच्या माध्यमातून पोहोचण्यास मदत होते.विशेष ज्ञानाची क्षेत्रेह्यूमन इंटरेस्ट स्टोरीज, शिक्षण, करिअर मार्गदर्शन, रोजगार, सरकारी योजना, सामाजिक प्रश्न, गुंतवणूक आणि सार्वजनिक हिताच्या विषयांवरील लेखन हे त्यांचे विशेष अभ्यासाचे क्षेत्र आहे. वाचकांना केवळ बातमी नव्हे, तर त्या बातमीचा परिणाम, पार्श्वभूमी आणि उपयोग समजून देण्यावर त्यांचा भर असतो.

ZEENEWS TRENDING STORIES