मुंबईकरांसाठी महत्त्वाची बातमी, सहाव्या मार्गिकेच्या कामाला वेग, आता वांद्रे स्थानकात आणखी एक प्लॅटफॉर्म
मुंबई लोकलबाबत एक चांगली बातमी समोर येत आहे. आता वांद्रे स्थानकात आणखी एका प्लॅटफॉर्मची वाढ होत आहे.
मुंबई सेंट्रल ते बोरीवली सहाव्या मार्गिकेच्या कामाला गती देण्यासाठी रेल्वेकडून कामाचे नियोजन करण्यात येत आहे. या प्रकल्पांतर्गंत आता वांद्रे स्थानकात नवीन प्लॅटफॉर्म उभारण्यात येणार आहे. वांद्रे पूर्वेकडील नवीन प्लॅटफॉर्म क्रमांक 8 सहाव्या मार्गिकेशी जोडले जाणार असून या कामांना आता गती मिळणार आहे.
वांद्रे-खारदरम्यान सहावी मार्गिका प्रकल्प प्रस्तावित आहे. या प्रकल्पामुळं प्रशासनाला विद्यमान रेल्वे पायाभूत सुविधांमध्ये विविध बदल करावे लागणार आहेत. त्याचाच एक भाग म्हणून वांद्रे स्थानकात सध्याच्या प्लॅटफॉर्म क्रमांक 7 सोबत पूर्वेकडे नवीन होम प्लॅटफॉर्म क्रमांक 8 उभारण्यात येणार आहे.
या प्लॅटफॉर्मसाठी याच भागातील सुमारे 100 प्रकल्पग्रस्तांचे स्थलांतर जवळपास पूर्ण झाले आहे. तर, उर्वरित प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर प्लॅटफॉर्मच्या कामाचा मार्ग पूर्ण होणार आहे. गरीब नगर येथील 100 झोपडपट्टीधारकांपैकी 94 प्रकल्पग्रस्तांचे पुनर्वसन एमएमआरडीएकडून पूर्ण झाले असून उर्वरित बाधितांचे स्थलांतर करण्यात येत आहे. त्यानंतर तिथल्या झोपड्या तोडून सुविधा उभारण्याचे काम सुरू होणार आहे.
मुंबई सेंट्रल- दादर 5.69 किमी सहावी मार्गिका मार्च 2029, तर दादर-खार रोड 7.64 किमी मार्गिका डिसेंबर 2029 पर्यंत पूर्ण करण्याचे लक्ष्य आहे. त्यामुळं वांद्रे स्थानकातील नवीन प्लॅटफॉर्म क्रमांक 8 आणि त्यासंबंधित कामे सहाव्या मार्गिकेच्या अंतिम जोडणीच्या दृष्टीने महत्त्वाची आहेत.
प्लॅटफॉर्म क्रमांक 1-4 मुख्य मार्गावरील लोकलसाठी तर प्लॅटफॉर्म क्रमांक 5 ते 7 हार्बर मार्गावरील लोकलसाठी वापरले जातात. आता मुंबई सेंट्रल-बोरीवली सहाव्या मार्गिकेसाठी पूर्वेकडे उभारण्यात येणाऱ्या प्लॅटफॉर्ममुळं वांद्रे स्थानकातील प्लॅटफॉर्मची संख्या आठ होणार आहे.
मुंबई सेंट्रल ते बोरीवली दरम्यानची सहावी मार्गिका पूर्ण करण्यासाठी दादर-खार रोड हा महत्त्वाचा टप्पा आहे. या भागात वांद्रे-खार रेल्वे उड्डाणपुलाची पुनर्बांधणीही करण्यात येणार आहे. त्यामुळं वांद्रे स्थानकातील नवीन प्लॅटफॉर्मसह परिसरातील विविध संरचनांची कामे परस्परांशी जोडलेली आहेत.
लोकलविलंबामुळं लेटमार्क
ठाण्यापुढील उपनगरी मार्गावर लोकल सातत्याने उशिराने धावत असल्याने प्रवाशांचा त्रास वाढला आहे. सकाळ-संध्याकाळ गर्दीच्या वेळेत लोकल किमान 15 मिनिटे ते अर्धा तास उशिराने धावत असल्याचा प्रवाशांचा आरोप आहे. वातानुकूलित लोकल वाढवल्या जात असल्यामुळे नियमित लोकलना विलंब होत असल्याचे प्रवाशांचे म्हणणे आहे. दररोजच्या 'लेट मार्क' मुळे नोकरीवर परिणाम होण्याची भीती निर्माण झाली असून, रेल्वे प्रशासनाने लोकल वेळापत्रक काटेकोरपणे पाळावे, अशी मागणी प्रवाशांकडून करण्यात येत आहे.