10 कोटींची खंडणी, तीन वेळा धमकीचा फोन; स्पॅम समजून दुर्लक्ष केलं, माहिम ज्वेलर्स गोळीबार प्रकरणाचा संपू्र्ण घटनाक्रम
माहिममध्ये पी सी जैन ज्वेलर्सवर झालेल्या गोळीबार प्रकरणात मोठी अपडेट समोर आली असून आरोपींनी 10 कोटींची खंडणी मागितल्याचे समोर आले आहे.
मुंबईतील माहीम येथील पीसी जैन ज्वेलर्स येथे झालेल्या गोळीबाराच्या घटनेप्रकरणात दाखल करण्यात आलेल्या एफआयआरमधून एक महत्त्वपूर्ण खुलासा झाला आहे. ज्वेलरी दुकानाचे मालक भरत मेघराज जैन यांच्याकडे 10 कोटी रुपयांची खंडणी मागण्यात आल्याचे समोर आले आहे. खंडणी न दिल्यास त्यांना जीवे मारण्याची धमकीदेखील देण्यात आली होती. आरोपींनी विविध मोबाईल क्रमांकांवरून फोन केले आणि धमकीचे संदेश पाठवले, असल्याचे त्यांनी तक्रारीत म्हटलं आहे.
बुधवारी 25नोव्हेंबर रोजी संध्याकाळी 7.35 च्या सुमारास मोटारसायकलवरून आलेल्या दोन अज्ञात गुन्हेगारांनी त्यांच्या दुकानाजवळ येऊन पाच ते सहा गोळ्या झाडल्या होत्या. मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, हेल्मेट घातलेले दोन अज्ञात इसम दुचाकीवरून आले होते. त्यानंतर दुकानाजवळ दुचाकी थांबवून खाली उतरत थेट दुकानाबाहेरील फुटपाथवरून गोळीबार केला होता. या प्रकाराने संपूर्ण मुंबई हादरली होती.
पीसी जैन ज्वेलर्सचे मालक भरत जैन यांना सातत्याने धमक्या येत असल्याचे समोर येत आहे. भरत जैन यांना 18 ऑक्टोबर रोजी पहिली धमकी आली होती. तेव्हा अनोळखी नंबर वरून फोन आल्याने भरत जैन यांनी सुरवातीला दुर्लक्ष केलं. मात्र संध्याकाळी त्यांना गोळी मारण्याची मेसेजद्वारे धमकी देण्यात आली होती.
दुसरी धमकी भरत जैन यांना 24 तारखेला आली होती. संध्याकाळी 7 ते 7.15 च्या दरम्यान दोन फोन आले. तो नंबर अनोळखी असल्यामुळे त्यांनी फोन उचलला नाही. त्यानंतर थोड्याच वेळात, त्याच नंबरवरून आणखी एक मेसेज आला, ज्यामध्ये लिहिले होते, "रेडी रखना चमत्कार छाया" भरत जैन यांच्या म्हणण्यानुसार, त्यांना या मेसेजचा अर्थ समजला नाही, म्हणून त्यांनी त्याकडे दुर्लक्ष केले.
31 ऑक्टोबर रोजी त्यांना तिसरी धमकी आली होती. रात्री साधारण 8.38 वाजता, त्यांना एका अनोळखी नंबरवरून त्याच्या मोबाईलवर एक धमकीचा मेसेज आला. त्यात लिहिले होते, "जय रामजी, जास्त विचार करू नका. ही तुमची जन्मकुंडली आहे. तुमच्याकडे झेड-प्लस सुरक्षा असली तरी तुम्हाला पैसे द्यावेच लागतील. फक्त यमराजाकडे बघा... तुम्हाला १० कोटी रुपये द्यावे लागतील."
सातत्याने मिळणाऱ्या धमक्यांमुळं जैन हे घाबरले होते. त्यांनी तात्काळ त्यांचे नातेवाईक अशोक जैन यांना याची माहिती दिली. मात्र, त्यांनी हा एक प्रकारचा स्पॅम किंवा सायबर फसवणुकीद्वारे पैसे उकळण्याचा डाव असल्याचं म्हटलं होतं. भरत जैन यांनी पुढे म्हटलंय की, त्यांचा कोणाशीही वाद नव्हता. तरीही त्यांना असे मेसेज का आले ठावूक नाही. मात्र, यानंतर त्यांनी अनोळखी नंबरवरून येणारे फोन रिसिव्ह करण्याचा निर्णय घेतला. पण त्यांना पुढे कोणतेही धमकीचे फोन किंवा मेसेज आले नाहीत. त्यामुळे त्यांनी पोलिसांत तक्रार दाखल केली नाही.