लेकीने पक्षाविरोधात भूमिका घेतल्यानंतर जितेंद्र आव्हाडांची मांडली स्पष्ट भूमिका, म्हणाले 'शरद पवारांनी एकदा सांगितलं...'
जर पक्ष मतदारसंघ पुनर्रचना विधेयकाला पाठिंबा देण्याचा विचार करत असेल तर त्याचा मी निषेध करते, अशी भूमिका माजी मंत्री जितेंद्र आव्हाड यांची मुलगी आणि पक्षाची युवक सरचिटणीस नताशा आव्हाड यांनी मांडली आहे.
डिलिमिटेशन विधेयकावरून राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात मतभेद आहेत का अशी चर्चा आता सुरु झालीय.. माजी मंत्री जितेंद्र आव्हाड यांची मुलगी आणि पक्षाची युवक सरचिटणीस नताशा आव्हाड यांनी एक पोस्ट केली आहे. जर पक्ष मतदारसंघ पुनर्रचना विधेयकाला पाठिंबा देण्याचा विचार करत असेल तर त्याचा मी निषेध करते, अशी भूमिका त्यांनी एक्सवर पोस्ट करत जाहीर केली. विधेयकाला पाठिंबा देणं म्हणजे या देशाची आणि संविधानाची मोठी हानी करण्यासारखं आहे, असं नताशा आव्हाड यांनी म्हटलं आहे. यानंतर जितेंद्र आव्हाड यांनी यावर आपली बाजू मांडील आहे.
मतदारसंघ पुर्नरचना विधेयकाबाबत खासदार सुप्रिया सुळेंनी नुकतीच सकारात्मक भूमिका मांडली. मात्र आता या मुद्द्यावरून पवारांच्या राष्ट्रवादीतच पक्षांतर्गत विविध मतप्रवाह समोर आलेत. या विधेयकाबाबत पवारांच्या राष्ट्रवादीचे बड्या नेत्यांनी अद्याप काहीही भूमिका मांडलेली नाही. मात्र आमदार जितेंद्र आव्हाड यांची कन्या आणि पक्षाची युवक सरचिटणीस नताशा आव्हाड यांनी या विधेयकाला विरोध दर्शवला आहे. या विधेयकाला पाठिंबा देणं म्हणजे देशाशी आणि देशाच्या संविधानाशी प्रतारणा करण्यासारखंच आहे, असे स्पष्ट मत व्यक्त केलं आहे.
जितेंद्र आव्हाड यांनी मुलीच्या पोस्टवर प्रतिक्रिया देताना म्हटलं आहे की, "शरद पवारांनी एकदा सागितलं की ती लक्ष्मणरेषा अशी माझी भूमिका असते. नवीन पिढी आहे त्यांना काय बोलणार. माझ्यासाठी शरद पवार म्हणतील ती पूर्व दिशा असते. ती लंडनमध्ये आहे, ती येईल तेव्हा तिच्याशी बोलेन. डीलिमिटेशन आल्यापासून पवार साहेबांचा पाठिंबा आहे. साहेबांनी एकदा निर्णय घेतला की झालं".
डिलिमिटेशन विधेयकाबाबत नताशा आव्हाडांनी काय म्हटलंय?
माझा पक्ष डिलिमिटेशन बिलाला पाठिंबा देण्याचा विचार करत असल्याच्या बातम्यांमध्ये तथ्य असेल, तर मी या निर्णयाचा तीव्र निषेध करते. मतदारांची वाढती संख्या लक्षात घेता डिलिमिटेशन आवश्यक असले, तरी प्रस्तावित डिलिमिटेशन बिल हे विरोधकांना मिळू शकणा-या जागांची संख्या मर्यादित करण्याचा आणि त्याच वेळी भाजपला अनुचित राजकीय फायदा मिळवून देण्याचा घटनाबाह्य प्रयत्न आहे. भाजपची लोकप्रियता सातत्याने घसरत असताना, सत्तेला चिकटून राहण्यासाठीचा हा त्यांचा शेवटचा केविलवाणा प्रयत्न आहे. या देशाची लोकशाही व्यवस्था टिकवून ठेवण्याची इच्छा असलेल्या प्रत्येकाने या बिलाला प्रखर विरोध केला पाहिजे. या बिलाला पाठिंबा देणं म्हणजे देशाशी आणि देशाच्या संविधानाशी प्रतारणा करण्यासारखंच आहे. पक्षाने आपल्या भूमिकेचा फेरविचार करावा, अशी मला आशा आहे. नैतिकतेचा विजय असो!
राऊतांची रिपोस्ट, वडेट्टीवारांच्या लेकीचं समर्थन
खासदार संजय राऊत यांनी नताशा आव्हाड यांच्या भूमिकेचं कौतुक केलं आहे. नताशा आव्हाड यांची पोस्ट रिपोस्ट करत राऊतांनी मराठी बाणा असा शब्द वापरला आहे. विशेष म्हणजे विजय वडेट्टीवार यांच्या कन्या शिवानी वडेट्टीवार यांनी देखील नताशा आव्हाड यांच्या भूमिकेला पाठिंबा दिला आहे. सुप्रिया सुळे आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षातील वरिष्ठ नेत्यांनी नताशा यांनी उपस्थित केलेल्या मुद्द्यांकडे लक्ष घालावे अशी अपेक्षा व्यक्त केली. तसेच, आता कुठल्याही पक्षाने पक्षातील तरुण नेते आणि जेन-झी यांच्या म्हणण्याकडे दुर्लक्ष करू नये, असा सूचक इशाराही शिवानी वडेट्टीवार यांनी दिला आहे.
एकीकडे विलीनीकरणासह शरद पवारांची राष्ट्रवादी सत्तेत सहभागी होण्याची जोरदार चर्चा सुरू आहे. हाच धागा पकडत जितेंद्र आव्हाड आपल्याला लेकीला समजावतील असं वक्तव्य शिवसेना खासदार नरेश म्हस्केंनी केलं आहे. इतकच नव्हे तर त्यांनी आव्हाडांच्या मंत्रिपदाची चर्चा असल्याचं दावाही केला आहे.