'शिवाजी पार्कमधला दीपोत्सव होणार नाही', दुष्काळामुळे राज ठाकरेंचा मोठा निर्णय, 'फटाके फोडताना आवर घाला'
मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी शिवाजी पार्कात दिवाळीनिमित्त दरवर्षी होणारा दीपोत्सव दुष्काळामुळे रद्द करण्यात आल्याचं जाहीर केलं आहे.
मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी शिवाजी पार्कात दिवाळीनिमित्त दरवर्षी होणारा दीपोत्सव दुष्काळामुळे रद्द करण्यात आल्याचं जाहीर केलं आहे. राज ठाकरेंनी एक्सवर व्हिडीओ शेअर करत अधिकृतपणे घोषणा केली आहे. दुष्काळी परिस्थिती असताना फटाके फोडणे, विद्युत रोषणाई करणे टाळा असं आवाहन त्यांनी केलं आहे. काळी दिवाळी नाही मात्र उत्साहाला आवर घाला असं ते म्हणाले आहेत. यावेळी त्यांनी फटाके फोडताना आवर घालण गरजेचं असल्याचंही म्हटलं. तसंच सत्ताधारी पक्षांना दुष्काळी स्थितीचे गांभीर्य कळले नाही म्हणून ते गरबा खेळण्यात रमले अशी टीकाही केली.
"शिवाजी पार्कात दीपोत्सवसाठी प्रचंड उत्साह असतो. फटाक्यांची आतषबाजीही असते. हे पाहण्यासाठी मुंबई, ठाण्यासह महाराष्ट्रातील कानाकोपऱ्यातून लोक येतात आणि आनंद लुटतात. सगळेजण खूप मजा करत असतात. पण यावर्षीचा दीपोत्सव साजरा न करण्याचा निर्णय आम्ही घेतला आहे. याचं एकमेव कारण महाराष्ट्रात आलेला, असलेला आणि येऊ घातलेला दुष्काळ आहे. दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर असा प्रकारचे उत्सव साजरा व्हावा असं मनाला पटलं नाही," असं राज ठाकरेंनी म्हटलं आहे.
पुढे ते म्हणाले की, "आज महाराष्ट्र अत्यंत एका विचित्र अवस्थेतून जात आहे. महाराष्ट्रात आज अनेक ठिकाणी पाण्याचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. दुष्काळ तर भयानक आहे आणि येणार आहे. अशा सगळ्या स्थितीत आपण ज्या उत्साहात दिवाळी साजरी करत आहोत हे पाहणं महाराष्ट्रातील ग्रामीण भागातील बांधव आणि भगिनींना, त्यांच्या मुलांना काय वाटत असेल याचा विचार आपण केलं पाहिजे".
'सत्ताधारी पक्षातील नेत्यांना बहुधा समजले नाही'
"मुख्यमंत्र्यांनी 72 पेक्षाही जास्त भयानक दुष्काळ असेल असं सांगितलं आहे. हे त्यांनी आधी जाहीर करुनही सत्ताधारी पक्षातील नेत्यांना बहुधा समजले नाही आणि ते गरबा खेळत बसले," अशी टीकाही त्यांनी केली आहे. दिवाळी आणि अशा प्रकारचा दीपोत्सव साजरा करणं मनाला पटत नसल्याने निर्णय घेतल्याची माहिती त्यांनी दिली.
'फोडताना, रोषणाई करताना स्वत:ला आवर घालणं आवश्यक'
"पुढील वर्षी सर्व ठीक होईल अशी आशा असून, ईश्वरचरणी तशी प्रार्थनाही आहे. आज महाराष्ट्रातील असंख्य ठिकाणांहून तांडेच्या तांडे बाहेर पडतील आणि ते शहरांकडे येतील. शहराची स्थिती आपण पाहत आहोतच. आणि महाराष्ट्रातील अशा स्थितीत उत्सव साजरा करणं मनाला पटलं नाही. माझी आपल्यालाही विनंती आहे की, काळी दिवाळी साजरी करायची नाही, पण उत्सवाला आवर घालणं गरजेचं आहे. फटाके फोडताना, रोषणाई करताना स्वत:ला आवर घालणं आवश्यक आहे," असं आवाहन त्यांनी केलं.
महाराष्ट्रातील नागरिक अशाप्रकारे होरपळत असताना....
"आपण सगळे महाराष्ट्राचे नागरिक असून, महाराष्ट्रावर सर्वांच प्रचंड प्रेम आहे. महाराष्ट्रातील नागरिक अशाप्रकारे होरपळत असताना आपण प्रचंड मोठ्या प्रमाणावर उत्सव साजरा करणं मला पटत नाही आणि आपल्यालाही नाही पटलं पाहिजे. कंदील लावा, फराळ वाटा पण रोषणाई कऱणं, फटाके फोडणं याला आवर घाला," अशी विनंती त्यांनी केली आहे. पुढील वर्षी पुन्हा एकदा जोरात दीपोत्सव, दिवाळी साजरी करुयात असं ते अखेरीस म्हणाले आहेत.