मुंबईजवळ उभी राहणार ‘तिसरी मुंबई’! 15 लाख नोकऱ्यांचे लक्ष्य; स्थानिकांना प्राधान्य; मुख्यमंत्र्यांनी काय सांगितलं?
नवी मुंबई विमानतळ परिसरातील नैना प्रकल्पातून 15 लाख रोजगारांचे लक्ष्य आहे. पाच लाख उच्च वेतनाच्या नोकऱ्या, स्थानिकांना प्राधान्य, शेतकऱ्यांचे प्रश्न आणि नव्या कनेक्टिव्हिटी प्रकल्पांची माहिती जाणून घेऊया.
मुंबईवरील वाढता लोकसंख्येचा आणि पायाभूत सुविधांचा ताण कमी करण्यासाठी नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ परिसरात नियोजनबद्ध शहरी विकासाला गती देण्यात येत आहे. नैना (NAINA) प्रकल्पातून भविष्यात 15 लाख रोजगार निर्माण करण्याचे उद्दिष्ट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जाहीर केले आहे. यापैकी पाच लाख रोजगार उच्च वेतनाचे असतील, तर दहा लाख संधी प्राथमिक ते मध्यम कौशल्य स्तरावरील असतील, असा सरकारचा अंदाज आहे. काय घडलंय नेमकं? याचा नागरिकांना रोजगाराच्यादृष्टीने कसा फायदा होणारेय? सविस्तर जाणून घेऊया.
काय आहे नैना प्रकल्प?
नैना प्रकल्प म्हणजे नवी मुंबई एअरपोर्ट इन्फ्ल्यूएन्स नोटीफाइड एरिया हा प्रकल्प सध्या चर्चेत आहे. हा प्रकल्प नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या प्रभावक्षेत्रातील नियोजित शहरी विकासासाठी हा प्रकल्प राबवला जात आहे. सिडको (CIDCO) या क्षेत्रातील नियोजन आणि पायाभूत सुविधांच्या विकासात महत्त्वाची भूमिका बजावत आहे. येथे रस्ते, पूल, व्यावसायिक केंद्रे, नागरी सुविधा आणि उद्योगांसाठी आवश्यक पायाभूत व्यवस्था विकसित करण्याचे नियोजन आहे. मुख्यमंत्री फडणवीस यांनी या भागाला ‘तिसरी मुंबई’ म्हणून संबोधत पुढील काही दशकांत तो महाराष्ट्राच्या आर्थिक विकासाचे महत्त्वाचे केंद्र बनेल, असा विश्वास व्यक्त केला.
15 लाख रोजगारांचे लक्ष्य
सरकारच्या अंदाजानुसार, नैना क्षेत्राच्या विकासातून सुमारे 15 लाख रोजगार निर्माण होऊ शकतात. त्यातील पाच लाख रोजगार उच्च वेतनाचे, तर दहा लाख प्राथमिक ते मध्यम स्तरावरील असतील. विमानतळाशी संबंधित सेवा, उद्योग, व्यापार, पर्यटन आणि इतर व्यावसायिक क्षेत्रांत संधी वाढण्याची अपेक्षा आहे. स्थानिक तरुणांना या रोजगारांमध्ये प्रथम प्राधान्य देण्याचा सरकारचा प्रयत्न असेल, असे फडणवीस यांनी सांगितले.
विमानतळापर्यंत कनेक्टिव्हिटी वाढवण्यासाठी मोठी कामे
नैना परिसरातील विकासकामांसोबत नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाकडे जाणारी वाहतूक अधिक सुलभ करण्यासाठी महत्त्वाच्या पायाभूत प्रकल्पांना चालना देण्यात आली. विमानतळाच्या पूर्वेकडील जोडणीसाठी सुमारे 953 कोटी रुपये खर्चाच्या पुलांचे लोकार्पण करण्यात आले. उरण बायपास पुलाचेही लोकार्पण झाले. या जोडमार्गांमुळे पनवेल, उरण, नवी मुंबई आणि रायगडमधील प्रवास अधिक सुलभ होण्याची अपेक्षा आहे. विमानतळ, अटल सेतू आणि मुंबई-पुणे द्रुतगती मार्ग यांच्याशी सुधारित संपर्कामुळे व्यावसायिक हालचाली वाढण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
शेतकऱ्यांच्या जमिनी आणि भूखंडांचा प्रश्न महत्त्वाचा
नैना प्रकल्पात स्थानिक जमीनधारकांच्या हक्कांचा प्रश्नही महत्त्वाचा ठरला आहे. भूखंडांचे क्रमांक, मालकीच्या नोंदी, भूखंडांचे वाटप आणि नियोजित रस्त्यांमुळे विद्यमान घरांवर होणारा परिणाम याबाबत काही शेतकऱ्यांनी तक्रारी केल्या आहेत. मुख्यमंत्री फडणवीस यांनी या अडचणी मान्य करत त्रुटी दूर करण्यासाठी सिडकोला प्रक्रिया सुधारण्याचे निर्देश देण्यात आले. पात्र जमीनधारकांना मालमत्ता पत्रकांचे वाटपही करण्यात आले.
प्रत्यक्ष अंमलबजावणीची प्रतिक्षा
नैना प्रकल्पामुळे रोजगार, उद्योग आणि नागरी सुविधांना चालना मिळू शकते. मात्र, 15 लाख रोजगारांचे लक्ष्य प्रत्यक्षात आणण्यासाठी गुंतवणूक, कौशल्य प्रशिक्षण, वाहतूक, पाणीपुरवठा आणि परवडणारी घरे यांची पूर्तता आवश्यक असेल. केवळ रस्ते आणि इमारती उभारून विकास पूर्ण होत नाही; स्थानिकांना स्थिर रोजगार आणि चांगल्या नागरी सुविधा मिळणेही तितकेच महत्त्वाचे आहे. त्यामुळे प्रकल्पातील कामांची गती, रोजगारनिर्मितीची वेळापत्रके आणि शेतकऱ्यांच्या प्रश्नांवरील ठोस निर्णय याकडे नागरिकांचे लक्ष असेल.