राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांनी दिल्लीत केंद्रीय गृहमंत्री अमित शाहांची भेट घेतली. प्रदेशाध्यक्ष सुनिल तटकरे, प्रफुल पटेल, छगन भुजबळ, दिलीप वळसे पाटील, धनंजय मुंडे आणि हसन मुश्रीफ यांनी अमित शाह यांची भेट घेतली. पण या भेटीवेळी पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षा सुनेत्रा पवार अनुपस्थितीत असल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या. सुनेत्रा पवार, पार्थ पवार यांना वगळून ही भेट घेण्यात आली का? यासंदर्भात राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं. यानंतर आता राष्ट्रवादी काँग्रेसने या भेटीबाबत स्पष्टीकरण दिलं आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसने पक्षातील मतभेदांच्या चर्चा निराधार असल्याचा दावा केला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे मुख्य राष्ट्रीय प्रवक्ते उमेश पाटील यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या भेटीला राजकीय रंग देण्याचा प्रयत्न होत असल्याचा आरोप केला आहे.
सुनेत्रा अजित पवार आणि पार्थ पवार यांनी यापूर्वीच अमित शाह यांची भेट घेऊन वरिष्ठ नेत्यांच्या भेटीसाठी वेळ देण्याची विनंती केली होती, आजची भेट पूर्वनियोजित आणि औपचारिक होती. पक्षातील वरिष्ठ नेत्यांनी महाराष्ट्राचे प्रश्न, संघटनात्मक बाबी आणि मतदारसंघांशी संबंधित मुद्द्यांवर चर्चा केली, असे उमेश पाटील यांनी स्पष्ट केले.
सुनेत्रा पवार आणि पार्थ पवार यांना बाजूला ठेवून ही भेट झाल्याच्या बातम्या खोट्या आणि दिशाभूल करणाऱ्या असल्याचा दावा त्यांनी केला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये अंतर्गत मतभेद असल्याचे चित्र निर्माण करण्याचा जाणीवपूर्वक प्रयत्न होत असल्याचा आरोपही त्यांनी केला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस महायुतीचा महत्त्वाचा घटक असून, सुनेत्रा अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली पक्ष एकजुटीने काम करत आहे, असे उमेश पाटील यांनी स्पष्ट केले.
राष्ट्रवादी पक्षाच्या एका माजी मंत्र्यांच लवकरच मंत्रिमंडळात एंट्री होणार अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. केंद्रीय मंत्री अमित शाह आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांमध्ये झालेल्या बैठकीत चर्चा झाल्याची सूत्रांची माहिती आहे. या भेटीत आगामी मंत्रिमंडळ फेरबदलात राष्ट्रवादीच्या संबंधित नेत्याला सुनेत्रा पवारांकडे असलेल्या अतिरिक्त खात्याची जबाबदारी देण्यासाठी राष्ट्रवादीच्या नेत्यांची मुख्यमंत्र्यांना देखील विनंती केल्याचं समजत आहे. तसेच राष्ट्रवादीला अर्थ खाते लवकरात लवकर देण्यात यावं अशी देखील भूमिका पुन्हा राष्ट्रवादीच्या वरिष्ठ नेत्यांनी मांडली.