पंढरपूर : ठाण्यातील प्रदीप पूर्णेकर हत्या प्रकरणावरून महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ माजली आहे. या प्रकरणी शिंदेंच्या शिवसेनेच्या माजी महापौर, नगरसेविका मीनाक्षी शिंदे आणि पती राजेंद्र शिंदे या दोघांच्या अटकेची मागणी पूर्णेकर कुटुंबीयांनी केली. पूर्णेकर हत्या प्रकरण ताजे असतानाच आता पंढरपूर मध्ये भाजप नेत्याची हत्या झाली आहे. कारमध्येच त्यांना गोळ्या घालण्यात आल्या. हत्येमागे शिंदेंच्या शिवसेनेचा हात असल्याच्या आरोप भाजप नेत्यांच्या कुटुंबाने केला आहे.
सांगोला तालुक्यातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. भाजपा युवा मोर्चाचे माजी तालुकाध्यक्ष प्रतापसिंह करचे यांचा डोक्यात गोळ्या झाडून निर्घृण खून करण्यात आला आहे. या घटनेमुळे संपूर्ण सांगोला तालुक्यात खळबळ उडाली आहे. या खुना मागे सांगली जिल्ह्यातील शिंदे शिवसेनेच्या नेत्याचा हात असल्याचा आरोप कुटुंबाने केला आहे.
27 ऑक्टोबर 2026 रोजी मध्यरात्री 2 वाजण्याच्या सुमारास सांगोला तालुक्यातील तिप्पेहळ्ळी परिसरात ही घटना घडली. प्रतापसिंह करचे हे स्वतःच्या कारने प्रवास करत असताना त्यांच्यासोबत असलेले संशयित आरोपी हर्षवर्धन ऐवळे आणि विक्रम घरडे यांनी बंदुकीतून गोळ्या झाडून त्यांची हत्या केली. याप्रकरणी सांगोला पोलीस ठाण्यात हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपींना अटक करण्यात आली आहे
मात्र या हत्येमागे राजकीय कट असल्याचा गंभीर आरोप मयताच्या पत्नी अर्चना करचे यांनी केला आहे. आटपाडी येथील शिंदे सेनेचे नेते तथा सांगली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक तानाजी पाटील, त्यांचे बंधू शिवाजी पाटील आणि जिल्हा परिषद सदस्य रोहन पाटील यांनी कट रचून सुपारी देऊन ही हत्या घडवून आणल्याची लेखी तक्रार करचे कुटुंबीयांनी सोलापूरच्या जिल्हा पोलीस अधीक्षकांकडे दिली आहे.
राज्यात भाजपचे सरकार असतानाही एका भाजप कार्यकर्त्याची अशी हत्या होत असेल तर सर्वसामान्यांचे काय? असा सवाल उपस्थित करत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी न्याय द्यावा, अशी मागणी अर्चना करचे यांनी केली आहे.
राम पूर्णेकरांच्या जिवीताला धोका असून पूर्णेकर कुटुंबीयांना पोलीस संरक्षण वाढवून द्या, असं पत्र देत मीनाक्षी शिंदेंनी पोलीस आयुक्तांकडे मागणी केली. प्रदीप पूर्णेकर हत्या प्रकरणात माझं आणि माझे पती राजेंद्र शिंदेंचं नाव घेण्यासाठी राम पूर्णेकरांना प्रवृत्त केल्याचं मीनाक्षी शिंदे म्हणाल्यात. तर मी काही केलं नाही म्हणून सुरुवातीला राजीनामा दिला नव्हता.. मात्र माझ्या नेत्यावर आरोप झाल्यानंतर राजीनामा दिल्याची प्रतिक्रिया ठाण्याच्या माजी महापौर मीनाक्षी शिंदेंनी दिली.