मोठी बातमी! 'कर्मचारी विशेष' लोकल कायमची बंद करणार किंवा...; ठाणे स्टेशनवरील कर्मचाऱ्यांच्या मुजोरपणानंतर रेल्वेकडून 2 पर्यायांवर विचार सुरु
मुंबईमध्ये 9 तास रेल्वे वाहतुकीचा खोळंबा झाल्यानंतर ठाणे स्थानकामध्ये रिकाम्या कर्मचारी विशेष रेल्वेत सर्वसामान्यांना चढू न देण्यासाठी ट्रेनची दारं आतून लावून घेतल्यानंतर संतापाची लाट उसळली असून आता या लोकल ट्रेनसंदर्भात प्रशासन मोठा निर्णय घेण्याचा तयारीत आहे.
सोमवारी, 26 ऑक्टोबर रोजी मध्य रेल्वेच्या मुख्य मार्गावर जवळपास 9 तास ट्रेनचा खोळंबा झाल्याने सर्वसामान्यांच्या आठवड्याची सुरुवातच मनस्तापाने झाली. त्यातच सायंकाळी पाचच्या सुमारास ठाणे स्थानकामध्ये दाखल झालेली 'रेल्वे कर्मचारी विशेष' लोकल आतमधून बंद करुन ठेवण्याचा खुळचटपणा रेल्वे कर्मचाऱ्यांनी केला. त्यामुळे एकीकडे प्लॅटफॉर्मवर खचाखच गर्दी असतानाच दुसरीकडे जवळपास रिकाम्या ट्रेनमध्ये प्रवाशांना प्रवेश नाकारल्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आणि त्यासंदर्भात संतापाची लाट दिसून आली. याच संतापाची दखल आता रेल्वे प्रशासनाकडून घेतली जात असून वादाच्या केंद्रस्थानी असलेली या 'रेल्वे कर्मचारी विशेष' ट्रेन कायमची बंद होऊ शकते असं सांगितलं जात आहे.
कारवाईची तयारी
सोमवारी कांजुरमार्ग येथील आगीनंतर मध्य रेल्वेची लोकल वाहतूक कोलमडलेली असताना रेल्वे कर्मचाऱ्यांसाठी धावणाऱ्या विशेष लोकलचे दरवाजे बंद ठेवल्याचा प्रकार समोर आला. या घटनेची गंभीर दखल घेत मध्य रेल्वेने दरवाजे बंद ठेवणाऱ्या कर्मचाऱ्यांवर कारवाईसंदर्भात हालचाली सुरू केल्या आहेत. केवळ कर्मचाऱ्यांवरच कारवाई तर कठोर भूमिका घेत कर्मचारी विशेष लोकल कायमस्वरूपी रद्द करण्याचाही विचार सुरु आहे. तसेच ही लोकल कायमची बंद केली नाही तरी ती आता चालतेय तशी चालू न देता त्यामध्ये बदल करण्याचा विचार सध्या रेल्वे प्रशासनाकडून सुरु आहे.
सोमवारी नेमका वाद काय झाला?
छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसहून दुपारी साडेचार वाजता कल्याणसाठी जलद लोकल सुटते. ही लोकल केवळ रेल्वे कर्मचाऱ्यांसाठी असून ती नियमित धावते. भायखळा, परळ, माटुंगा, कुर्ला, घाटकोपर, ठाणे आणि डोंबिवली या स्थानकांवर तिचे थांबे आहेत. सोमवारी रेल्वे गोंधळ सुरू असताना कुर्ला स्थानक गेल्यानंतर या लोकलच्या डब्यांचे दरवाजे आतून बंद करण्यात आले. ठाणे स्थानकात फलाटावर उभ्या असलेल्या प्रवाशांनी लोकलमध्ये चढण्याचा प्रयत्न केला. मात्र दरवाजे बंद असल्याने त्यांना प्रवेश मिळाला नाही. फलाटांवर प्रवासी ताटकळत असताना ही कर्मचारी विशेष लोकल तुलनेने रिकामीच कल्याणपर्यंत धावली.
दोन पर्याय आले समोर; कशाची निवड होणार?
या प्रकारानंतर रेल्वे कर्मचारी विशेष लोकलबाबत दोन पर्याय पुढे आले आहेत. पहिला पर्याय म्हणजे ही लोकल कायमस्वरूपी रद्द करणे. दुसऱ्या पर्यायानुसार सीएसएमटी ते माटुंगापर्यंत ही जलद लोकल रेल्वे कर्मचाऱ्यांसाठी चालवून, त्यानंतर माटुंगा ते कल्याणपर्यंत ती धीम्या मार्गावर सामान्य प्रवाशांसाठीही खुली करणे. या दोन्ही पर्यायांपैकी एकावर वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या बैठकीत निर्णय होणार असल्याचे रेल्वे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.
या वादानंतर अनेक प्रवाशांनी ही ट्रेन कायमची बंद केली पाहिजे असं सोशल मीडियावर संताप व्यक्त करताना म्हटलेलं. त्यापैकीच एक प्रातिनिधिक प्रतिक्रिया खाली पाहा...
आता खरोखरच या ट्रेनसंदर्भात काय निर्णय होतो हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.