महाराष्ट्रातील 73 लाख शेतकऱ्यांच्या खात्यात कर्जमाफीचे पैसे जमा; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची माहिती
आतापर्यंत 73 लाख शेतकऱ्यांच्या खात्यात कर्जमाफीचे पैसे पोहोचले असून पुढील दोन दिवसांत जवळपास 95 टक्के शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे जमा होतील अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे.
कर्जमाफीची घोषणा झाल्यानंतर आतापर्यंत 73 लाख शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे पोहोचले असून पुढील दोन दिवसांत जवळपास 95 टक्के शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे जमा होतील अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे. तसंच आम्ही सर्वांनी मिळून शेतकऱ्यांसोबत दिवाळी साजरी कऱण्याचा निर्णय घेतला आहे अशी माहिती त्यांनी दिली आहे. मंत्रिमंडळ बैठकीनंतर माध्यमांशी संवाद साधताना त्यांनी ही माहिती दिली. महायुतीचं सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभं आहे असल्याचंही ते म्हणाले आहेत.
"राज्य शासनाच्या वतीने दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना दिवाळीपूर्वी अग्रीम मदत म्हणून 5 हजारांची मदत देत असल्याचं जाहीर केलं होतं. त्यानुसार, आतापर्यंत 73 लाख शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे पोहोचले आहेत. पुढील दोन दिवसांत जवळपास 95 टक्के शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे जमा होतील. खात्यांमध्ये काही अडचणी असल्याने पाच टक्के थोडं मागुपुढे होतात," असं फडणवीस म्हणाले.
पुढे त्यांनी सांगितलं की, "पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर कर्जमाफी योजनेअंतर्गत आज पुन्हा 4 लाख 80 हजार शेतकऱ्यांच्या खात्यात 4764 कोटी आपण जमा केले आहेत. जे पैसे जमा केले आहेत त्यातील सर्वाधिक शेतकरी मराठवाड्यातील आहेत. मराठवाड्यातील 2 लाख 73 हजार शेतकऱ्यांच्या खात्यात कर्जमाफीचे पैसे राज्य सरकारच्या वतीने जमा करण्यात आले आहेत. एकूण पाहिलं तर जवळपास 21 लाख शेतकऱ्यांच्या खात्यात कर्जमाफीचे पैसे भरले आहेत. 19 हजार कोटी कर्जमाफीसाठी जमा केले आहेत".
"अजूनही याद्यांच प्रमाणीकर सुरु आहे. जसजसं प्रमाणीकरण होत जाईल त्याप्रमाणे त्या खात्यात पैसे भरले जातील. महायुतीचं सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभं आहे. विविध योजनांच्या माध्यमातून शेतकऱ्यांना मदत कऱण्याचा आमचा प्रयत्न सुरु आहे आणि त्याचे प्रत्यक्ष पैसेही शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होत आहेत," असं ते म्हणाले आहेत. आम्ही सर्व मंत्र्यांनी मिळून शेतकऱ्यांसोबत दिवाळी साजरी कऱण्याचा निर्णय घेतला असल्याची माहिती त्यांनी दिली.
"इतकी वर्ष मराठवड्याच्या तोंडाला पाणी पुसण्याचं काण सुरु होतं. पण महायुतीनेच मराठवड्याच्या हक्काचं 7 टीएमसी पाणी दिलं. ते काम पूर्णत्वास नेलं. लवकरच काम पूर्ण झाल्यावर पाणी मिळेल. त्याचा सर्वाधिक फायदा धाराशीव आणि बीड जिल्ह्याला होईल," अशी माहिती त्यांनी दिली.