मुंबईकरांची ट्रॅफिकमधून सुटका होणार, 3 महत्त्वाचे उड्डाणपूल आजपासून सुरू होणार
मुंबईतल्या वाहतूक व्यवस्थेला नवी गती मिळणार आहे. आज मुंबईत मुख्यमंत्री फडणवीसांच्या हस्ते 3 उड्डाणपुलांचं लोकार्पण होणार आहे.
मुंबईकरांसाठी एक महत्त्वाची बातमी समोर येतेय. मायानगरीत लोकसंख्या वाढत चालली आहे. त्यामुळं वाहतूक कोंडीचा प्रश्नदेखील वाढत आहे. वाहतूक कोंडीचा हा प्रश्न सोडवण्यासाठी मुंबईत अनेक प्रकल्पांचे काम हाती घेण्यात आले आहेत. आज मुंबईतील तीन उड्डाणपूल खुले होणार आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि सुनेत्रा पवार यांच्या उपस्थितीत आज या पुलांचे लोकार्पण होणार आहे.
मुंबईतील शीव, विद्याविहार आणि गोरेगाव-मुलुंड जोड मार्गावरील तीन उड्डाणपुलांचे आज लोकार्पण होत आहे. या तीन उड्डाणपुलांमुळं मुंबईच्या वाहतूकीचा गती मिळणार आहे. तसंच, मुंबईकरांचा प्रवास सुपरफास्ट होणार आहे. मुंबईच्या पूर्व-पश्चिम उपनगरांतील वाहतूक अधिक सुरळीत करण्याच्या दृष्टीने महत्त्वाचे पाऊल आहे. कसे असतील हे तीन पुल, जाणून घेऊयात.
1. शीव रेल्वे उड्डाणपूल
- शीव रेल्वे स्थानकाजवळील 112 वर्षे जुना आणि असुरक्षित ठरलेला पूल नव्याने बांधला.
- सीएसएमटी-कुर्ला दरम्यान पाचव्या आणि सहाव्या रेल्वे मार्गिकांच्या विस्तारासाठी महत्त्वाचा.
- धारावी, वांद्रे, बीकेसी, कुर्ला आणि पूर्व द्रुतगती महामार्गाला जोडणारा महत्त्वाचा पूर्व-पश्चिम दुवा.
- पुलाचे काम फेब्रुवारी 2027 पर्यंत पूर्ण होणे अपेक्षित होते; मात्र चार महिने आधीच पूर्ण.
- रेल्वे मार्गिकांचा विस्तार झाल्यानंतर लोकल आणि लांब पल्ल्याच्या गाड्यांची वाहतूक अधिक वेगवान होण्यास मदत होणार.
2. विद्याविहार रेल्वे उड्डाणपूल
- विद्याविहार पूर्व आणि पश्चिमेला जोडणारा सुमारे 650 मीटर लांबीचा उड्डाणपूल
- पूर्वेकडील रामचंद्र चेंबूरकर मार्ग आणि पश्चिमेकडील लालबहादूर शास्त्री मार्ग यांना जोडणार.
- प्रवासाचा वेळ 30 मिनिटांवरून 10 मिनिटांपर्यंत कमी होण्याची अपेक्षा.
- घाटकोपर रेल्वे स्थानकाजवळील उड्डाणपुलावरील वाहतुकीचा ताण कमी होणार.
- रेल्वे स्थानकातील तिकीट खिडक्या, स्थानक मास्तर कार्यालय आणि जिन्यांचीही पुनर्बांधणी.
3. गोरेगाव-मुलुंड जोड मार्गावरील उड्डाणपूल
- गोरेगाव पूर्वेतील रत्नागिरी हॉटेल जंक्शनजवळ 1.26 किलोमीटर लांबीचा, तीन अधिक तीन मार्गिकांचा उड्डाणपूल.
- जनरल अरुणकुमार वैद्य मार्ग ते दादासाहेब फाळके चित्रनगरी मार्गावरील संतोषनगरपर्यंत उड्डाणपुलाचे बांधकाम पूर्ण.
- गोरेगाव-मुलुंड जोड रस्त्याच्या माध्यमातून पूर्व आणि पश्चिम उपनगरांमधील कनेक्टिव्हिटी सुधारणार.
- दिंडोशी न्यायालय, रत्नागिरी हॉटेल जंक्शन आणि वालभट नदी चौक परिसरातील वाहतूक कोंडी कमी होण्यास मदत.
- गोरेगाव-मुलुंड जोड मार्गावरील जुळ्या बोगद्यांच्या प्रकल्पासाठीही हा उड्डाणपूल महत्त्वाचा.
मुंबईकरांना काय फायदा?
- पूर्व-पश्चिम उपनगरांमधील प्रवास अधिक वेगवान होण्यास मदत.
- प्रमुख जंक्शनवरील वाहतूक कोंडी कमी होण्याची अपेक्षा.
- रेल्वे आणि रस्ते वाहतुकीच्या पायाभूत सुविधांना चालना.
- शीव आणि विद्याविहार परिसरातील वाहतुकीसह गोरेगाव पूर्वेतील कोंडी कमी करण्यासाठी महत्त्वपूर्ण पाऊल.