आर्टिफिशियल इंटेलिजन्स म्हणजेच एआयमुळे जगभरातील नोकऱ्यांचे स्वरूप बदलतय. अनेक कंपन्या कामकाजात एआयचा वापर वाढवत असताना कर्मचाऱ्यांच्या नोकऱ्यांवरही परिणाम होत असल्याची चर्चा आहे. याच पार्श्वभूमीवर मायक्रोसॉफ्टमधील एका कर्मचाऱ्याची घटना चर्चेत आली आहे. तब्बल 24 वर्षे कंपनीत काम केलेल्या लॉरा विल्यम्स यांना इंजिनिअर्सना एआयचे प्रशिक्षण देत असतानाच नोकरीवरून कमी करण्यात आले. विशेष म्हणजे, त्या स्वतः इतर कर्मचाऱ्यांना एआय टूल्सच्या मदतीने तांत्रिक दस्तऐवज तयार करण्याचे प्रशिक्षण देत होत्या. त्याचवेळी त्यांना कंपनीतील नोकरी संपल्याची माहिती देणाऱ्या मीटिंगचे आमंत्रण मिळाले. पुढे जे घडलं ते फारच धक्कादायक होते. याबद्दल सविस्तर जाणून घेऊया.
लॉरा विल्यम्स इंजिनिअरिंग टीमसाठी 90 मिनिटांचे प्रशिक्षण सत्र घेत होत्या. यामध्ये एआय टूल्सचा वापर करून स्वतःचे टेक्निकल डॉक्युमेंटेशन कसे तयार करता येईल, हे त्या समजावून सांगत होत्या. त्याचवेळी त्यांच्या मायक्रोसॉफ्ट टीम अकाउंटवर 'हाय प्रायोरिटी बिझनेस अपडेट' नावाच्या मीटिंगचे आमंत्रण आले. सुरुवातीला ही नेहमीची व्यावसायिक बैठक असावी, असे त्यांना वाटले. पण यातून आपले आयुष्यच बदलेल अशी शंकाही त्यांना आली नाही. कारण या बैठकीत त्यांना कंपनीतून कमी करण्यात येत असल्याची माहिती देण्यात आली. कामाच्या मध्यावर आलेल्या या अनपेक्षित निरोपामुळे त्यांच्या 24 वर्षांच्या कारकिर्दीचा शेवट झाला.
लॉरा विल्यम्स यांनी मायक्रोसॉफ्टच्या सिएटल येथील कामकाजात जवळपास 24 वर्षे योगदान दिले. त्या सॉफ्टवेअर डॉक्युमेंटेशन आणि कंटेंट लीडरशिपशी संबंधित जबाबदाऱ्या सांभाळत होत्या. कंपनीच्या विविध उत्पादनांसाठी आणि सेवांसाठी तांत्रिक माहिती तयार करणे, ती अद्ययावत ठेवणे आणि इंजिनिअरिंग टीमसोबत समन्वय साधणे, अशा स्वरूपाचे त्यांचे काम होते. त्या प्रिन्सिपल नॉलेज इंजिनिअरिंग मॅनेजर या पदावर कार्यरत होत्या. त्यामुळे कंपनीतील तांत्रिक माहिती व्यवस्थापन आणि एआयच्या नव्या वापराशी त्यांचा जवळचा संबंध होता.
नोकरी गेल्यानंतर लॉरा यांनी लिंक्डइनवर एक भावनिक निरोपाचा संदेश लिहिला. या संदेशात त्यांनी 24 वर्षांच्या प्रवासात साथ देणाऱ्या सहकाऱ्यांचे, व्यवस्थापकांचे आणि टीममधील सदस्यांचे आभार मानले. विशेषतः इन्ट्यून आणि पर्व्हू डॉक्युमेंटेशन टीमसोबत केलेल्या कामाचा त्यांनी अभिमानाने उल्लेख केला. या टीमसोबत काम करणे ही त्यांच्या व्यावसायिक आयुष्यातील सर्वोत्तम कामगिरींपैकी एक असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच आपल्या पतीने करिअर आणि कौटुंबिक जबाबदाऱ्या सांभाळण्यासाठी दिलेल्या पाठिंब्याबद्दलही त्यांनी कृतज्ञता व्यक्त केली.
या घटनेमुळे एआयमुळे तांत्रिक लेखक आणि कंटेंट क्षेत्रातील कर्मचाऱ्यांच्या नोकऱ्या धोक्यात आल्या आहेत का, असा प्रश्न उपस्थित होत आहे. एआयच्या मदतीने तांत्रिक दस्तऐवज तयार करणे, माहितीचे वर्गीकरण करणे आणि लेखनाची प्रक्रिया वेगवान करणे शक्य होत आहे. त्यामुळे कंपन्यांमधील कामाचे स्वरूप बदलत आहे.
मायक्रोसॉफ्टमधील या घटनेतून भारतातील आयटी, डिजिटल मीडिया, कंटेंट रायटिंग आणि टेक्निकल डॉक्युमेंटेशन क्षेत्रातील कर्मचाऱ्यांनीही बदलत्या परिस्थितीची दखल घेणे गरजेचे आहे. एआय टूल्सचा वापर शिकणे, प्रॉम्प्ट इंजिनिअरिंग, डेटा विश्लेषण, माहितीची पडताळणी आणि विषयाचे सखोल ज्ञान या कौशल्यांना महत्त्व प्राप्त होत आहे. केवळ एआय वापरता येणे पुरेसे नाही, तर त्यातून तयार झालेल्या माहितीची अचूकता तपासणे आणि मानवी निर्णयक्षमता वापरणेही आवश्यक आहे.