नवी मुंबई महापलिकेच्या डॉक्टरचे निलंबन; डॉक्टरचे धक्कादायक कृत्य पाहून पोलिसही संतापले
महिला रुग्णाकडे शरीरसुखाची मागणी करणाऱ्या डॉक्टरचे अखेर निलंबन झाले आहे. डॉक्टरची विभागीय चौकशी सुरू आहे. यापूर्वीही गैरवर्तनाच्या तक्रारी आल्या आहेत.
नवी मुंबई क्राईम : नवी मुंबईत एक धक्कादायक प्रकार घडला आहे. उपचारासाठी आलेल्या 42 वर्षीय महिलेकडे शरीरसुखाची मागणी केल्याचा आरोप एका डॉक्टरवर करण्यात आला आहे. नवी मुंबई महापालिकेच्या रुग्णालयात हा प्रकार घडला आहे. या प्रकरणी डॉक्टरवर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे.
नवी मुंबई महापालिकेच्या तुर्भे येथील श्री रामतनु माता बाल रुग्णालयात हा प्रकार घडला आहे. कनिष्ठ वैद्यकीय अधिकारी डॉ. सौरभ बोरसे यांना महापालिका प्रशासनाने सोमवारी निलंबित केले आहे. एपीएमसी पोलिसांनी यापूर्वीच या डॉक्टरविरोधात विनयभंगाचा गुन्हा दाखल केला आहे.
विशेष म्हणजे, संबंधित डॉक्टरविरोधात यापूर्वीही अशाच स्वरूपाच्या अंतर्गत तक्रारी प्राप्त झाल्याची माहिती महापालिकेच्या आरोग्य विभागाने दिली आहे. या प्रकरणी विभागीय चौकशी सुरू करण्यात आली असून, चौकशीच्या निष्कर्षानंतर पुढील कारवाई केली जाणार आहे.
नेमकं काय घडलं?
तुर्भे परिसरात राहणारी 42 वर्षीय महिला सर्दी आणि खोकल्याचा त्रास होत असल्याने 14 नोव्हेंबर रोजी सकाळी 11 वाजण्याच्या सुमारास तुर्भे येथील श्री रामतनु माता बाल रुग्णालयात उपचारासाठी गेली होती. यावेळी ती तपासणीसाठी कनिष्ठ वैद्यकीय अधिकारी डॉ. सौरभ बोरसे यांच्याकडे गेली असता, डॉक्टरांनी तिची तपासणी करण्याऐवजी तिचा हात पकडून पाच हजार रुपये देण्याचे आमिष दाखवले आणि शरीरसुखाची मागणी केली, असा आरोप महिलेने पोलिसांत दिलेल्या तक्रारीत केला आहे. या प्रकारामुळे घाबरलेल्या महिलेने रुग्णालयातून बाहेर पडून एपीएमसी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली.
11 महिन्यांच्या चिमुकलीवर अत्याचार
नागपूर जिल्ह्यातील ग्रामीण पोलिसांनी एका 11 महिन्यांच्या चिमुकली मुलीसोबत लैंगिक शोषणाच्या प्रकरणी गुन्हा दाखल केला असून नातेवाईकाला अटक केली आहे. नागपूर जिल्ह्यातील कळमेश्वर येथे अवघ्या 11 महिन्यांच्या चिमुरडीवर 48 वर्षीय नातेवाईकाने लैंगिक अत्याचार केल्याची धक्कादायक घटना घडली आहे.
चिमुकलीच्या पालकांनी केलेल्या तक्रारीवरून कळमेश्वर पोलिसांनी दीपक रवींद्र श्रीखंडे असे नाव असलेल्या आरोपीला अटक केली आहे. पोलिसांच्या माहितीनुसार, ही घटना 21 नोव्हेंबर रोजी सकाळी 9 वाजण्याच्या सुमारास घडली. चिमुकली तिच्या घराशेजारी खेळत असताना, जवळच राहणाऱ्या आरोपीने खेळण्याच्या बहाण्याने तिला आपल्या घरी नेले. त्याने त्या चिमुरडीवर लैंगिक अत्याचार केला आणि त्यानंतर तिला तिच्या घराच्या अंगणात सोडून दिले. पुढे एका शेजाऱ्याच्या चिमुकलीच्या पायांवर रक्त असल्याचे लक्षात आले.
यानंतर नातेवाईकांनी खाजगी रुग्णालयात तिला दाखवल्या असता हा प्रकार उघडकीस झाला यानंतर कळमेश्वर पोलीस स्टेशन अंतर्गत गुन्हा दाखल करून पोलीस पुढील कारवाई करत आहेत. अधिकृत वैद्यकीय रिपोर्ट समोर यायचा आहे.