'माझ्या शांततेला...'; वडिलांनीच पक्षाच्या वतीने डिलिमिटेशनला पाठिंबा दिल्यानंतर नताशा आव्हांडाची पोस्ट
जितेंद्र आव्हाड यांच्या मतदारसंघ पुनर्रचना विधेयकाला पक्ष पाठिंबा देत असल्याचं जाहीर केल्यानंतर नताशा आव्हाड यांचं ट्वीट चर्चेत
डिलिमिटेशन अर्थात मतदारसंघ पुनर्रचना विधेयकावरून देशाच्या राजकारणात राजकीय घडामोडींना उत आला आहे. राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाने डिलिमिटेशन विधेयकाला पाठिंबा देण्याचा निर्णय घेतला आहे. राष्ट्रवादीचा हा निर्णय काँग्रेस आणि ठाकरेंच्या शिवसेनेला पटलेला नाही. काँग्रेस नेते आणि संजय राऊतांनी उघडपणे पवारांच्या राष्ट्रवादीवर थेट निशाणा साधलाय. तर, पक्षातील कार्यकर्ते आणि नेत्यांनीही पक्षाचा घरचा आहेर देत टीका केली आहे. जितेंद्र आव्हाड यांची लेक नताशा आव्हाड यांनी केलेली एक पोस्ट सध्या चर्चेत आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी ब्रीच कँडी रुग्णालयात शरद पवार यांची भेट घेतल्यानंतर माध्यमांशी संवाद साधताना डिलिमिटेशन विधेयकाला पाठिंबा देण्याबाबत महत्त्वाचं विधान केलं होतं. चर्चा एकदम क्लिअर आहे, डिलिमिटेशन विधेयकाला समर्थन देण्याचे पक्षाचे ठरले आहे आणि आम्ही त्याला पाठिंबा देणार आहोत, असं अव्हाड यांनी म्हटलं होतं. आव्हाडांच्या या प्रतिक्रियेनंतर राज्याच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली.
जितेंद्र आव्हाडांनी केलेल्या घोषणेनंतर आता त्यांची लेक नताशा आव्हाड यांचं ट्विट चर्चेत आलं आहे. माझ्या शांततेला सहमती समजू नका, असं म्हणत बिलाच्या विरोधात भूमिका कायम असल्याचे ट्वीट त्यांनी केलं आहे. नताशा आव्हाड यांनी शनिवारी केलेल्या एका ट्विटमध्ये म्हटलं आहे की, कृपया माझ्या शांततेला सहमती समजू नका. ज्यांनी ज्यांनी मला टॅग केलंय, त्यांचं म्हणणं मी ऐकतेय, मी समजू शकतेय, असं त्यांनी म्हटलं आहे. तसंच, मी मनापासून माफी मागतेय, असंही त्यांनी म्हटलं आहे.
जितेंद्र आव्हाड काय म्हणाले?
डिलिमिटेशनची चर्चा सुरू होण्यापूर्वीच शरद पवारांशी झालेल्या एका अनौपचारिक चर्चेचा संदर्भ देत आव्हाड म्हणाले की, "मतदारसंघांची पुनर्रचना (डिलिमिटेशन) ही संविधानिक प्रक्रिया आहे आणि ती आज ना उद्या करावीच लागते. त्याला कोणताही पर्याय नसतो, त्यामुळे आपापले मतदारसंघ बांधायला शिका, असे पवार साहेबांनी मला सांगितले होते.", असं म्हणत पुढे म्हणाले की, "चर्चा एकदम क्लिअर आहे, डिलिमिटेशन विधेयकाला समर्थन देण्याचे पक्षाचे ठरले आहे आणि आम्ही त्याला पाठिंबा देणार आहोत."