नोव्हेंबरअखेरीस हवामानात मोठे बदल, कडाक्याच्या थंडीची चाहूल कधी? वाचा आजचे हवामान
महाराष्ट्रात नोव्हेंबर संपत आला तरी कडाक्याच्या थंडीची प्रतीक्षा आहे. कसं असेल राज्यातील आजचं हवामान.
नोव्हेंबर महिना संपत आला तरी अद्याप कडाक्याच्या थंडीची चाहूल लागली नाहीये. उत्तर महाराष्ट्रात गारठा कायम असला तरी उर्वरित राज्यात मात्र दिवसा उकाड्याने नागरिक हैराण झाले आहेत. पहाटे गारवा आणि दुपारी उकाडा असे वातावरण आहे. नोव्हेंबरअखेरही मुंबईकरांना अपेक्षित थंडीची प्रतीक्षा आहे.
मुंबईत कमाल आणि किमान तापमानात 13.6 अंशांची तफावत नोंदवली आहे. सांताक्रूझमध्ये कमाल तापमान 35, तर किमान 21.4 अंश आहे. कुलाब्यात कमाल तापमान 34.2, तर किमान 23.9 अंश नोंदवले गेले. रत्नागिरीत राज्यातील सर्वाधिक 36.1अंश कमाल तापमान आहे. तर, सोलापूरचे किमान तापमान सरासरीपेक्षा 6.3 अंशांनी अधिक आहे.
पुण्यात कमाल-किमान तापमानात 16 अंशांचा फरक आहे. अमरावतीत सर्वाधिक 17.5 अंशांची तापमान तफावत आहे. नागपूरमध्ये 17, तर गोंदियात 16.7 अंशांचे अंतर आहे. कमाल तापमानाचा पारा घसरण्याची नागरिकांना प्रतीक्षा आहे.
लक्षद्वीपपासून कर्नाटक किनारपट्टीपर्यंत हवेचा कमी दाबाचा पट्टा विस्तारला आहे. गुजरात आणि परिसरावर समुद्र सपाटीपासून 1.5 किमी उंचीवर चक्राकार वाऱ्यांची स्थिती आहे. दक्षिण मध्य महाराष्ट्रापासून उत्तर गुजरातपर्यंत 1.5 किमी उंचीवर हवेचा कमी दाबाचा पट्टा सक्रीय आहे. अंदमान समुद्रात 29 नोव्हेंबर रोजी चक्राकार वाऱ्याची स्थिती तयार होण्याचे संकेत आहेत.
राज्यात ढगाळ वातावरण असल्याने किमान तापमानात वाढ झाली आहे. उत्तर महाराष्ट्रात थंडी कायम असली तरी उर्वरित राज्यात तापमानात वाढ झाली आहे. पूर्व विदर्भाच्या किमान तापमानात घट कायम राहण्याचा व गारठा वाढण्याचा इशारा देण्यात आला आहे.
दरम्यान, पॅसिफिक महासागराच्या पृष्ठभागावर तापमानात मोठी वाढ होत आहे. त्यामुळं एल निनो ऐतिहासिक उच्चांक गाठत आहे. डिसेंबर किंवा जानेवारीमध्ये एल निनो तीव्रतेचे शिखर गाठू शकते. याचा प्रभाव 2027 पर्यंत कायम राहणार आहे. एल निनोमुळं जगभरात अतिवृष्टी आणि सागरी उष्णतेच्या लाटांना धोका वाढण्याची शक्यता आहे.
महासागरांच्या वाढत्या तापमानामुळं सागरी उष्णतेच्या लाटांचा धोका वाढतो. त्याचबरोबर वातावरणातील आर्द्रता आणि उर्जेतही वाढ होते. परिणामी, वादळे आणि पावसाला कारणीभूत ठरणाऱ्या हवामान प्रणालींची तीव्रता वाढून अतितिव्र पावसाची शक्यता वाढू शकते.