75 दिवस मुंबईकरांची तारेवरची कसरत; लोकलचे वेळापत्रक बिघडणार, असं असेल हंगामी वेळापत्रक
वांद्रे टर्मिनसवर फलाटाच्या कामासाठी 75 दिवसांचा मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. कसं असेल वेळापत्रक जाणून घेऊयात.
मुंबईकरांसाठी महत्त्वाची बातमी समोर येत आहे. रेल्वे प्रशासन तब्बल 75 दिवसांचा वाहतूक ब्लॉक घेण्यात येणार आहे. वांद्रे टर्मिनसवर फलाटाच्या पुनर्बांधणीसाठी हा पॉवर ब्लॉग घेण्यात येणार आहे. 1 डिसेंबर 2026 ते 13 फेब्रुवारी 2026 या कालावधीत हे काम हाती घेण्यात येईल. त्यामुळं या काळात लोकलसह लांब पल्ल्याच्या गाड्यांसह उपनगरीय रेल्वे सेवांवरही परिणाम होणार आहे.
फलाट क्रमांक 5 वरील सिमेंट काँक्रीटच्या (सीसी) आवरणाची दुरुस्ती आणि पुनर्बांधणी करण्यासाठी 75 दिवसांचा मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. या कामाचा परिणाम लांब पल्ल्याच्या गाड्यांसह उपनगरीय रेल्वे सेवांवरही होणार आहे. काही मेल-एक्स्प्रेस गाड्यांची स्थानके बदलण्यात येणार असून, चार लोकल फेऱ्या संपूर्ण ब्लॉक कालावधीत रद्द करण्यात आल्या आहेत.
वांद्रे टर्मिनसवरील फलाट क्रमांक पाचवरून अनेक लांब पल्ल्याच्या गाड्यांची वाहतूक होते. या फलाटाच्या काँक्रीट आवरणाची दुरुस्ती आणि पुनर्बांधणी करण्यासाठी पश्चिम रेल्वेने हा दीर्घकालीन ब्लॉक घेतला आहे. कामाच्या कालावधीत गाड्यांची वाहतूक सुरळीत ठेवण्यासाठी काही गाड्यांचे प्रारंभिक आणि अंतिम स्थानक बदलण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
यामध्ये भुज – वांद्रे एक्स्प्रेस दादरपर्यंत धावणार असून, परतीची गाडी दादर स्थानकातून सुटेल. दुसरीकडे, अजमेर, श्रीगंगानगर आणि भगत की कोठी येथून दादरला येणाऱ्या गाड्या आता वांद्रे टर्मिनसपर्यंत धावतील. या गाड्यांच्या परतीच्या प्रवासासाठीही वांद्रे टर्मिनस हेच प्रारंभिक स्थानक असेल.
त्यामुळे दादरऐवजी वांद्रे टर्मिनसवरून प्रवास करणाऱ्या प्रवाशांनी स्थानकातील बदल लक्षात घेणे आवश्यक आहे. याशिवाय भुज, उधना, मडगाव, जयपूर आणि दौराई येथून वांद्रे टर्मिनसला येणाऱ्या पाच गाड्या बोरिवली स्थानकातच थांबविण्यात येणार आहेत. तर उधना, मडगाव, जयपूर आणि दौराईकडे जाणाऱ्या चार गाड्या वांद्रे टर्मिनसऐवजी बोरिवली स्थानकातून सोडण्यात येतील. या गाड्यांच्या सुटण्याच्या वेळांमध्येही बदल करण्यात आले आहेत
लोकल सेवांवरही परिणाम होणार
या ब्लॉकची झळ लांब पल्ल्याच्या गाड्यांबरोबरच लोकल सेवेलाही बसणार आहे. चर्चगेट-बोरिवली जलद लोकल दुपारी 2.50 वाजता, बोरिवली-चर्चगेट स्लो लोकल दुपारी 3.40वाजता, चर्चगेट-बोरिवली वातानुकूलित जलद लोकल सायंकाळी 5.28 वाजता आणि बोरिवली-चर्चगेट वातानुकूलित जलद लोकल सायंकाळी 6.24 वाजता सुटणाऱ्या चार फेऱ्या 1 डिसेंबर ते 13 फेब्रुवारी या कालावधीत रद्द करण्यात येणार आहेत.