शरद पवारांच्या एका निर्णयामुळे महाराष्ट्रातील सर्वात मोठ्या राजकीय प्रयोगाचा शेवट? कोणत्याही क्षणी मोठा राजकीय भूकंप होणार
सर्वात मोठा पक्ष महाविकास आघाडीतून बाहेर पडणार अशी चर्चा रंगली आहे. महाराष्ट्रात कोणत्याही क्षणी मोठा राजकीय भूकंप होऊ शकतो.
Maharashtra Politics : शरद पवारांच्या राष्ट्रवादीने डिलिमिटेशन पाठींबा जाहीर केल्याने महाराष्ट्रासह देशाच्या राजकारणात खळबळ उडाली आहे. महाराष्ट्राच्या राजकारणावर याचा मोठा परिणाम होणार आहे. शरद पवारांचा राष्ट्रवादी पक्ष हा महाराष्ट्रात विरोधात असलेल्या महविकासआघाडीतील प्रमुख घटक पक्ष आहे. शरद पवारांनी NDA ला पाठिंबा जाहीर केल्याने महाविकासआघाडीत वादाची ठिणगी पडली आहे. यामुळे माहविकास आघाडीच्या अस्तित्वाबाबतच प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.
डिलिमिटेशन अर्थात परिसीमन विधेयकावरून महाविकास आघाडी राहणार की नाही याबाबत आता उलटसुलट चर्चा रंगल्या आहेत. कारण या विधेयकाला पाठिंबा देण्याचा राष्ट्रवादी SPचा निर्णय काँग्रेस आणि ठाकरेंच्या शिवसेनेला पटलेला नाही. काँग्रेस नेते आणि संजय राऊतांनी उघडपणे पवारांच्या राष्ट्रवादीवर थेट निशाणा साधला आहे.
काँग्रेसनं तर सगळी उणीधुणी काढलीत. त्यामुळे भाजपच्या धोरणांना विरोध करण्यासाठी शरद पवार आणि संजय राऊतांच्या पुढाकारातून उदयास आलेल्या महाविकास आघाडीचा प्रयोग संपुष्टात येणार अशीच चिन्हं दिसत आहेत. या फुटीची औपचारिकता शिल्लक राहिल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरु आहे.. पोपट मेलाय, मात्र सांगणार कोण हेच आता बाकी राहिली. दरम्यान टीकेनंतर सोमवारपर्यंत शरद पवारांची भूमिका बदलणार का याचीही उत्सुकता लागली आहे.
डिलिमिटेशनवरुन अंबादास दानवेंचा राष्ट्रवादी SPवर प्रहार
डिलिमिटेशनवरुन अंबादास दानवेंचा राष्ट्रवादी SPवर प्रहार केला आहे. पक्ष चिन्हात तुतारीऐवजी कमळाचा फोटो टाकत घणाघात केला आहे. तुतारी चिन्हामध्ये कमळाचा फोटो पोस्ट केला आहे.
महाविकास आघाडीत ढकलून स्वत: पळून गेले; UBTनेते चंद्रकांत खैरे यांचा शरद पवारांच्या राष्ट्रवादीवर संताप
डिलिमिटेशन विधेयकाला शरद पवारांच्या पक्षानं पाठिंबा दिल्यानं शिवसेना UBTनेते चंद्रकांत खैरे यांनी संताप व्यक्त केलाय. शरद पवारांनी आम्हाला धोका दिला. पवारांच्या मागे जाऊन आम्ही आमचं नुकसान केलंय, असा संताप खैरेंनी व्यक्त केलाय. तसंच आम्हाला महाविकास आघाडीत ढकलून स्वत: पळून गेले, त्यांच्यासोबत राहून काय मिळाले, असा सवालही त्यांनी उपस्थित केला आहे.
महाविकास आघाडीतील सध्याच्या राजकीय घडामोडींवरून ठाकरे गटाचे ज्येष्ठ नेते चंद्रकांत खैरे यांचा संताप अनावर झाला आहे. शरद पवार यांनी घेतलेल्या भूमिकेवर नाराजी व्यक्त करत, ‘त्यांच्या मागे जाऊन आम्ही आमचे नुकसान करून घेतले. आम्हाला महाविकास आघाडीत ढकलून तेच निघून गेले,’ अशा शब्दांत खैरेंनी राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) वर जोरदार टीका केली. पवारांनी आम्हाला धोका दिला असून, त्यांच्यासोबत राहून काय मिळाले, असा सवालही त्यांनी उपस्थित केला. शरद पवार भाजपसोबत जातील, मात्र आम्ही तिथेच राहू, असे अनेक नेते पूर्वी सांगत होते. प्रत्यक्षात सत्ताही मिळाली नाही आणि राजकीयदृष्ट्याही नुकसान झाले, अशी खंत खैरेंनी व्यक्त केली. सुप्रिया सुळे यांच्या भूमिकेवरही त्यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित करत, ‘त्यांचे तळ्यात-मळ्यात सुरू आहे,’ अशी टीका केली.
शरद पवारांच्या राजकीय इतिहासाचा उल्लेख करत खैरे म्हणाले, ‘वसंतदादांपासून आम्हाला शरद पवारांची हिस्ट्री माहिती आहे. ते बाळासाहेबांचे मित्र होते. त्यांनी आम्हाला एकत्र आणले आणि स्वतःच निघून गेले.’ शरद पवारांना आपण बाळासाहेब ठाकरे यांच्याप्रमाणे मानतो, असे सांगतानाच त्यांच्या या भूमिकेमुळे दुःख झाल्याची भावनाही त्यांनी व्यक्त केली.खैरेंच्या या वक्तव्यामुळे महाविकास आघाडीतील अंतर्गत नाराजी आणि राजकीय संघर्ष पुन्हा चर्चेत आला आहे.
खासदारांची संख्या 850 करा किंवा 1 हजार करा... राममंदिर लुटणा-यांना जनता स्वीकारणार नाही... आदित्य ठाकरेंची टीका... शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचा डिलिमिटेशन विधेयकाला विरोध.