दिवाळीच्या तोंडावर नवी मुंबईकरांवर पाणीसंकट! मंगळवारी 10 तास नळाला नसणार पाणी
दिवाळीच्या तोंडावर नवी मुंबईकरांसाठी महत्त्वाची बातमी आहे. मंगळवारी 10 तास पाणीपुरवठा बंद राहणार आहे. कोणत्या भागावर परिणाम होणार आहे, जाणून घ्या.
दिवाळी गुरुवारी 5 नोव्हेंबरपासून सुरू होतेय. घरोघरी दिवाळीची लगबग सुरु आहे. घराची साफसफाई आणि फराळाची तयारीमध्ये महिला व्यस्त आहेत. स्वच्छा असो किंवा फराळाची लगबग यासाठी मोठ्या प्रमाणात पाणी आवश्यक असतं. अशातच नवी मुंबईकरांसाठी महत्त्वाची बातमी आहे. मंगळवारी 3 नोव्हेंबरला नवी मुंबईत 10 तास पाणीपुरवठा बंद करण्यात येणार आहे. यामुळे आता दिवाळी तयार करताना पाण्याचे संकट नवी मुंबईकरांवर ओढवलं आहे.
या कारणामुळे पाणीपुरवठा बंद राहणार!
मंगळवारी नवी मुंबई महापालिकेकडून मुख्य जलवाहिनीचे काम हाती घेण्यात आलं आहे. या मुख्य जलवाहिन्यांवर विविध ठिकाणी व्हॉल्व्ह बसवण्यात येणार आहे. त्यामुळे सानपाडा, वाशी, बेलापूर आणि शिरवणे परिसरात हे तांत्रिक कामं असणार आहे. नवी मुंबई महापालिकेने माहिती दिली आहे की, सानपाडा मोराज सर्कलजवळील मुख्य जलवाहिनीवर 400 मिमी व्यासाचा बटरफ्लाय व्हॉल्व्ह तर सानपाडा सेक्टर 30 इथल्या सामाना प्रेसजवळील जलवाहिनीवर 250 मिमी व्यासाचा स्लुईस व्हॉल्व्ह लावण्यात येणार आहे. शिवाय वाशी सेक्टर 19 - सतरा प्लाझा, सेक्टर 29, वाशी, बेलापूर सेक्टर 29 इथेदेखील व्हॉल्व्ह बसवण्यात येणार आहे.
किती वाजता पाणी जाणार?
नवी मुंबई महापालिकेने घोषणा केली आहे की, मंगळवारी 3 नोव्हेंबरला सकाळी 10 ते रात्री 8 वाजेपर्यंत नळाला पाणी नसणार आहे. ऑफिस, कॉलेज असो शाळेची घाई असताना नळाला पाणी नसल्याने घरात महिलांची तारांबळ उडणार हे नक्की.
कोणत्या भागात पाणीपुरवठा बंद राहणार आहे?
पाणीपुरवठा दहा तास बेलापूर, नेरूळ, वाशी, तुर्भे-सानपाडा, कोपरखैरणे, घणसोली आणि खारघर, कामोठे ऐरोली या विभागांतील बंद राहणार आहे. तर बुधवारीही कमी दाबाने पाणीपुरवठा होणार आहे, त्यामुळे नवी मुंबईकरांनी पाणी जपून वापरण्याचे आवाहन नवी मुंबई महापालिकेकडून करण्यात आले आहे.
बीडीडी चाळ पुनर्विकास लॉटरी प्रकरण!
ना. म. जोशी बीडीडी चाळ पुनर्विकासातील नवीन घराच्या चावी वाटप 6 नोव्हेंबरला होणार आहे. या चावी वाटपापूर्वी लॉटरीसंदर्भात 4 नोव्हेंबरला उच्च न्यायालयात सुनावणी घेण्यात येणार आहे. इथल्या चार चाळींच्या लॉटरीवर रहिवाशांनी आक्षेप घेतला आहे. तर गेल्या वर्षी न्यायालयाने या सोडतीला स्थगिती दिली होती.