राष्ट्रवादी काँग्रेसचे संस्थापक आणि ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्यावर मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. गुरुवारी राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटाचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष प्रफुल्ल पटेल हे शरद पवारांची भेट घेण्यासाठी रुग्णालयात गेले होते. या दोन्ही नेत्यांच्या भेटीचे फोटो आणि व्हिडीओ समोर आले असून या भेटीत पवारांच्या प्रकृतीची विचारपूस करण्यासोबतच राजकीय विषयांवरही चर्चा झाल्याची माहिती समोर आली आहे.
अमित शाहांसोबतच्या भेटीबद्दलची माहिती घेतली
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, या भेटीदरम्यान शरद पवार यांनी प्रफुल्ल पटेलांकडे केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यासोबत झालेल्या बैठकीबाबत विचारणा केली. राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटातील प्रमुख नेत्यांनी नुकतीच दिल्लीत अमित शाह यांची भेट घेतली होती. या बैठकीत नेमकी काय चर्चा झाली, कोणते राजकीय विषय मांडण्यात आले आणि या भेटीमागील भूमिका काय होती, याबाबत पवारांनी पटेल यांच्याकडून माहिती घेतल्याचे समजते.
10 नोव्हेंबरनंतर...
विशेष म्हणजे, अजित पवार यांच्या निधनानंतर राष्ट्रवादी काँग्रेसमधील राजकीय समीकरणे आणि पक्षाच्या भविष्यातील वाटचालीबाबत विविध चर्चा सुरू आहेत. अशा परिस्थितीत शरद पवार आणि प्रफुल्ल पटेल यांची रुग्णालयातील भेट महत्त्वाची मानली जात आहे. या भेटीदरम्यान शरद पवारांनी प्रफुल्ल पटेल यांना आगामी 10 नोव्हेंबरनंतर पुन्हा एकदा एकत्र बसून चर्चा करू, अशी सूचना दिल्याची माहिती समोर आली आहे. या दोघांमध्ये 10 तारखेचा उल्लेख असलेली चर्चा सुरु असल्याची रुग्णालयातील व्हिडीओही समोर आले आहेत. म्हणजेच दिवाळीनंतर दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकत्र बसून चर्चा करणार असल्याचे संकेत यातून मिळत आहे. मात्र याच पार्श्वभूमीवर दोन्ही राष्ट्रवादी दिवाळीनंतर एकत्र येणार की काय अशी चर्चा रंगली आहे.
प्रसारमाध्यमांना पटेल यांनी काय सांगितलं?
या भेटीनंतर रुग्णालयाबाहेर प्रसारमाध्यमांशी बोलताना प्रफुल्ल पटेल यांनी शरद पवारांच्या प्रकृतीची माहिती देतानाच या भेटीदरम्यान राजकीय चर्चा झाल्या असल्या तरी कौटुंबिक नातेसंबंध असल्याने ही भेट घेतल्याचं सांगितलं. "पवार साहेबांची प्रकृती आता उत्तम असून त्यांनी नेहमीच्या शैलीत देशात आणि राज्यात सध्या काय सुरू आहे, या राजकीय घडामोडींचा आढावा घेतला आणि त्याबाबत चर्चा केली," असं प्रफुल्ल पटेल म्हणाले. तसेच राजकीय चर्चांबद्दल विचारणा केली असता, त्यांनी या भेटीतील राजकीय चर्चांचे संकेत फेटाळून लावले. "आमचे नेहमीच कौटुंबिक संबंध राहिले आहेत आणि आम्ही दिल्लीतही नेहमी भेटत असतो," असे सांगत ही केवळ सदिच्छा भेट असल्याचं पटेल यांनी नमूद केले.