बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या अर्णब चक्रीवादळामुळं आजही राज्यात पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. विदर्भासह कोकण आणि मध्य महाराष्ट्रात अनेक ठिकाणी विजांसह पावसाची शक्यता असल्याने सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. तर, उर्वरित राज्यात मात्र ढगाळ हवामान राहणार असून कमाल तापमानात घट होणार आहे.
अर्णब चक्रीवादळ जमिनीवर धडकल्यानंतर आंध्र प्रदेशात घोंघावत आहेत. आंध्र प्रदेशमध्ये मोठ्या प्रमाणात वादळाने नुकसान केले आहे. अनेक ठिकाणी झाडं उन्मळून पडली आहेत. तर तिघांचा मृत्यूदेखील झाला आहे. दक्षिण अंदमान समुद्रात समुद्रसपाटीपासून 5.8 किमी उंचीपर्यंत चक्राकार वारे वाहत अशून या भागात नव्याने कमी दाबाचे क्षेत्र तयार होण्याी शक्यता आहे.
अर्णब चक्रीवादळामुळं राज्यात पावसाला पोषक वातावरण निर्माण झाले आहे. त्यामुळं राज्यातील उन्हाचा पारा कमी झाला आहे. किमान तापमानातही चढ-उतार पाहायला मिळत असून पहाटेच्या वेळी तापमानात घट होऊ लागली आहे. त्यामुळं हवेत काहीसा गारठा जाणवतोय.
आज राज्यात ढगाळ वातावरण असून विजासंह पावसाची शक्यता आहे. कोकणातील रायगड, रत्नागिरी, मध्य महाराष्ट्रातील नंदूरबार, धुळे, नाशिक, पुणे घाटमाथा, सातारा घाटमाथा, मराठवाड्यातील जालना, विदर्भातील अमरावती, नागपूर, चंद्रपूर, भंडारा आणि गोंदिया जिल्ह्यांत विजांसह पावसाची शक्यता असल्याने हवामान विभागाने सतर्कतेचा इशारा दिला आहे.
भंडारा जिल्ह्यासह पूर्व विदर्भात पुढील दोन दिवसांत अवकाळी पाऊस विजांचा कडकडाट आणि सोसाट्याच्या वाऱ्यासह मध्यम ते अतिवृष्टी होण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. या संभाव्य पावसामुळे जिल्ह्यातील शेतकऱ्यांची चिंता वाढली असून हातातोंडाशी आलेल्या धान पिकाला मोठा फटका बसण्याची शक्यता आहे. सध्या शेतांमध्ये धान कापणी, मळणी आणि बांधणीची कामे सुरू आहेत. अशा परिस्थितीत अवकाळी पाऊस झाल्यास शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होऊ शकते. हवामान विभागाच्या अंदाजाच्या पार्श्वभूमीवर जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी अभिषेक नामदास यांनी नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे. विजांचा कडकडाट आणि वादळी वाऱ्याची शक्यता लक्षात घेता नागरिकांनी सुरक्षित ठिकाणी आश्रय घ्यावा. तसेच शेतकऱ्यांनी कापणी केलेले धान सुरक्षित ठेवण्यासाठी आवश्यक खबरदारी घ्यावी असे आवाहन करण्यात येत आहे.
अर्णब वादळाचा परिणाम चंद्रपुरात बघायला मिळाला. शहर जिल्ह्यात बुधवारच्या सुमारास हलक्या पावसाच्या सरी बरसल्या. वेगवान वाऱ्यांसह बरसलेल्या पावसाने वाहतूक आणि दैनंदिनी काही काळासाठी संथ केली. आज सकाळपासूनच चंद्रपूर शहर जिल्ह्यात वादळामुळे ढगाळ वातावरण होते. दिवसभर थंड वारे वाहत असताना संध्याकाळी अचानक वातावरणात बदल झाला. हवामान खात्याने पूर्व विदर्भात पावसाच्या सरी कोसळतील असा अंदाज व्यक्त केला होता. त्यानुसार पाऊस दाखल झाला होता.