म्हाडाची घरे लॉटरीशिवाय मिळणार, पुढचा आठवडा महत्त्वाचा; किंमत आणि लोकेशन कुठं? वाचा A To Z माहिती
म्हाडाच्या लॉटरीची वाट पाहणाऱ्यांसाठी एक महत्त्वाची बातमी समोर येत आहे.
मुंबईत घर घेण्याचं सर्वसामान्यांचे स्वप्न आता साकार होणार आहे. कारण मुंबईतील प्राइम लोकेशनवर लॉटरीशिवाय म्हाडाचे घर घेण्याची संधी सर्वसामान्यांना मिळणार आहे. 'प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य' योजनेतील दीडशेहून अधिक घरांसाठी पुढच्या आठवड्यात जाहिरात वेणार आहे. या घरांच्या किंमती किती असणार व लोकेशन कुठं असणार? याची माहिती जाणून घेऊयात.
2024 मध्ये म्हाडाच्या मुंबई मंडळाने घरांची सोडत जारी केली होती. मुंबई मंडळाने 2030 घरांसाठी लॉटरी जाहीर केली होती. यावेळी पहाडी गोरेगाव, अँटॉप हिल-वडाळा, कोपरी, पवई, कन्नमवार नगर-विक्रोळी, शिवधाम कॉम्प्लेक्स-मालाड येथे ही घरे होती. मात्र ज्यांना अर्ज भरूनही लॉटरीमध्ये घर लागलं नाही. त्यांना आता घर घेण्याची संधी मिळणार आहे.
'प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य' या योजनेत साधारण दीडशेहून अधिक घरांची विक्री करण्याची तयारी महाडाने सुरू केली आहे. म्हाडाने सर्वप्रथम फेब्रुवारीत या योजनेअंतर्गत मुंबईतील 118 घरांसाठी जाहिरात काढली होती. काही घरांच्या किमती बाजारभावापेक्षा अधिक असल्याने निम्म्याहून अधिक घरे रिक्त राहिली होती. त्या शिल्लक घरांचादेखील घरांचा नव्या जाहिरातीत समावेश केला जाणार आहे.
या लोकेशनला असणार घरे
'प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य' योजनेतील दीडशेहून अधिक घरांसाठी पुढच्या आठवड्यात जाहिरात वेणार आहे. यात शिपोली, चारकोप, जुहू, पवई, वरळी, वडाळा, भायखळा, माझगाव, ताडदेव अशा विविध लोकेशनवरील घरांचा समावेश आहे.
किंमत किती असणार?
50 लाखांपासून ते साडेसहा कोटी रुपयांपर्यंत या घराच्या किमती असणार आहेत.
किंमती कमी होणार?
सोडतीत विक्री न झालेल्या घरांच्या मेंटेनन्स व देखभालीवर म्हाडाला मोठ्या प्रमाणात खर्च करावा लागतो. त्यामुळं प्रशासकीय शुल्क आणि नफा कमी करुन घरांच्या सुधारित किंमतीबाबत म्हाडा लवकरच निर्णय घेणार आहे. त्यानुसार घरांच्या किंमती 7 ते 15 टक्क्यांपर्यंत कमी होऊ शकतात, अशी शक्यता आहे.