माहिम ज्वेलर्स गोळीबार प्रकरणात मोठी अपडेट, बिष्णोई गँगचे नाव घेत मालकाने केला मोठा दावा
मुंबईतील माहिम परिसरात गोळीबाराची घटना घडल्याने खळबळ उडाली आहे. एल. जे. रोडवरील जागृती सोसायटी आणि शोपा हॉटेल जंक्शनजवळ असलेल्या पी. सी. जैन ज्वेलरी शॉप बाहेर सायंकाळी सुमारे 7.35 वाजण्याच्या सुमारास हा गोळीबार झाला.
पुण्यानंतर मुंबईदेखील गोळीबाराच्या घटनेने हादरली आहे. मुंबईतील माहिम परिसरात सराफाच्या दुकानाबाहेर गोळीबार केल्याची घटना बुधवारी घडली होती. एल. जे. रोडवरील जागृती सोसायटी आणि शोपा हॉटेल जंक्शनजवळ असलेल्या पी. सी. जैन ज्वेलरी शॉपबाहेर रात्री सुमारे 7 वाजून 35 मिनिटांनी हा गोळीबार करण्यात आला होता. आता या प्रकरणात मोठी अपडेट समोर येत आहे. ज्वेलर्स मालकाला काही दिवसांपूर्वीच धमकी आल्याची खळबळजनक माहिती समोर येतेय.
प्राथमिक माहितीनुसार, पी सी जैन ज्वेलर्सवर झालेल्या गोळीबार प्रकरणात मोठी माहिती पोलिसांच्या हाती लागली आहे. ज्वेलर्स मालकाला काही दिवसांपूर्वीच खंडणीसाठी धमकी आली होती. ही धमकी बिष्णोई गँगकडून आल्याचा दावा ज्वेलर्स मालकाने केला होता. त्यानुसार पोलिस या प्रकरणात तपास करत आहेत. दहशत निर्माण करून व्यापाऱ्यावर दबाव टाकण्यासाठी आणि खंडणीच्या वादातून हा गोळीबार केला असावा, असा प्राथमिक संशय व्यक्त केला जात आहे.
धमकी खरंच बिष्णोई गँगकडून आली होती की, बिष्णोई गँगचे नाव घेऊन इतर कोणीतरी धमकी देण्याचा कट रचला आहे का? याचा तपास आता पोलिसांकडून करण्यात येत आहे. तसंच, गोळाबाराचा नेमका उद्देश काय, याचा शोधही पोलिसांकडून घेतला जातोय.
मिळालेल्या माहितीनुसार, बुधवारी रात्री हेल्मेट घातलेले दोन अज्ञात हल्लेखोर मोटारसायकलवरून घटनास्थळी आले. त्यांनी दुकानाजवळ दुचाकी थांबवली आणि पायरीवरून चालत येत ज्वेलरी शॉपच्या बाहेरून दोन राऊंड फायरिंग केली. या घटनेत ज्वेलरी शॉपचे मालक आणि कर्मचारी सुदैवाने बचावले असून, कोणालाही दुखापत झालेली नाही.
गोळीबार केल्यानंतर दोन्ही हल्लेखोर मोटारसायकलवरून घटनास्थळावरून पसार झाले. दरम्यान, हल्लेखोरांनी पी. सी. जैन ज्वेलर्सच्या दुकानावर 5 ते 6 गोळ्या झाडल्या असल्याचे समोर आले आहे. घटनेची माहिती मिळताच अतिरिक्त पोलीस आयुक्त विक्रम देशमाने, परिमंडळ ५ चे पोलीस उपायुक्त महेंद्र पंडित तसेच माहिम पोलीस ठाण्याचे अधिकारी घटनास्थळी दाखल झाले. फॉरेन्सिक पथकानेही घटनास्थळी पोहोचून तपासणी सुरू केली आहे. हल्लेखोरांची ओळख पटवून त्यांचा शोध घेण्यासाठी पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे. गोळीबारामागील नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही.
मागील काही महिन्यांत मुंबईतील व्यापारी आणि सेलिब्रिटींना बिश्नोई गँगच्या नावाने धमक्या येण्याच्या व गोळीबाराच्या घटना घडल्या असल्याने या प्रकरणाकडे विशेष गांभीर्याने पाहिले जात आहे.