गर्दीच्या वेळी प्रवाशांना मिळणार मोठा दिलासा, वर्सोवा-घाटकोपर मेट्रो 1 बाबत मोठा निर्णय
वर्सोवा-अंधेरी-घाटकोपर मेट्रो 1 मार्गिकेवरील गाडीच्या डब्यांची संख्या 4 वरून 6 होणार आहे.
वर्सोवा-अंधेरी-घाटकोपर मेट्रो 1 मार्गिकेवरील गाडीच्या डब्यांची संख्या 4 वरून 6 होणार आहे. त्यासाठी मुंबई मेट्रो वन प्रशासनाने (एमएमओपीएल) 22 नव्या डब्यांच्या खरेदीची प्रक्रिया सुरू केली आहे. प्रचंड गर्दीमुळे या 11.4 किमी मार्गावर सहा डब्यांच्या गाड्या सुरू करण्याची मागणी गेली अनेक वर्षे होत आहे. डब्यांची संख्या वाढल्यावर प्रवासी वाहून नेण्याची क्षमता 50 टक्क्यांनी वाढणार असून गर्दी कमी होण्यास मदत होणार आहे
साडेअकरा किलोमीटर लांबीच्या मेट्रो मार्गावर दररोज साडेचार-पाच लाख प्रवासी ये-जा करतात. या मार्गावर चार डब्यांच्या मेट्रो ट्रेन धावत असून, त्याची 1,178 एवढी प्रवासी क्षमता
आहे. या मार्गावर मेट्रोला आणखी दोन डबे जोडल्यानंतर मेट्रो ट्रेनची प्रवासी क्षमता 1,792 पर्यंत वाढू शकणार आहे. त्याचाच भाग म्हणून अतिरिक्त 22 डबे खरेदी केले जाणार आहेत.
सध्याच्या मेट्रो गाड्या आणि यंत्रणांसोबत हे नवीन डबे अखंडपणे जोडले जावेत यासाठी विद्यमान मूळ उपकरण उत्पादक कंपन्यांचे तांत्रिक सहकार्य घेतले जात आहे. दरम्यान, नव्या डब्यांची खरेदी प्रक्रिया ही सध्या सुरू असलेल्या आर्थिक पुनर्रचना आणि निधीच्या उपलब्धतेवर अवलंबून असणार आहे. तसेच अतिरिक्त डबे प्रत्यक्ष सेवेत दाखल करण्याची प्रक्रिया जलद गतीने होण्यासाठी आर्थिक सहाय्य वेळेवर मिळणे महत्त्वाचे ठरणार आहे.
प्रशासनाने गर्दी कमी करण्यासाठी यापूर्वी सेवेत काही बदल केले आहेत. ऑगस्ट 2026 पासून अंधेरी-घाटकोपर दरम्यान गर्दीच्या वेळेत काही गाड्या कमी अंतरासाठी चालविल्या जात आहेत.
प्रत्येक गाडीनंतर दुसरी गाडी ही केवळ घाटकोपर ते अंधेरी दरम्यान चालविली जात आहे. त्यामुळे या सर्वाधिक गर्दीच्या या भागात दोन गाड्यांमधील अंतर 3 मिनिटे 20 सेकंदांवरून 3 मिनिटांपर्यंत कमी झाले आहे.