50 लाख प्रवासी, 3 कंपन्या अन् 3 नोव्हेंबर 2026 ची डेडलाईन... नवी मुंबई एअरपोर्टसंदर्भात मोठी अपडेट
2017 मधील स्ट्रकवेलच्या आणि आयआयटी मुंबईच्या 2024 च्या अहवालाचा संदर्भ देत सध्याच्या विमानतळावरील टर्मिनस एकच्या कामाची काय गरज आहे हे सांगण्यात आलं आहे.
मुंबईतील मुख्य विमानतळ म्हणजेच छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावरील (सीएसएमआयए) टर्मिनल 1 च्या पुनर्विकासासाठीच्या हलचाली सुरु झाल्या आहेत. देशातील सर्वात व्यस्त विमानतळांपैकी एक असलेल्या या विमानतळावरील वाहतूक नव्याने उभारण्यात आलेल्या नवीन मुंबई विमानतळावर वळवण्यासंदर्भातील चर्चा सुरु आहेत. टर्मिनल 1 च्या पुनर्विकासासाठी दरवर्षी सुमारे 50 लाख आंतरराष्ट्रीय प्रवाशांच्या वाहतुकीचे स्थलांतर टप्प्याटप्प्याने करण्याची योजना आखण्यात आली आहे. मुंबई विमानतळाचे संचालक आणि एअरलाइन ऑपरेटर्स कमिटीची (एओसी) याबद्दल बैठक झाली. बुधवारी झालेल्या बैठकीमध्ये तीन प्रमुख कंपन्यांनी प्रवासी वाहतुकीसाठी नवी मुंबई एअरपोर्ट वापरण्यास आमची काही हरकत नसल्याचं सांगितलं आहे.
कोणत्या कंपन्यांनी दिली मंजुरी
इंडिगो, एअर इंडिया आणि अकासा एअर या तीन कंपन्यांनी त्यांची 30 लाख प्रवाशांची आंतरराष्ट्रीय वाहतूक नवी मुंबई विमातनळाकडे वळवण्याची तयारी दर्शवली आहे. मात्र उरलेल्या 20 लाख प्रवाशांसाठी सध्याच्या विमातळावरील टर्मिनल 2 मधले काही स्लॉट तात्पुरत्या स्वरुपात स्थलांतरित करण्याचा प्रस्ताव मांडण्यात आला आहे. मागील 9 वर्षांपासून म्हणजेच 2017 पासून रखडलेलं असल्याचं पत्रकामध्ये नमूद करण्यात आलं आहे. विमानतळ प्रशासनाने दोन अहवालांचा संदर्भ देत टर्मिनस 1 चा पुनर्विकास का महत्त्वाचा आहे सांगितलं आहे. यामध्ये त्यांनी 2017 मधील स्ट्रकवेलच्या आणि आयआयटी मुंबईच्या 2024 च्या अहवालाचा संदर्भ दिला आहे. पुनर्विकासासाठी कशापद्धतीने वेळापत्रक असायला हवं यासंदर्भात विमानतळ प्रशासनाने विमानतळ कंपन्यांच्या प्रतिनिधींसमोर सविस्तर प्रस्ताव मांडला. नवं टर्मिनस एक कसं असेल हे ही यावेळेस दाखवण्यात आलं.
3 नोव्हेंबरची डेडलाइन
आंतरराष्ट्रीय उड्डाणांचे नवी मुंबई विमानतळाकडे स्थलांतर करण्यासंदर्भात काय काय करता येईल याबद्दल इंडिगो, एअर इंडिया आणि अकासा एअर यांनी त्यांच्याकडील तपशील आणि नियोजनाचे मुद्दे सांगितले आहे. प्रवाशांचं हे स्थलांतर उत्तर उन्हाळी हंगाम 2027 म्हणजेच नॉर्दर्न समर 2027 पासून करण्याचे नियोजन आहे. विमानतळ प्रशासनाने सर्व विमान कंपन्यांना त्यांचे स्थलांतरविषयक नियोजन 3 नोव्हेंबर 2026 पर्यंत सादर करण्यास सांगितले आहे. त्यानंतर स्थलांतराचा अंतिम आराखडा निश्चित केला जाणार आहे.
एक कोटींनी वाढणार प्रवासी क्षमता
'सीएसएमआयए'ची सध्याची वार्षिक प्रवासी क्षमता सुमारे 5.5 कोटी आहे. त्यापैकी 50 लाख प्रवाशांच्या वाहतुकीचे तात्पुरते स्थलांतर झाल्यानंतरही सध्याच्या एकूण प्रवासी वाहतुकीपैकी सुमारे 91 टक्के वाहतूक मुंबई विमानतळावरच सुरू राहील, असा दावा विमानतळ प्रशासनाचा आहे. टर्मिनल 1 आणि टर्मिनल 2 चा पुनर्विकास व विस्तार पूर्ण झाल्यानंतर सीएसएमआयएची वार्षिक प्रवासी क्षमता 6.5 कोटींपर्यंत वाढण्याची अपेक्षा आहे. मात्र अवघी 9 टक्के वाहतूक नवी मुंबई विमानतळाकडे वळवली तरी या विमानतळाचे महत्त्व मोठ्या प्रमाणात वाढणार असे चित्र दिसत आहे.