लोकल खोळंब्याने घेतला तीन मुंबईकरांचा जीव! 21 वर्षीय साहिल तर कॉम्युटर क्लासवरुन निघाला अन्...
भांडुप रेल्वे स्थानकात आज साहिल थिटे या २२ वर्षीय तरुणाचा रेल्वे अपघातात मृत्यू झाला. हा मृत्यू रेल्वेच्या गलथान कारभाराने झाल्याचा आरोप कुटुंब आणि मित्र मंडळींचा आहे
कांजूरमार्ग येथे केबीनला आग लागल्याने सिग्नल यंत्रणेतील बिघाड आणि मुलुंड-ठाणे दरम्यान ओव्हरहेड वायर तुटल्याने मध्य रेल्वेची वाहतूक सोमवारी खोळंबली. मात्र याचा फटका सर्वसामान्य मुंबईकरांना बसला. लोकलच्या धडकेत तीन जणांचा मृत्यू झाल्याने खळबळ उडाली आहे. तर दोघे जखमी झाले आहेत.
भांडुप रेल्वे स्थानकात रुळ ओलांडताना एसी लोकलच्या धडकेत 21 वर्षीय साहिल थिटे या तरुणाचा मृत्यू झाला आहे. या शिवाय घाटकोपर-विक्रोळी स्थानकादरम्यानदेखील दोन मृतदेह आढळले आहेत. रेल्वे रूळ ओलांडताना रेल्वेची धडक बसल्याने मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती समोर येतेय.
घाटकोपर आणि विक्रोळी स्थानकादरम्यान दोन मृतदेह आढळले आहेत. राहुल राजभर वय 25 आणि खरबान राजभर वय 40 अशी मृतांची ओळख पटली आहे. मोटरमनला हे मृतदेह रुळांवर पडलेले दिसले, अशी माहिती रेल्वे पोलीस आणि आरपीएफ अधिकाऱ्यांनी दिली आहे. सुरुवातीला एक मृतदेह असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती, मात्र घटनास्थळी गेल्यानंतर तिथे दुसरा मृतदेह देखील आढळला. नेमके आता या घटना कशा घडल्या याबाबत अधिकची माहिती नाही.
लोकल सेवा ठप्प झाल्याने अनेक प्रवासी रेल्वे रुळांवरुन चालत जाऊन जवळचे स्थानक गाठत होते. अवघ्या तीन मिनिटांच्या प्रवासासाठी प्रवाशांना दोन तास लोकलमध्येच ताटकळत उभे राहावे लागले. रेल्वे रुळांवर चालत जाऊन जवळची स्थानके गाठण्यास सुरुवात केली. या गोंधळात अनेकांनी पायी चालत जाणेच सोयीचे असल्याचे म्हणत लोकलमधून उतरत स्थानक गाठायला सुरुवात केली. मात्र लोकलचा अंदाज न आल्याने लोकलच्या धडकेत प्राण गमवावा लागला.
21 वर्षांच्या साहिलने प्राण गमावले
मुलुंड कॉलनीतील अमर नगर परिसरात राहणारा साहिल थिटे हा भांडुप येथे नाईट हायस्कूल अँड ज्युनिअर कॉलेजमध्ये शिकत होता. सोमवारी तो भांडुप स्थानकातील फलाट क्रमांक चारवर लोकल पकडण्यासाठी उभा होता. फलाट क्रमांक दोनवर लोकल येत असल्याची माहिती मिळताच तिथे लवकर पोहोचण्याच्या प्रयत्नात त्याने रेल्वे रुळ ओलांडण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी प्लॅटफॉर्म क्रमांक तीनवर येणाऱ्या एसी लोकलची धडक बसल्याने साहिल गंभीर जखमी झाला. त्यातच त्याचा मृत्यू झाला.
भांडुप रेल्वे स्थानकात आज साहिल थिटे या 22 वर्षीय तरुणाचा रेल्वे अपघातात मृत्यू झाला. हा मृत्यू रेल्वेच्या गलथान कारभाराने झाल्याचा आरोप कुटुंब आणि मित्र मंडळींचा आहे. साहिल भांडुपमध्ये राहतो. साहिलला दोन बहिणी आहेत. तो बीकॉमच्या शेवटचा वर्षाला शिकत होता. ठाणे येथून तो कंप्यूटर क्लास करून घरी निघाला होता. मात्र भांडुप येथे चार क्रमांकाचा फलाटावरून तो पलीकडे जात असताना त्याला लोकल ने धडक दिली आणि यात त्याचा मृत्यू झाला. या प्रकरणी मयत साहिल च्या कुटुंबाला रेल्वे प्रशासनाने भरपाई देण्याची मागणी करण्यात आली आहे.
दोन जण जखमी
रेल्वेच्या धडकेत आणखी दोन जखमी झाले आहेत. ठाणे-मुलुंड दरम्यान ही घटना घडली असून जखमींना तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्यांच्यावर तातडीचे उपचार सुरू असून ते गंभीर जखमी आहेत.