बीड जिल्ह्यात ऑनलाइन मैत्रीच्या माध्यमातून आर्थिक फसवणूक आणि ब्लॅकमेलिंगचा प्रकार समोर आला आहे. एका 36 वर्षीय व्यापाऱ्याला सोशल नेटवर्किंग ॲपच्या माध्यमातून ओळख वाढवणे महागात पडल्याचा आरोप आहे. या प्रकरणी दोन महिलांविरोधात बीडमधील शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. प्रिया देवी प्रसाद आणि तमन्ना रावत अशी गुन्हा दाखल झालेल्या महिलांची नावे आहेत. दोघीही मूळच्या नेपाळच्या असून सध्या दिल्ली येथे वास्तव्यास आहेत. काय घडलंय नेमकं? सविस्तर जाणून घेऊया.
बीड जिल्ह्यातील हिवरापहाडी येथील रहिवासी असलेल्या आणि सध्या पुण्यात राहणाऱ्या व्यापाऱ्याची मे २०२४ मध्ये टँगो ॲपवर प्रिया देवी प्रसाद हिच्याशी ओळख झाली. त्यानंतर दोघांमध्ये संवाद वाढला. व्हिडीओ कॉलदरम्यान संबंधित महिलेने व्यापाऱ्याचा खासगी व्हिडीओ रेकॉर्ड केल्याचा आरोप आहे. पुढे हा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रसारित करण्याची धमकी देऊन पैशांची मागणी करण्यात आल्याचे तक्रारीत म्हटले आहे.
खासगी व्हिडीओ सार्वजनिक झाल्यास समाजात बदनामी होईल, या भीतीपोटी व्यापाऱ्याने पैसे दिल्याचे तक्रारीत नमूद आहे. विविध बँक खात्यांमधून तसेच क्रिप्टोकरन्सीच्या माध्यमातून एकूण सुमारे 47 लाख रुपये घेतल्याचा आरोप आहे. याशिवाय ऑगस्ट महिन्यात दुबईतील हॉटेल बुकिंगच्या व्यवहारातही आर्थिक फसवणूक झाल्याचा दावा तक्रारदाराने केला आहे. या व्यवहाराची स्वतंत्र पडताळणी अद्याप आवश्यक आहे.
या प्रकरणी शिवाजीनगर पोलिसांनी दोन्ही महिलांविरोधात संबंधित कायदेशीर तरतुदींनुसार गुन्हा नोंदवला आहे. सोशल मीडिया खाती, मोबाइल क्रमांक, बँक व्यवहार आणि क्रिप्टोकरन्सीशी संबंधित व्यवहारांची तपासणी या प्रकरणात महत्त्वाची ठरणार आहे. तक्रारदाराने महिलांविरोधात आणखी काही गंभीर आरोप केले आहेत.
या घटनेमुळे सोशल मीडिया आणि व्हिडीओ कॉलिंग ॲप्स वापरताना वैयक्तिक गोपनीयतेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. अनोळखी व्यक्तींशी संवाद साधताना खासगी फोटो, व्हिडीओ किंवा आर्थिक माहिती शेअर करणे टाळावे. कोणी खासगी व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी देऊन पैसे मागत असल्यास घाबरून पैसे देऊ नयेत, असे आवाहन सायबर तज्ज्ञ करतात. संबंधित चॅट, फोन नंबर, स्क्रीनशॉट आणि आर्थिक व्यवहारांचे पुरावे सुरक्षित ठेवावेत. सायबर गुन्ह्याची तक्रार राष्ट्रीय सायबर गुन्हे पोर्टलवर करा, असे आवाहन करण्यात आलंय.